एका बोक्याची प्रेमकथा


एका बोक्याची प्रेमकथाप्रस्तावना : डॉली माझी लाडकी मांजर. ही कथा तिच्या आठवणीत.. तिला समर्पित.. एका बोक्याच्याच शब्दांत..


प्रेम तसं तुमचं आमचं सेमचं असतं.. किंबहुना आम्ही तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढंच असतो.. का म्हणून विचारू नका.. मुळात आम्हाला दोन पाय जास्त असतात..

बसंती वार्‍यातल्या झुळक्याप्रमाणं तिची झुपकेदार शेपटी माझ्या तोंडावर मऊ चाबकासारखी पडली. आस्स्... डोळं उघडंस्तोर जीभेवर आलेली शिवी.. डोळं खुललं आणि ती शिवी घश्यातंच अडकली..

अहाहा... काय रूपडं तिचं.. जसं रंगपंचमीत तिच्यावरंच कुणीतरी परमनंट रंग टाकलेला... आयशपथ सेम तसंच रंगांचं पांघरुण तिच्यावर.. नारंगी, तपकीरी, पांढरा आन् मध्येचं कुठंकुठं काळा.. किलकिल करत इकडं तिकडं बघणारं तिचं हिरवेगार डोळं.. गुबगुबीत आणि डौलदार शरीर.. आणि तिचा तोरा.. चार पायाची तिची चाल जर कोणी टक लावून पाहीली.. तर खरं सांगतो पाहणार्याचा तोल गेल्याशिवाय राहणार नाही.

आज ती माझ्याशी जरा जास्तच लाडात आली होती. म्हणूनच तिचं शेपटीनं मला डिवचनं चालूच होतं. 

माझ्याशिवाय चाळीत नव्हतंच कुणी तिच्या लायकीचं. सध्या ति माझ्या प्रेमात होती..

पण पहीलं असं नव्हतं..

'डॉली' नाव तिचं. मला पहिल्यापासूनचं माहीत होतं नाव. अहो पहीलं क्रश माझं ती लहानपणापासूनचं. तिच्या घराजवळच्या वार्या करायला मी किती मारामार्‍या केल्या मलाच माहीत. आमची बिरादरी तर कशीपण मी ताणून लावायचो.. पण डॉलीचा मालक वीस बावीस वर्षाचा.. लयं खवचंट.. त्याला नुसता मी डॉलीजवळ जाताना दिसलो तर वस्सकन् अंगावर धावून यायचा माझ्या.

डॉली मस्त घरात राहायची, चांगलं चुपलं खायची. आणि मी चाळीवर ओवाळून टाकलेला गुंड होतो. लावारीस.. ना आगे.. ना पिच्छु.. काळाकुट्ट.. मध्येच तपकीरी ठिपके.. रोज रात्री चाळीतली माणसं झोपली की माझी बाकीच्या बोक्यांबरोबर 'कुंग फू' चालू व्हायची.. म्हणुनच माझं शरीर चांगलंच कसलेलं होतं. माझ्या वार्यालापण मी कुणाला उभा राहू द्यायचा नाही.

अन् एखाद्याला लोळवल्यावर मी विजयी फुत्कार मारायला लागलो की डॉलीचा मालक घरातनं बाहेर यायचा. मला नेहमी वाटायचं हा आता जवळ येऊन माझं कौतुक करेल.. आणि डॉलीची अन् माझी सेटींग लावेल.. तो जवळ यायचा सुद्धा.. पण त्याच्या हातातला सोटा बघून मी धुम ठोकायचो. मला कळायचं नाही तो माझ्या विजयावर इतका का चिडायचा..?

एकाच चाळीत असल्यामुळे डॉली पण तसं बर्याचदा बघायची मला. पण मी काय ना काय येडेचाळे करतानाच तिला नेमका दिसायचो.

डॉलीला पटवणं खाऊचं काम नव्हतं. पण मी चंग बांधला होता कायपण करून तिला आपलं करायचंच. त्यासाठी तिच्यावर माझा रूबाब पडणं गरजेचं होतं. म्हणून मी गटारात उतरणं सगळ्यात पहीलं बंद केलं. मग त्या गटारात उंदरांची फलटण जरी जमा झाली तरी मी साधु बनून राहायला लागलो. मन करायचं खुप पण नाही जायचो. आपल्या अंगाला गटाराचा घाण वास आला तर डॉली भाव देणार नाही हे ठावूक होत मला.

एकदा रात्री बाजूच्या चाळीतल्या बोक्याला पळवल्यावर मी जल्लोष करत होतो. तेव्हा एक म्हातारडं बोकं मला लांबूनच म्हणालं.. "तुझा आवाज असा का आहे..?"

मी म्हणालो.. "कसा...?"

त्याचवेळी म्हातारं जरा बिचकून मागं सरलं.. 'धाड्..ऽड.ऽकन..' सोटा माझ्या पेकाटात पडला.. "वव्या..य..वव.." मी कळवळलो.. आणि पळायला लागलो. डॉलीच्या मालकानंच मारलेला.

 म्हातारं बोकं माझ्यापुढंच वरडलं.. "आता बोंबललास ना तसाच.."

मी पळता पळता बिचकलोच.. ह्या.. माझा आवाज.. "वऽव्याऽऽव.." मलाच विचित्र वाटला. मग मला कळलं की डॉलीचा मालक माझ्यावर इतका का पिसळायचा..

त्या दिवसापासनं मला बाकीच्या मांजरांची 'म्याव् म्याव्' जहरी वाटायला लागली. डॉलीच्या प्रेमासाठी मी आपला स्पीकर सुधारायचा ठरवलं. 

चाळीतल्या सभ्य वाटणार्या मास्तराचा पाठलाग केला. त्याचं बोलणं, चालणं, वागणं टिपून घेतलं.. आन् डिट्टो कॉपी करायला लागलो. सर्व बिरादरीशी अदबीनं बोलायला लागलो.. सगळी मांजरं चाट... जो तो ह्याला अचानक काय झाले म्हणून विचारू लागला.

बाकीच्यांचं जाऊ दे.. डॉली मला येता जाता बघायला लागली. माझा 'व् व्याव्यऽ' मी कंठाला जास्त जोर न देता हलकेच काढायचो. त्या ऐक्स्ट्रा 'व्य..' मुळेच माझ्यातल्या प्रेमाच्या आर्त भावनेतला स्पेशल इफेक्ट साधून जायचा.

 कुठल्याही हीरोइनला आपल्या हीरोमध्ये काहीतरी बाकीच्यांहुन वेगळंपण पाहीजे असतं. आणि माझ्या नम्र उच्चारणांमुळे माझा पूर्वीचा कर्णकर्कशः आवाज आता मधाळ बनला होता.. नव्हे मी बनवला होता.

चाळीतल्या सगळ्यांसमोर मी माझ्यातल्या सभ्यतेची उधळण करत होतो. डॉलीचा मालक आता माझ्यामागं लागायचा हळूहळू बंद झाला होता.

आणि तो सोन्याचा दिवस उजाडलाच.. त्या दिवशी बाजूच्या चाळीतला दुश्मन बोका डॉलीवर जबरदस्ती करू पाहत होता. मी कायमच डॉलीच्या मागावर असलेला.. मला ते जसं दिसलं तसा मी हिरोच्या स्टाईलमध्येच त्यांच्या जवळ जायला लागलो.. पलीकडं लक्ष गेलं तर डॉलीच्या मालकाची नजर पण यांच्यावर पडलेली.. तो तसाच घरात पळाला. बहुतेक सोटा आणायला गेला असावा.

प्रसंग बाका होता. एक मिनिट इकडचा तिकडं झाला असता तर मला चालून आलेली संधी वाया जाणार होती. मी पण मग ना आव पाहीला ना ताव.. सुसाट पळत सुटलो.. आन् दुश्मन बोक्याला धु धु धुतला.. डॉलीचा मालक पण तेवढ्यात आलाच होता. आमची फाईटींग बघून तो काय मधी पडला नाही. एव्हाना दुश्मन बोक्याची फुगलेली शेपटी बर्यापैकी बारीक झालेली. पण गुरगुरणं चालूच होत त्याचं.

मी शेवटचा घाव घातला त्याच्यावर. त्या तडाख्यानं ते स्वांग पळून गेलं. एवढ्या वेळात मनात असूनपण मी तोंडातनं ब्र पण नाही काढला. नायतर डॉलीच्या मालकानं माझं विचित्र केकाटणं ऐकून मलाच सोटा घातला असता. 

मी विजयी मुद्रेनं डॉलीकडं पाहीलं. तिनं पण लाजून म्याव म्याव केलं. कान्या डोळ्यानं मग मी तीच्या मालकाकडं कटाक्ष टाकला. तो माझ्या जवळ येत होता.

हातात सोटा होता. माझं काळीज वरखाली होऊ लागलेलं. पण पाहु तर काय होते, असा विचार करून मी थांबलो. जवळ येऊन त्यानं मला उचललं आणि गोंजरायला लागला.. अहाहा.. मला जाम भारी वाटु लागलं होतं. मला घरी घेऊन जाऊन त्यानं दुध चपाती दिली. डॉलीपण मागून आली.

डॉली आणि मी एकाच ताटात दुध चपाती खात होतो. काय वर्णवू मी ते... मी गपचूप तिच्या गालांची पापी घेतली... अन् मागे सरकलो.. तिची प्रतिक्रिया जाणून घ्यायला.. ती कावरीबावरी होऊन इकडंतिकडं बघु लागली अन् माझ्याकडं बघुन स्माईल देऊ लागली. 

'हेऽऽ बोक्या.. मांजर पटली रं पटली..' इतक्या दिवसांच्या मेहनतीचं आज चीज झालं होतं.

आता माझं जगणं फक्त डॉलीसाठी होतं. स्वतःला अजून जरा इम्प्रूव्ह करण्यासाठी मी वेगवेगळ्या टाईपच्या माणसांची संभाषणं ऐकायला लागलो. त्यात एका प्रेमी युगुलाचा पाठलाग केला. ती दोघं नेमकं काय बोलतायत ते ऐकायला. त्यांच्यातल्या हीरोच्या बोलण्यावरणं कळलं की 'ब्यॅन्ड स्ट्यॅन्ड' प्रेमी जोडप्यांचं आवडतं ठिकाण. तिथं म्हणे एका कठड्यावर बसायचं आणि वाहतं पाणी बघत प्रेमात हरवून जायचं.

'श्याऽऽ.. असलं काय ह्या चाळीच्या आसपास का नाही बुवा..?' माझा पूर्ण मूडंच निघून चाललेला ते ऐकून.. मग काय निघालो तिथनं परत.. एकतर अगोदरच त्या जोडप्याच्या मागं फिरत फिरत माझ्या पायाचा खुळखुळा झाला होता..

दुसर्या दिवसापासून माझ्या डोक्यात फक्त ब्यॅन्ड स्ट्यॅन्ड होता. तीन चार दिवस डोक्याचा भुगा केला, ‘कठडा आणि वाहत्या पाण्यानी..’ पण शेवटी मला यावरचा उपाय भेटलाच.. आणि मी डॉलीला आमच्या फर्स्ट डेटसाठी विचारलंच. तिनं पण लाजत होकार दिला.

इकडे डॉलीच्या घरात येऊन तिला पटवून मी तिच्या मालकासमोर अटकेपार झेंडं गाडलं होतं.. आणि आता त्याचाच घरजावई बनून राहीलो होतो. खाणं-पिणं-थोडफार झोपणं सासुरवाडीतच व्हायचं. घरात तशी डॉलीबरोबर माझी मस्ती चालायचीच.. त्यामुळं डेटवर एकत्र जायला काही प्रोब्लेम नव्हता..

आज डॉली तिच्या शेपटानं मला रोमँटीक मूडमध्ये आणू पाहत होती. फर्स्ट डेट होती ना ओ आपली.. मी जरा मधेमधे डोळं बंदच करू पाहत होतो. माझं लहानपणापासूनचं स्वप्न खरं झालं होतं. डॉली माझ्यासोबत डेटला.. आअऊ.. पंजा पण मारून पाहीला स्वतःला.. सगळं खरं होतं.. अगदी..

नुकताच उतरतीला चाललेला आकाशातला लालबूंद गोळा.. त्या तांबड्या आसमंतावर काळ्या अंधाराची शाल पांघरू लागलेली.. आमच्या डोक्यावर पसरलेल्या पिंपळाच्या फांद्यांची सुखद छाया.. थंडगार वाहणार्‍या वार्याची झुळूक.. समोर वाहतं पाणी.. 

गटाराचं का असेना.. पण 'वाहतं' महत्वाचं.. त्यात अधूनमधून फिरणारी उंदरांची टोळी... 

कठड्यावर सोबत बसलेली ती..

'संगती सखी प्रिया...'

ऐका : एका बोक्याची प्रेमकथा | बोका आणि मांजर |समाप्त..
एका बोक्याची प्रेमकथा एका बोक्याची प्रेमकथा Reviewed by Nilesh Desai on December 14, 2019 Rating: 5

1 comment:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.