पहिले प्रेमपत्र


 काही माणसं वरवर पाहता शांत दिसत असतात. इतके की 'काय उत्तम व्यक्तीमत्व आहे त्याचे' असे इतरांनी सांगावे आणि आपण एवढे 'हे' कसे काय, हा प्रश्न त्याला स्वत:ला पडावा. पण कित्येकदा आयुष्यातील विविध पैलूंबाबत स्वत: तो माणूसही अनभिज्ञ असतो. घडून गेलेल्या कितीतरी घटनांनी त्याची विविध रुपे आपसूकच त्याने जन्माला घातलेली असतात. आणि मग धावपळींच्या दिवसांतील जराश्या उसंत देणाऱ्या क्षणांत जेव्हा कधीकाळचे काही नाजूक बंध आठवतात. त्या बंधात, त्या आठवणींत माणसाला त्याच्यातला त्याचा बहुरंगी स्वभाव दिसतो.

  काही दिवसांपूर्वी एक फोन येऊन गेला. पलीकडून लग्न झालेली एक महीला. सहज पुस्तकावर प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून फोन केला होता. मी आभार मानून नाव विचारले. मुद्दामच तिने दोन नावं सांगितलीत. म्हणजे सासरकडचं एक आणि माहेरकडचं एक. पैकी तिचं माहेरकडचं नाव ऐकलं आणि ते नाव ऐकूण मी थोडासा गोंधळलो.

"अरे.. आपण एकाच वर्गात होतो.. आठवले का...?" तिने ओळख दाखवली आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

"अगं.. तू..! कशी आहेस..? नंबर कुठून मिळाला...?" मी आश्र्चर्यचकित होत विचारले.

"तू अजूनही वेंधळाच आहेस वाटतं..! पुस्तक वाचलं म्हटल्यावर तुझा नंबर भेटणारच ना.." तिने बिनधास्तपणे माझ्या निरर्थक प्रश्नाचे उत्तर दिले.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि लवकरच एक गेट टुगेदरची योजना आखून संभाषणाची सांगता झाली.
फोन ठेवल्यावर मी निवांत बसून तो प्रसंग आठवू लागलो.

  प्रकरण जवळपास तेवीस वर्षांपूर्वीचे आहे. जेव्हा मी सात-आठ वर्षांचा असेल. शाळेत शिक्षक शिकवताना जितका शांत तितकाच ते गेले की धुमाकूळ घालायचो. घर जवळच असल्याने प्युनपासून ते शिक्षक, मुख्याध्यापक सगळे ओळखीचे. शिवाय अभ्यासात हुशार त्यामुळे सभ्य कॅटेगरीचं लेबल मला लागलं होतं. आपला मस्तीखोरपणा कुणाला दिसून येईपर्यंत दाखवायचा नाही, हे माझं समजायला लागल्यापासूनचं ब्रीदवाक्य.

असाच शाळेत कुणालाही थांगपत्ता लागू न देता मी केलेला उपद्व्याप म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहीलं प्रेमपत्र...
  
साधारण मी चौथीत होतो तेव्हा. अम्म्... चौथीतच. आमच्या वर्गातली एक मुलगी मला अचानक आवडायला लागली.

का..? कशी..? काही सांगता यायचं नाही.

अहं... आठवत नाही असं नाही. पण काहीही ठोस कारण नसताना तसं घडलं. साहजिकच ते फक्त मैत्रीतलं साधारणसं आकर्षण होतं कारण शरीराच्या गरजांचा आणि त्या वयाचा दूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. फक्त बोलण्यातली मैत्रीणसुद्धा म्हणजे खुप काही आपल्या सोबत असल्यासारखं. त्याकाळचं तेव्हाचं प्रेम असंच होतं. त्यात व्यक्त होण्याचा आव नव्हता. शब्द नव्हते पण भाव होता. मुकेपणाचाच सगळा डाव होता.

तर अशी अचानकपणे मला ती आवडू लागली. रुपानं छान साधी होती. तिच्यासोबतचं तिचं ABCD वर्णमालेचं दप्तर (अजूनही तंतोतंत लक्षात आहे), तिची बटणं दाबताच एक एक कप्पे उघडणारी कंपासपेटी (हो, त्याकाळीही होती फक्त श्रीमंतांच्या मुलींकडे), तिने एकदा वर्गात आणलेली जवळजवळ दोन फूट लांबीची पेन्सिल (अशी पेन्सिल असते), तिचा डमरूच्या प्रतिकृतीसारखा खोडरबर, तिची वही, त्यातलं अक्षर इतकंच काय सारखं नाव असलेली हिंदी चित्रपटातील नटीही आवडू लागली.

नशीब तिचं नाव काहीसं वेगळं असल्याकारणाने शाळेत तेव्हातरी कुणी त्या नावाची दुसरी मुलगी नव्हती. नाहीतर खरंच माझी पंचायत झाली असती.

तसा मी तिच्याशी बोलून चालून होतो. पण येताजाता, वर्गात, मधल्या सुट्टीत ती माझ्यासोबत असावी हा मनाचा अट्टहास. तिचा आवाजही सामान्य मुलींहुन काहीसा निराळा.. किंचितसा घोघरा. म्हणूनच त्यातलं वेगळेपण मला आवडायचे. तिची बडबड कितीही वेळ ऐकण्याची माझी तयारी असायची. पण मुळात आमची बाकं एकमेकांपासून दूर असल्याकारणानं जास्त बोलता यायचं नाही. मग येताजाताच काय त्या थोड्याफार संवादांची देवाणघेवाण. शिवाय इतरवेळी ती सदानकदा मैत्रीणींच्या घोळक्यात. म्हणून मग तिच्याशी फारसं बोलण्याची संधी काही मला कधी मिळायची नाही. तसंच कुणाची मदत वगैरे घेणं असलं काही डोक्यात येण्याइतपत मी पक्का खिलाडी नव्हतो वा असं म्हणू शकता की त्या वयात मी त्या खेळासाठी पात्रच नव्हतो. आणि या घटनेची वाच्यता इतर कुणापुढे करण्याइतपत मी अगदीच काही 'हा' नव्हतो.

हिवाळ्यातला एखादा दिवस असावा तो. कारण त्या प्रसंगात पावसाची कसलीही उपस्थिती नव्हती. आणि उन्हाळ्यात मी दुपारचा घराबाहेर पडायचा नाही. अहं... अभ्यासामुळे नाही तर चेहरा काळा पडायची भीती असायची म्हणून.

तर त्या दुपारी असाच शाळा सुटल्यावर घरी चाललो होतो. घर जवळ आलेच होते. बाजूच्या गल्लीतून घराच्या दिशेने मी वळणार इतक्यात मला मागून ती येताना दिसली. नेहमीप्रमाणेच सोबत मैत्रिणी होत्या. मी चटकन डाव्या बाजूला असलेल्या पाण्याच्या पिंपामागे लपलो. का..? माहीत नाही..

ती पुढे निघून गेली. मी हा असाच लपलेला.

'आज घर पाहायचं का तिचं..'

मनात तो विचार आला तसं दडपणही आलं. एकतर मी ऐकून होतो की तिचं घर शाळेपासून बरंच लांब आहे. आणि मुख्य बाब म्हणजे माझ्या खेळण्याच्या, फिरण्याच्या जागेचं एक ठराविक वर्तुळ घरातल्यांनी आखुन ठेवलेलं होतं. ते वर्तुळ ना मी कधी पार करण्याचा प्रयत्न केला होता, ना तितकं धारीष्ट्य तेव्हा माझ्यात होतं. तरीही सुरक्षित अंतरावर ती पोहोचताच माझी पाऊले आपसुकच तिच्या पाठोपाठ चालू लागली. संमोहनच... दुसरा कुठला शब्द त्या अवस्थेला न्याय देऊच शकला नसता. अगदी संमोहीत होऊन पण तरी जराशी दुरी ठेवून तिच्या मागे मी दबक्या चाहूलीने चालत होतो.

सुमारे आठ-दहा चाळी, एक सार्वजनिक शौचालय, एक मैदान आणि दोन कचराकुंड्या इतक्या खुणा कश्याबश्या लक्षात ठेऊन शेवटाला तिला घरात घुसताना पाहीलं आणि तेव्हाच दम घेतला. हाट्.. इतक्या लांब कुणाचं घर असतं का..? जवळजवळ वीस मिनिटे लागली असतील तिथे पोहोचायला आणि आता परत तेवढाच वेळ उलटं माझ्या घरी जायचं. एकतर एवढ्या लांब मी कधी आलो नव्हतो. तिथला सगळा परीसर माझ्यासाठी नवा. आता जर लगोलग माघारी फिरण्याची घाई केली नसती, तर रस्त्यावरच्या सगळ्या खाणाखुणा विसरायची भिती.

  मी उलट दिशेने झपाझप चालू लागलो. उशीर झाला त्यावर घरी काय सांगायचे यावरती चालताचालताच विचारमंथन करु लागलो. आणि घरची आठवण येताच माझ्याही नकळत मी धावू लागलो. त्याचा व्हायचा तो परिणाम होऊन कचराकुंडीच्या जवळची दोन कुत्री जोरजोरात भुंकत माझ्या मागे येऊ लागली.

सत्यानाश्... कुठून हे सुचलं.. मनात स्वत:शीच बोलत काहीसा घाबरलेला मी. शक्य तितक्या वेगाने धावू लागलो. त्यात ती कुत्री पिच्छा सोडायला तयार नव्हती. कसाबसा वाटेत आलेल्या शौचालयाच्या दिशेने जीव खाऊन पळालो आणि आतून दार पटकन ढकलून उभा राहीलो.

आता सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था मी काय वर्णावी. मला एकतर आतून कडी लावायची जाम भीती वाटायची. कसाबसा पाच-दहा मिनिटात बाहेरचा गुरगुराट बंद झाला तसा मी हळूच दार उघडून आसपासचा धोका निवळल्याची खात्री करून घेतली आणि तिथून थेट सुसाट मी घरी येऊन थडकलो. घरी कुणाला काही भनक लागून दिली नाही.

दुसऱ्या दिवशी ती शाळेत आली नव्हती. सुरुवातीला काही वेळ तिची आठवण आली, पुन्हा मी आपल्या रोजच्या दंगामस्तीकडे लक्ष केंद्रित केले. त्यादिवशी घरी आल्यावर गृहपाठ करता करता विरंगुळा म्हणून मी रफवही काढली आणि उगाचच गिरगाटा करु लागलो. मग त्या वहीचं एक पान फाडलं. माझं अक्षर एवढं काही खास किंवा सुंदर नव्हतं. माझी मोठी बहीण तर मला नेहमी म्हणायची, निलू तुझं अक्षर म्हणजे ओळीने कोंबड्या अंडी द्यायला बसल्यासारखं दिसतं. म्हणून मग मी माझ्याकडचा एक सुंदर रंगीत पेन घेऊन काहीतरी नक्षीकाम करण्याचा विचार करु लागलो.

काय करावं काय लिहावं असं मनाला विचारता विचारता शेवटी मी प्रेमपत्र लिहायला सुरुवात केली. बरं त्यातला अनुभव वगैरे काही नव्हता. जसं सुचलं तसं ते खालीलप्रमाणे होतं.

"  I love you..."

"मैं तुमसे बहुत प्यार करता हूं..."

"मी तुझ्यावर खुप प्रेम करतो... "

गाळलेल्या जागेवर अर्थात तिचे नाव होते. तसं ते प्रेमपत्र तिला द्यायचा वगैरे विचार अजून केला नव्हता.
लिहीलेल्या त्या फिकट जांभळ्या मजकूराला निळ्या बॉलपेनने आऊटलाईन देऊन त्याची शोभा आणखीन वाढवली.

बरं आता ते लिहीलेलं कुठे ठेवावं किंवा लपवावं या विवंचनेत असताना नकळतच माझा डोळा लागला, आणि सगळा बट्ट्याबोळ झाला.

काही वेळानं जाग आली तेव्हा मोठा भाऊ दरवाज्यात उभा राहून मोठ्या आवाजात मी लिहीलेलं प्रेमपत्र वाचत होता.

"अरर्ररे्रेरे्... काय करतोयसं..." मी झटक्यात उठून त्याच्या जवळ जाऊन ते पान हिसकावुन घेण्याचा प्रयत्न करु लागलो. ते पान माझ्या हाती लागू नये म्हणून तितकाच कसोशीचा प्रयत्न मोठा भाऊ करत होता.

तितक्यात आतून आई बाहेर आली. आता काही खरं नाही हे माझ्या ध्यानात आलं. तिला पाठ करून असलेला भाऊ मला वाकुल्या दाखवत हसत होता आणि ते प्रेमपत्र पुन्हापुन्हा मोठ्याने वाचत होता.

एका क्षणात मी पवित्रा बदलला आणि साळसूदपणाचं सोंग घेत आईला म्हणालो,

"बघ बघ मम्मी.. ह्याने काय लिहीलेयं..."

माझ्या भावाने मागे वळेपर्यंत चपाचप दोन-तीन चापट्या आईने दिल्याच.  पण तिच्या चेहऱ्यावर राग वगैरे नव्हता. तिच्या मुलांच्या मर्यादा तिला ठाऊक होत्या.

"काय उचापात्या चाललेत.." आईनं किंचित रागात असल्यासारखं विचारलं.

"अगं.. मम्मी... मी कुठे... हा.. अक्षर बघ.. ओळीने कोंबड्या अंडी घालायला बसलेत...." मोठ्या भावाचे हे शब्द तर ऐकू आले पण तोपर्यंत मी मागच्या मागे पसार झालो होतो.

एक-दोन तासांनी संध्याकाळ होऊ लागली तसा मी काही घडलेच नसल्याच्या आविर्भावात घरी येऊन अभ्यासाचं पुस्तक काढून बसलो. भाऊ त्याच्या तालात काहीतरी करत बसला होता. बहीण एका कोपऱ्यात वहीमध्ये अभ्यास खरवडत होती. आई आत जेवण बनवण्याच्या तयारीला लागलेली.

काही कामानिमित्त आई बाहेर आली. काम झाल्यावर माझ्याकडं वळून तिनं विचारलंच..

"काय लिहीलेलं ते.. हे काय वय आहे का असलं काय करायचं.."

भाऊ, बहिण दोघं माझ्याकडे निरखुन पाहत होते. एव्हाना आईने बहीणीजवळची स्टीलची पट्टी हातात घेतलेली. आता शेवटचं बचावाचं पाऊल म्हणून काहीतरी प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं.

"मी तुला विचारतेय.. ऐकायला येतंय का...?" पुन्हा आईचा आवाज आला आणि मी शांतपणे मोठ्या भावाकडे पाहत म्हणालो,

"बोल ना.. आता का तोंड बंद आहे.... कुणासाठी लिहीलेय ते..."

तत्क्षणी माझ्या पाठीत फाट् करुन ती स्टीलची पट्टी पडली आणि माझं तोंड रडवेलं झालं.

माझ्या बचावाच्या त्या शेवटच्या प्रयत्नावर माझी बहीण, माझा भाऊ जोरजोरात खिदळत हसू लागले आणि त्यांना सोबत म्हणून आईही जोरात हसू लागली. 

तो कारनामा माझ्या वयाशी ताळमेळ घालूच शकत नव्हता.

त्या सर्वांना हसताना पाहून डोळ्यांतले अश्रू पुसत मीही हसु लागलो.

त्यानंतर पुन्हा कधी त्या मुलीचा विचार डोक्यात आला नाही.


पहिले प्रेमपत्र पहिले प्रेमपत्र Reviewed by Nilesh Desai on January 01, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.