शहरातली भूतं

शहरातली भूतं


  डिसेंबर महिन्यातला पहीला आठवडा. त्यावर्षी थंडीही कडाक्याची पडली होती. पहाटे चार-सव्वाचारच्या सुमारास बस भांडूप स्टेशनजवळच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर थांबली. क्लिनरने आवाज देत थांबा आल्याचं कळवताच किशाण्णा त्याच्या तरण्या पोरीला पुढं करून खाली उतरला.

बस भुर्रकन निघून गेली. पहाटेच्या वेळेस कुठं वाहनांची गर्दी असते, त्यामुळे पाच-दहा घटकेत बस त्यांच्या दृष्टीआड झाली. किशाण्णानं सगळ्या परीसरावर एकदा नजर फिरवली. आसपास नीरव शांतता पसरलेली होती. अधुनमधून एखादी गाडी यायची आणि निघून जायची. दोन मिनिटे थांबून किशाण्णा पोरीला चल म्हणाला आणि तिथून मग ते दोघे स्टेशनच्या दिशेने चालू लागले.

रस्त्यात कुठेकुठे दुकानांच्या बंद शटर बाहेर झोपलेली माणसं होती. अधुनमधून एखाददुसऱ्या कुत्र्याचे भुंकणे ऐकू येत होते. अजून उजाडले नसले तरी रस्त्यावरच्या दिव्यांमुळे किशाण्णाला हायसे वाटले होते. थंडी फारशी असली तरी त्या दोघांवर तिचा जास्त काही परीणाम होत नव्हता. गावची थंडी यापेक्षा कित्येक पटीने अधिक असायची. स्टेशन जवळ येऊ लागलं तसा वातावरणात एकप्रकारचा जिवंतपणा येऊ लागलेला. 

किशाण्णाच्या डोक्यावर एक बॅग आणि एका हातात कपड्यांची पिशवी होती. त्याच्या पोरीच्या हातात तिच्या कपड्यांचं गाठोडं आणि बारीकसारीक सामानाची वरून चिंध्यांनी तोंड झाकलेली कापडी पिशवी होती.
स्टेशनवर पोहोचताच किशाण्णाने तिकिट खिडकीवर जाऊन कल्याणची दोन तिकिटं काढली आणि फलाटावर येऊन दोघांनी आपल्याकडचं सामान खाली जमिनीवर ठेवलं.

"हुश्श्... दमलीस का रमे.." किशाण्णाने स्वतःच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत मायेनं त्याच्या पोरीला रमाला विचारलं. त्याला रमाकडे पाहून समाधान वाटत होतं.

"न्हाय बां.. एवढ्याच्यानं कुठं दम लागतुय व्हं कवा.." रमा तितक्याच लडिवाळपणे म्हणाली.

लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी किशाण्णाला हे कन्यारत्न झाले होते. त्यासाठी कित्येक नवस त्याने आणि त्याच्या पत्नीने केले होते. रमा तीन वर्षांची असताना एका अल्पश्या आजाराचे निमित्त करून किशाण्णाची पत्नी त्यांना कायमचे सोडून निघून गेली. एकुलती एक पोर किशाण्णानं तिला तळहाताच्या फोडासारखं जपलं.

किशाण्णा साधारण पन्नाशीच्या पुढं गेलेला. वर्णानं सावळा, डोळे काहीसे बारीक. नाक थोडे भज्यासारखे खाली फुगलेले. जाड ओठ आणि त्यावर दाट मिश्या. गावच्या मातीत कष्ट करत आलेला म्हणूनच अजुनही धडधाकट म्हणावा असा. वयानुसार आता कुठे सुरकुत्या पडायला लागल्या होत्या. पण तरी खंबीर असा. संबंध आयुष्य गावीच काढलेलं. पण पोरीवर बेतलेल्या विचित्र संकटामुळे नाईलाजाने तो गावाला कायमचा रामराम करून इकडे मुंबईत आला होता.

रमा याउलट अगदी नाजूक. सडपातळ बांधा, दिसायला देखणी. सवर्ण कांतीची. लांब केसांची. बारीक आवाजाची. पंधरा-सोळा वर्षाची असावी ती. तिनं गाव कधी सोडलं नव्हतं. नाही म्हणायला आजूबाजूच्या एखाद्या गावी बाप जत्रेला घेऊन जायचा. यंदा दहावीला होती, पण शाळा अर्ध्यावर सोडून आज बापासोबत मुंबईला यावं लागलं. त्यामागचं कारण तिला तितकसं माहीत नव्हतं. पण बाप आपल्या भल्यासाठीच करतोय यावर विश्वास होता तिचा.

पहीली ट्रेन यायला अजून बराच अवकाश होता. रमा फलाटाच्या आसपास पाहत हरवली होती. पलीकडच्या फलाटावर दोन माणसं अगदी त्यांच्या समोरच झोपली होती. लांब कुठे चार-पाच जण विखुरलेले होते, बहुधा ते दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत असावेत. ती ज्या फलाटावर होती त्या फलाटावर अगदी शेवटच्या टोकाला एक माणूस बसलेला तिला दिसला. बाकी बंद असलेले रेल्वे कॅन्टीन, वजन सांगणारी मशिन असं एक एक करत रमा सारं काही न्याहाळत होती.

किशाण्णा दूर कुठंतरी शून्यात हरवला होता. डोळ्यांवर पेंग होती पण इतक्यात झोपायचं नाही हा निर्धारच जणू त्यानं केला होता. मागच्या चार रात्री त्याचा नीट डोळा लागला नव्हता. भयानक अश्या स्वप्नाप्रमाणं त्या रात्री त्यानं घालवल्या होत्या. आताही बसल्या बसल्या ते प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागले होते.

घरातल्या कामांसोबत रमा शेतीच्या कामातही किशाण्णाला थोडाफार हातभार लावायची. जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यावर त्यांचं बऱ्यापैकी भागत होतं. पण चार दिवसांपूर्वी ते विपरीत घडलं. रात्रीच्या वेळी अवचित पाणी प्यायला उठलेल्या रमाला खिडकीतून शेजाऱ्याचं वासरू सुटलेलं दिसलं. तिनं तसंच लगोलग घराबाहेर पडत सगळ्यांना आवाज देत त्या वासरामागे धाव घेतली. तिच्या आवाजाने किशाण्णाला जाग आली आणि शेजारचे बाहेर येण्याअगोदर तो अंगणात हजर झाला.

समोरच्या पांदीतून ओढ्याच्या दिशेनं जाणारी रमा त्याला दिसली. तोपर्यंत शेजारीही बाहेर आले होते. किशाण्णा रमाला हाक मारेस्तोर ती पांदीतून दिसेनाशी झाली. बस्स् एवढाच तो प्रकार.. त्यावर किशाण्णानं पोरीला जाऊन परत घरी आणली. तिला दिसलेलं वासरू ओढ्याच्या आसपास कुठेही नव्हतं. तिकडे असणार कसं..? ते शेजाऱ्याच्या गोठ्यात दावनीला बांधलेलं तसंच होतं.

मग इतक्या रात्री पोरगी अचानक बाहेर गेली कश्याला..? ती आपल्याशी खोटं तर बोलणार नाही.. तिला भास झाला असेल का..? की आणखी काही..? या असल्या विचारांनी किशाण्णाच्या डोक्यात काहुर उठलं होतं. कुस बदलून झोपायचा प्रयत्न करतोच की, आतल्या खोलीतून रमाची किंकाळी ऐकू आली.

आता काय झालं... किशाण्णा धावतच आत गेला, आणि समोरचं दृश्य पाहून भेदरला. ही आपली रमाच आहे का.. असा प्रश्न त्याला तेव्हा क्षणभर पडला. रमाचा अवतार, तिची केसं, डोळ्यांतली बुब्बळं.. होती का..? रमाच्या किंकाळीनं आजूबाजूच्या घरांतली बायामाणसं लगबगीनं तिथं आलीत. त्या सगळ्यांना पाहुनच किशाण्णाला धीर आला होता.

"मला जाऊ दे.. मला बाहेर जायचंय.." रमा विक्षिप्तपणे घोगऱ्या आवाजात ओरडत होती.

कसंबसं किशाण्णाने तिच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. शेजारीपाजारी आपापले तर्क लावून सल्ले देऊन निघुन गेले. रात्रभर रमा काहीतरी पुटपुटत होती. किशाण्णा जरा पेंगू लागला की बाहेर पळायला पाहत होती. म्हणूनच किशाण्णा रात्रभर दरवाज्यात पहारा देत बसून होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी रमा शांत होती. तिला रात्रीचे काहीच आठवत नव्हते. हा पण सकाळनंतर तिला ताप भरला होता. डॉक्टर येऊन तपासून गेले. किशाण्णाने तरीही खबरदारी म्हणून देवाचा अंगारा तिला लावला. त्या रात्रीही पुन्हा तेच. रमा भलतेच काही पुटपुटत बाहेर पळायला पाहत होती. तिसऱ्या दिवशी पुन्हा ताप.. डॉक्टर.. बाहेरचं काही असावं तर तेही तीन-चार ठिकाणी दाखवून पाहीलं. पण कश्याचा काही उपयोग होत नव्हता.
नेमकं रात्रीच रमाला तो त्रास व्हायचा, जणू कुणी खुणावत असल्याप्रमाणे सारखं बाहेर पळायला पहायची. सकाळ झाली की तिला रात्रीचे काहीच आठवत नसे. पण अंग मात्र फारफार तापायचे.

चौथ्या रात्री जेव्हा रमा बाहेर पडता येत नसल्याने स्वत:चे कपडे फाडण्याचा प्रयत्न करु लागली, तेव्हा मात्र किशाण्णा हादरला. आसपासच्या जमावातील एकानं सुचवलं, मुंबईला घेऊन जा.. तिकडं नीट तपासणी पण होईल आणि हे बाधलेले जे काही आहे ते मुंबईपर्यंत पाठलाग करणार नाही. शहरात कुठं भूतं असतात..?
किशाण्णाला तो सल्ला पटला. 

ती रात्र कशीबशी त्यानं काढली. सकाळी फोन करून मुंबईत राहणाऱ्या त्याच्या लहान भावाला कळवले. आणि संध्याकाळची गाडी पकडून तो रमाला घेऊन मुंबईला आला. तसा याअगोदर दोनवेळा तो भावाकडे येऊन गेला होता. पण गाव सोडण्याचा विचार त्याला कधी शिवला नव्हता. यावेळी पर्याय नव्हताच. मुलीच्या काळजीने बैचेन झाला होता तो.

रेल्वे फलाटावर कसा एक-सव्वा तास निघून गेला कळालेच नाही. दूरून येणाऱ्या ट्रेनच्या भोंग्याच्या आवाजाने  किशाण्णा भानावर आला, तेव्हा त्याला कळलं की नुसत्या त्या प्रसंगांच्या आठवणीनेच तो घामाघूम झाला होता. त्यानं रमाकडं पाहीलं, बसल्याबसल्याच तिचा डोळा लागला होता.  पण कालची रात्र बसमध्ये शांततेत गेली होती. तिला उठवताना त्यानं अंगाला हात लावून पाहीलं, ताप नव्हताच. किशाण्णा त्या विचाराने सुखावला. इकडं पहील्याच रात्रीपासून पोरीत फरक पडला होता. जे काही गावी होतं ते इतक्या लांब निश्चितच आलं नसल्याची त्याला खात्री झाली.

ट्रेन फलाटावर आली आणि ती पकडण्यासाठी किशाण्णा घाईघाईने सामान उचलू लागला. नेमका ट्रेनचा दरवाजा पाच-दहा पावलं मागेच आला. अख्ख्या हयातीत ट्रेनशी संबंध फक्त दोनदाच आला होता. ते पण कधीकाळी शेवटचा तो भावाकडे आलेला तेव्हा. लगबगीने डोक्यावर जड बॅग घेत किशाण्णा कपड्यांची पिशवी चाचपडू लागला. कशीबशी ती हातात यावी तसा ट्रेनने हॉर्न दिलाच. गडबडीत पोरीला मागून यायला सांगत किशाण्णा कसाबसा धावत दरवाज्यात गेला आणि ट्रेन हलली.

"पोरे चढलीस का..?" म्हणून मागे वळून पाहावं तर रमा बिथरुन तशीच उभी दिसली. तिच्यासाठी ते साफ नविन होतं. रमा आत जाण्याच्या प्रयत्नात असतानाच गाडी सुरू झाल्यामुळे ती बावचळली.

"अगं ये.... रमे....!" किशाण्णा ओरडेपर्यंत गाडीनं वेग घेतला. त्याचा हतबल झालेला चेहरा दिसेनासा होईपर्यंत रमा त्याकडे केविलवाणा नजरेनं पाहत होती. तिच्या नकळत डोळे पाणावले होते तर मनही कमालीचे भेदरले होते.

बाप दिसेनासा झाला तसे फलाटावर कुत्र्यांचं लोंबाळं भांडत भांडत आलं. त्या गोंधळानं अधिकच भेदरलेली रमा तिथून वाट भेटेल तशी पळत सुटली.

"दुसरा दिवस उजाडला, आर अजूनबी पोलिसांना सापडत न्हायं.." किशाण्णा रडवेल्या अवस्थेत त्याच्या भावाशी बोलत होता, तोच घरातल्या खिडकीजवळचा मोबाईल वाजला. घर अर्थातच भावाचे होते. आपल्याकडून काही शोधायचे राहून गेले का? असाही विचार मनात येत होता.

मागे राहीलेल्या रमाला आणण्यासाठी किशाण्णा पुढील स्थानक मुलूंडला उतरला होता. मुंबईकडे जाणारी लोकल वीस मिनिटांनी येणार होती. इतका वेळ आपल्या एकट्या बिचाऱ्या पोरीचे काय हाल होतील, याची किशाण्णाला कल्पनाही करवत नव्हती. पहील्यांदाच इकडं आलेली, त्यात एकटीच.. देव करो अन् तिच्यावर कसली भलती आफत न येवो. किशाण्णा मनोमन प्रार्थना करत होता.

जीव खायला उठलेली ती चाळीस मिनिटे कशीबशी गेली. भांडूपला उतरून तो पळतच एक नंबर फलाटावर आला, पण.. पण रमा तिथं नव्हतीच. आसपास सगळीकडं धुंडाळलं पण नाही..

हतबल झालेला किशाण्णा दिसेल ती वाट नेईल तिथपर्यंत जात होता. रमाला मोठमोठ्याने हाका मारत होता. रस्त्यात एखाददुसरं कुणी दिसलं की विचारत होता. आणि पुन्हा स्टेशनजवळ येऊन दुसरी वाट पकडत होता. भावाला कळवलं तसं तोही तिथं येऊन शोधाशोध करु लागला.

दुपारपर्यंत नैराश्याशिवाय काही हाती लागलं नाही, तसं भावानं जवळच्या पोलिस चौकीत जाऊन संबंधित प्रकार कळवला. तोपर्यंत किशाण्णाची अवस्था शब्दांत व्यक्त करण्याजोगी नव्हती. त्याला कसाबसा भावाने कल्याणला घरी आणला. रमाच्या काळजीतच ती रात्र देखील तळमळत गेली.

आज सकाळी आलेला फोन पोलिसांचाच होता. फोन ठेवल्यावर काही न बोलता तासाभरात किशाण्णाचा भाऊ त्याला घेऊन पोलीस चौकी वर  हजर झाला. तिथून मग पोलिसांच्या जीपमधून त्यांना कुठेतरी नेण्यात आले. रस्त्यात संबंध वेळ किशाण्णा आपल्या पोरीच्या सलामतीचं मागणं परमेश्र्वराकडे मागत होता.

जीपमधून उतरताच किशाण्णाच्या मनावरचा ताण अधिकच वाढला.  मैदान सदृश्य छोटीशी उकिरड्यासारखी जागा असूनही बरीच गर्दी जमली होती. सगळीकडे अस्ताव्यस्त कचरा आणि घाण पडलेली. डाव्या बाजूला नजर गेली आणि ओळखीचं काहीतरी दिसलं म्हणून किशाण्णा तिकडे धावला. रमाच्या कपड्यांची पिशवी.

भाऊ आणि पोलिस थोडे पुढे गेले होते. त्यांच्यामागून किशाण्णाही तिथं गेला आणि तसाच ओकारी काढत मागं फिरला. चेहरा घामानं डबडबलेला.. डोळ्यांतून नकळत पाणी पाझरू लागलेलं. त्यानं पुन्हा त्या दृश्याकडे मान फिरवली.. यावेळी ते पाहील्यावर त्याला ओकारी वा शिसारी वा किळसवाणं असं काही वाटलं नाही. तो आणखी पुढे जाऊ लागला तसं पोलिसांनी त्याला थांबवलं.

समोर नग्न अवस्थेत रक्ताळलेलं त्याच्या पोरीचं शव निपचित पडलं होतं. अंगावर चिंधी म्हणावी असं काहीही शिल्लक नव्हतं. दोन वेण्या सुटून केस विस्कटलेले. पायातले पैंजणही गायब होते. तिच्या आसपास कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. सोळा वर्षांची कोवळी पोर कुणाच्यातरी वासनेची शिकार झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार एकापेक्षा अधिक जणांचे ते दृष्कृत्य होते. उपभोगून झाल्यावर तिचं तोंड कायमचं बंद करून तिला या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं होतं.

किशाण्णाचा श्वास अडकून होता. दोन दिवस पाणी न लागल्यानं केस राकट झाले होते. काहीतरी बोलावसं वाटत होतं त्याला पण प्रयत्न करूनही शब्द बाहेर पडत नव्हते. आतल्याआत खदखदत असल्यासारखं. करुणा, माया, राग, द्वेष असे एकापाठोपाठ एक भाव त्याच्या चेहऱ्यावर येत होते. ते सगळं सोसण्यापलीकडचं वाटत होतं.
त्याच्या भावाने मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा कुठे भानावर येत त्याने हंबरडा फोडला. शब्द हळूहळू फुटू लागले. रमाच्या त्या अवस्थेवर तो स्वत:ला सर्वस्वी दोषी मानत होता.

"तिची अवस्था पाहून गावातल्या भूतापासून लांब शहरात आणलं, आणि इथं तर आणखी भयाण बघावं लागलं.. गावचं भूत बरं होतं, त्यानं निदान असलं काय घाणेरडं तरी केलं नसतं.. उगाच आणलं तिला.. कोण म्हणतं शहरात भूत नसतं. आरं पाक पिसाट अन् अंगाला हपापलेली भूतं इकडंच असत्यात." किशाण्णा रडत आपल्या भावाजवळ शोक व्यक्त करत होता.

डेडबॉडीला पंचनाम्यासाठी घेऊन जाण्याची वेळ आली होती.

"रमेऽऽ.." किशाण्णाच्या थरथरत्या आवाजातली ती आर्त किंकाळी जमावातल्या प्रत्येकाचं ह्रदय चिरुन गेली.


समाप्त


शहरातली भूतं शहरातली भूतं Reviewed by Nilesh Desai on January 12, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.