आठवणीतला ठोंबे - भाग एक


 "जर A = B आहे आणि B = C असेल तर याचाच अर्थ A = C होतो, 'लक्ष्या' आलं का..?" पाटील सरांची फळ्यावरची खाडखूड करून झाली आणि त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे मागे वर्गाकडे वळत दोन्ही भुवया चारचार वेळा उंचावून प्रश्न विचारला. त्यांचा तो ठरलेला प्रश्न असायचा, हमखास प्रत्येक वाक्यानंतर येणारच असा. त्यातही 'लक्ष्यात' ला 'त' पाटील सरांच्या मुखी कधीच आला नाही, तो सायलेंटच असायचा. आणि मग त्या ठरलेल्या प्रश्नाला आमचेही खास ठेवणीतलेच उत्तर असायचे.

"हो.. सर... लक्ष्या आला..." आम्ही नंदीबैलासारखं मान डुलवत हो ला हो करायचो, बाकी ते कुणाला कितपत समजलेय वगैरे भानगडीत कुणीही पडायचे नाही. त्या दिवशी सुद्धा असेच काही घडले. पण जसे आमचा सुर कमी झाला तसे अचानक एक आवाज मागून ऐकू आला.

'मास्तर... विषुववृत्त म्हणजे काय...?"

  तसं तर हा आवाज माझ्या ओळखीचा असल्याकारणाने मी चटकन तो कुणाचा आहे ते सांगू शकलो असतो. पण जरी त्या विद्यार्थ्याने आवाज बदलून विचारले असते तरी मी खात्रीपूर्वक त्याला मागे वळून न पाहता ओळखले असते. कारण म्हणाल तर त्याने त्या प्रश्नातच तश्या खुणा ठेवल्या होत्या.

एकतर अख्ख्या शाळेत सरांना 'मास्तर' आणि मॅडमना 'बाई' म्हणून संबोधणारा  एकच एक तो होता. शिवाय त्याने जो प्रश्न विचारला होता, त्यातूनही त्याने स्वत:ची ओळख स्पष्ट केली होती. ना त्याने हात वर करून प्रश्न विचारण्यासाठी सरांची संमती घेतली.

सर्वजण मागे पाहू लागले. पाटील सरांच्या चेहर्यावर गंभीर भाव अवतरले होते. तो प्रश्न ऐकून सरांची गणित शिकवण्याची उरलीसुरली इच्छा ही निघून गेली असावी असे वाटते. सर धीरगंभीर पावलं टाकत मागे शेवटच्या बाकाकडे जाऊ लागले.

तो मख्ख उभा. त्याच्या चेहऱ्यावर आता हळूहळू प्रसन्नता येऊ लागलेली. आपण समाजोपयोगी काहीतरी केले आहे अथवा प्रतिनिधी म्हणून आपण हा प्रश्न विचारुन या इतर कुचकामी विद्यार्थ्यांवर उपकार केले आहेत वा संसदेत एखाद्या अतिमहत्त्वाच्या विषयाला आपण हात घालून चोख काम बजावले आहे, अश्या काहीश्या आविर्भावात तो पाहत होता. गालांत मंद हास्य. हातात वर्तमानपत्राचे कव्हर घातलेले पुस्तक. सरांच्या नजरेला नजर भिडवित तो उभा.. राजकुमार ठोंबे..

  पाटील सर त्याच्याजवळ पोहचून त्याला मारण्याच्या पावित्र्यातच होते. सगळा वर्ग श्वास रोखून त्यांच्याकडे पाहत होता. ठोंबे मात्र अजूनही आपल्याच नादात स्मित करीत होता.

इतक्यात तास संपल्याची घंटा झाली. इतर कुणाचे माहीत नाही पण मी सुटकेचा निःश्वास सोडला. पाटील सरांनीही तत्परतेने स्वत:ला आवरले. त्यांची नजर ठोंबेच्या हातातील पुस्तकावर गेली. अवघ्या एका घटकेत सरांच्या चेहर्यावरचा राग जाऊन तो चेहरा आता केविलवाणा दिसू लागला होता.

"ठोंब्या.. गाढवा.... गणिताच्या तासाला भूगोलाचं पुस्तक काय घेऊन बसलायस.." सरांनी अगदी साळसूदपणे विचारले.

"नाही मास्तर... पहीले मी गणिताचेच पुस्तक काढले होते. पण अचानक मला कालचा गृहपाठ करताना अडलेले शब्द आठवले, भूगोलाचे पुस्तक काढले पण कळालं नाही म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं.." ठोंबेने अडखळत स्पष्टीकरण दिले.

"मग ते तु भूगोलाच्या मॅडमना विचारायला हवे.." पाटील सर पुढल्या वर्गाकडे जाण्यासाठी आवराआवर करत म्हणाले.

"अम्म्... नाही सर बाईंना वाईट वाटेल त्यांनी शिकवलेलं कळत नाही म्हटल्यावर.. म्हणून तुम्हाला...." ठोंबेचं वाक्यं अर्धवटच राहीलं. सर त्याला खाऊ की गिळू अश्या नजरेनं पाहत दुसऱ्या वर्गावर निघून गेले.

ठोंबे सुरूवातीपासून काही माझ्या वर्गात नव्हता. म्हणजे मी ज्युनिअर के जी पासून ते दहावीपर्यंत बऱ्याच चेहऱ्यांना प्रत्येक वर्षी माझ्या वर्गात पाहीले आहे. निश्र्चित सांगता यायचं नाही पण बहुधा पाचवीपासून तो माझ्या दिसण्यात आला असावा. साफ निर्मळ स्वभाव, बिनधास्त जे मनात तेच मुखात अश्या स्वभावाचा. कधीकधी अर्धवट वाटायचा तर कधी कधी असामान्य असा.

‌ अर्धवट यासाठी वाटायचा कारण बऱ्याचदा गोष्टी करुन झाल्यानंतर त्याला कळायच्या. आणि असामान्य यासाठी वाटायचा कारण केलेल्या चुकांची पटकन जबाबदारी स्वीकारून तो ती चूक दुरुस्त करण्यासाठी झटायचा.
अश्या त्याच्या हातून घडलेल्या जवळपास सर्व चूका त्याने हातोहात निस्तारल्या होत्या. मग त्या एखाद्याच्या लक्षात येण्याअगोदर असो वा कुणाला कळाल्यानंतर, काय फरक पडतो.

  पण जसं प्रत्येक गोष्टीला काहीना काही अपवाद असतोच तसेच आमच्या ठोंबेच्या बाबतीतही घडलेच. काही चूका निस्तरण्याच्या नादात त्याच्याहातून भलतेच पराक्रमही घडले होते.

एकदा झाले असे की इयत्ता सातवीत असताना एके दिवशी आम्हाला कार्यानुभव विषयाच्या मॅडमनी माचिसच्या पेटीपासून खुळखुळा बनवायला शिकवले. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला घरुन तसा खुळखुळा बनवून आणायला मॅडमनी सांगितले.

"ज्याचा खुळखुळा मला सर्वात जास्त आवडेल त्याला माझ्याकडून एक पेन.." मॅडमनी बक्षिसाची घोषणा केली आणि आम्हा सर्वांमध्ये मग चुरस लागली.

"कोणाचा खुळखुळा जिंकणार...? तु कसा बनवणार..? गोटीव पेपर, जिलेटीन पेपर... काय कसे लावायचे...?" जो तो वर्गात एकमेकांना विचारत होता. समोरच्याची रणनीती समजून घेऊन आपण त्यापेक्षा अधिक आकर्षक काय करू शकतो, याकडेच सगळ्यांचा कल होता.

त्या गडबडीत मला मागून कुणीतरी हात लावला म्हणून मी मागे वळून पाहिले. आणि त्याक्षणी पहील्यांदाच माझा ठोंबेशी सामना झाला.

"पेन्सिल दे ना जरा.." मागच्याने मला प्रेमळ आज्ञा केली.

दिसायला जरासा सावळा. तेलीराम तेल्यासारखं तेल चोपडून केस चिटकवलेलं डोकं. एका नाकपूडीची कडा काहीशी हिरवट असावी बहुतेक, जिचं विश्लेषण आता करता येणं अवघड आहे. जाडसर ओठ आणि त्यांमधून बाहेर डोकावणारे चार दात. असं काहीसं साधारण वर्णन होतं जेव्हा मी पहिल्यांदा ठोंबेला पाहीलं.

मी अवाक् होऊन त्याचा अवतार पाहतच होतो की पुन्हा त्याने विचारले. खरंतर त्यावेळी मला त्याला फुकटचा सल्ला देण्याचीही इच्छा नव्हती, मग पेन्सिल तर खुप लांबची गोष्ट होती.

"मला काम आहे पेन्सिलचे..." मी तुटकपणे म्हणालो.

"अंह् हॅहॅहॅ..हाहा.." उगाचच उसनं हसत तो पुढे बोलू लागला.

"मी मुद्दामच मागितली, मला गरज नाही.. अम्म... मी राजकुमार.." तो म्हणाला.

मी अजूनच आश्र्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होतो. 'राजकुमार..' हा ठोंब्या किंवा माठ्या दिसतोय.. याचं नाव राजकुमार..!  माझ्या मनात ते नाव आपोआप घोळवले गेले.

"तू मला ठोंबे म्हणू शकतो.." त्याने आपले म्हणणे पुढे रेटले.

ह्याला आपल्या मनातलं कसं कळलं..? कमाल आहे हा मुलगा मला एकामागोमाग एक धक्के देत आहे असे वाटले.  मी शांत आहे ते पाहून त्याने स्पष केले.

"अरे.. म्हणजे माझं आडनाव ठोंबे आहे.." तो किंचित हसत म्हणाला. याअगोदर मला यत्किंचितही कल्पना नव्हती की 'ठोंबे' हे कुणाचं आडनाव असू शकतं. पण होतं.. आणि असू शकतं, हे त्याला भेटल्यावर समजले.

"मग पेन्सिल नको आहे तर काय काम आहे..?" मी अजूनच ताठत विचारले.

"असंच.. अॅह्ह्..हॅहॅहॅ...हाहिहाहा..." ठोंबे एकटाच हसत होता.

मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा 'खुळखुळा' कसा उत्तम बनवायचा यावर इतरांशी चर्चा करु लागलो. दोनेक मिनिटांनी सहज म्हणून वर्गावर नजर फिरवली, प्रत्येकजण एकमेकांशी संवाद करण्यात गुंग होता, एक सोडून. अर्थातच ठोंबे.. तो आपल्याच नादात सर्वांना न्याहाळत असावा, त्याची नजर फिरून माझ्यावर आली तसा मी पटकन मान वळवून पुढे पाहू लागलो. हा ठोंब्या काय खुळखुळा बनवणार, याची मला एव्हाना कल्पना आली होती.

तर अशी ही आमची पहीली भेट होती. तसं अजून तरी त्यात तुम्हाला नवल असे वाटले नसेलच.. हा केवळ ठोंबेचा परीचय होता. अगदी साध्या आणि तोलून मापून वापरलेल्या शब्दांत..  पण खरी कहाणी पुढेच आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी एकदम झकासपैकी बनवलेला खुळखुळा घेऊन वर्गात शिरलो. एकमेकांच्या खुळखुळ्यांशी तुलना करता मला उमगले की माझाच खुळखुळा जिंकणार. त्यामागे कितीतरी मेहनत घेतली होती मी. कसले कसले रंगबिरंगी पेपर गोळा करून त्याला छान सजवले होते. निश्चितच मॅडमना माझा खुळखुळा आवडणार होता.

कार्यानुभवचा तास सुरु झाला. मॅडम वर्गात आल्या तसे आम्ही सर्वजण आपापले खुळखुळे बाहेर काढू लागलो. ठोंबे त्यादिवशी गैरहजर होता. खुळखुळा बनवलाच नसणार त्याने. अजून काय अपेक्षा करणार त्याच्याकडून. असो, मॅडमनी सर्वांचे खुळखुळे नीट तपासले आणि त्या आता आपला निर्णय सांगणारच होत्या की इतक्यात..

"बाई आत येऊ...?" वर्गाबाहेर हसतमुख ठोंबे उभा. 

डोक्यावर 'BULLS' लिहीलेली कॅप घातलेली.

मॅडमनी त्याला आत घेतले, आम्ही सगळे त्याची कॅप पाहतच होतो. तितक्यात त्याने हातातल्या पिशवीतून तो चमत्कारिक खुळखुळा बाहेर काढला आणि मॅडम समोरच्या टेबलावर ठेवला.

मॅडमचं लक्ष त्या खुळखुळ्यावर गेलं आणि अवघ्या एका घटकेत जणू काही मोहून गेल्याप्रमाणे त्यांची नजर तिथेच खिळून राहीली. ठोंबे गालातल्या गालात मिश्किल हसत होता. त्याने कॅप का घातली असावी हा प्रश्न फक्त मलाच पडला की आणखी कोणाला, हे ठाऊक नाही. मी न राहवून उभा राहीलो आणि त्याचा खुळखुळा निरखू लागलो.

खरं सांगायचं तर हे खुल्या दिलाने कबुल करायला हवं की ठोंबेने त्या कलाकृतीवर बरीच मेहनत केलेली दिसत होती. माचिसच्या पेटीला पिवळ्या रंगाच्या गोटीव पेपरचे आच्छादन लावले होते. त्यावर माणसाचे डोळे, नाक, हसरे ओठ काढले होते. वरती हुबेहूब दिसण्यार्या केसांनी त्या चेहर्याला शोभा आली होती. खाली सजावट केलेली आईस्क्रीमची कांडी पक्की बसवली होती. माचिसच्या पेटीत खडे टाकण्याऐवजी त्याने बहुधा छोटे छोटे घुंगरू भरले असावेत, कारण खुळखुळा हलवल्यावर छानपैकी 'झुनझुन झुनझुन' आवाज येत होता. 

छ्या.... मला अगोदर असं काही का नाही सुचलं.. एकंदरीत ठोंबेचा खुळखुळा खरंच अफलातून बनला होता आणि तोच जिंकणार यात संदेह नव्हता.

मॅडमनी तो खुळखुळा हातात घेतला आणि तो हाताळत असताना मागे वळून न पाहता ठोंबेला म्हणाल्या..

"टोपी काढ ती... शाळेत टोपी घालून यायला कोणी सांगितले.."

ठोंबेने तोंड कसंसं करत टोपी काढली, मॅडमनी फिरून त्याच्याकडे पाहीले आणि "इ्ई्ई्ई्....." करत तो खुळखुळा तसाच खाली फेकून दिला.

टोपीमुळे चपट्या पडलेल्या ठोंबेच्या केसांकडे पाहून अख्खा वर्ग बाकावर हात आपटून आपटून हसू लागला. 

हसणार का नाही.. ठोंबेच्या कपाळावर येऊ शकणाऱ्या मधल्या केसांच्या जागेचा जवळजवळ दोन इंच लांबीच्या प्लॉटवरचे केस बारीक होईपर्यंत कापले होते. फक्त प्रवेशद्वारावरचं गवत बारीक करावं बाकी बगीचा दाट गवताळ असं काहीसं. आजूबाजूच्या केसांना धक्का लागला नव्हता. मॅडम काय ते समजून गेल्या. 

अहो खुळखुळ्यासाठी चक्क त्याने आपल्या केसांची आहुती दिली होती. आणि त्याचं डोकं म्हणजे आता कुणीतरी त्याच्या केसांवर जाण्यासाठी एखादी पायवाट केल्यासारखे दिसत होते.

मॅडमचा चेहरा लालबुंद झाला होता. पण तश्याही अवस्थेत त्यांना देखील हसू फुटले. मला वाटलेले खुळखुळ्याला वर कसल्यातरी पेपरच्या बारीकश्या झिरमिळ्या करून लावल्या आहेत. पण ठोंब्याने स्वत:चे समोर येणारे केस कापून तिथं चिकटवले होते. ठोंबेचा अवतार खरोखर पाहण्यासारखा होता. अख्खा वर्ग त्याच्याकडे पाहत पोट धरून हसत होता. ठोंबे मात्र तसाच शांतपणे मंद हसत सर्वांकडे पाहत होता. त्याला आपली चूक कळाली होती आणि चेहर्यावर साफ दिसत होतं की त्याने ते स्विकारलही होतं.

मॅडमला त्याचा खुळखुळा सर्वात जास्त आवडलेला, फक्त त्या केसांनी जरासा घोळ केला होता. म्हणूनच बक्षिसाचं पेन मला मिळालं. मी खुश झालो, पण खरंच त्यावर माझा अधिकार होता का..? मला वाटतं ठोंबेला बक्षिस देणं म्हणजे त्याने केलेल्या उपद्व्यापाला प्रोत्साहन देण्यासारखं झालं असतं, असा विचार करून मॅडमनी त्याला बक्षिस दिलं नसावं. शेवटी त्या शिक्षक.. त्यांना माणूस घडवायचा असतो. त्यामुळे मॅडम त्यांच्याजागी अगदी योग्य होत्या.

तास संपला तसा मी त्याच्याकडे पाहीले. त्याचा चेहरा खट्टू झाला होता.  मलाही कसेसे वाटले. कोणत्याही बाबीत त्याचा खुळखुळा सरस होता. साहजिकच त्याच्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखे झाले होते आणि भर म्हणून सगळी टारगट मुलं त्याच्या केसांवर कोट्या करत हसत होती. अर्थात अख्खा वर्गच त्याला नावं ठेवत होता आणि त्यात काहीवेळ का होईना मीही हसत होतो.

शाळा सुटली तसे मी त्याला गाठले. "तुझा खुळखुळा मला खूप आवडला.." म्हणत बक्षिसाचा पेन तो नाही नाही म्हणताना असताना मी जबरदस्तीने त्याच्या हातात दिला आणि तडक तिथून निघून घरी गेलो.

आठवणीतला ठोंबे - भाग एक आठवणीतला ठोंबे - भाग एक Reviewed by Nilesh Desai on January 15, 2020 Rating: 5

2 comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.