आठवणीतला ठोंबे - भाग दोन

   ठोंबे म्हणावा तसा कधी कुणाचा मित्र झाल्याचे ऐकिवात नाही. त्याला कारणंही तशीच होती. खुळखुळ्याचा किस्सा सगळे विसरतच होते की एक दिवस अचानक ठोंबे आपल्या भुवया काढून आला.

 सकाळीसकाळी वर्गात तसल्या अवताराचे दर्शन होताच एक-दोन मुली घाबरल्यादेखील. त्यावरून तर शाळेत धुमाकूळ झाला होता. त्याने तसं का करावं याच उत्तर माझ्याकडे नाही. कदाचित कुठल्यातरी चेहऱ्याचं चित्र काढताना त्यावर स्वत:च्या भुवया लावण्याचा मोह त्याला झाला असावा. पण यावेळी शाळेत सगळीकडे तो चर्चेचा विषय ठरला होता. ठोंबेने शिक्षकांचा मारही खाल्ला. जो तो त्याची टर खेचत होता. तो दिवस ठोंबेनं कसाबसा घालवला.

दुसऱ्या दिवशी ठोंबे त्यावर नामी शक्कल लढवून आला. स्वारी काढलेल्या भुवयांच्या जागेवर चक्क काजळ लावून आली होती. एकदम सटीक कोरीवकाम केल्यासारखं काजळ भुवयांप्रमाणेच दिसलं असतं, पण त्यासाठी ते बरेच लांबून पाहण्याची आवश्यकता होती. मी शक्यतो त्याला टाळून असायचो पण ते ध्यान पाहून सगळ्यांसोबत हसून हसून माझीही मुरकुंडी वळली होती. तो प्रसंग माझ्या आयुष्यातल्या मोजक्याच अश्या प्रसंगांपैकी आहे, जो अजूनही आठवला की मला मनापासून खळखळून हसू फुटतं.

ठोंबेच्या करामतींना वैतागून वा शाळेत शिस्त कायम राहावी म्हणून माहीत नाही पण मुख्याध्यापकांनी ठोंबेच्या पालकांना त्याला भुवया पुन्हा उगवेपर्यंत शाळेत न पाठवण्यासंबंधी सांगितले. असे त्याचे उद्योग पाहता कुणी त्याच्याशी खास अशी मैत्री करण्याची शक्यता नव्हती, तसेच तो शाळेत आला काय नाही काय.. कोणाला फारसा फरक पडत नव्हता. हा, चार-पाच टाळक्यांनी मात्र जराशी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या मते ठोंबे पुन्हा येईपर्यंत वर्गात काही मजेदार घडण्यासारखं राहणार नव्हतं.

असो, ठोंबेची सस्पेंड होण्याची ती काही शेवटची घटना नव्हती.

नुकतेच पास होऊन आठवीच्या वर्गात आम्ही आलो होतो. सगळे चेहरे नेहमीचेचं होते. त्यात ठोंबेही होता. तो पास कसा झाला असावा काय माहीत. कारण त्याची अभ्यासाच्या नावाने कायमचीच बोंबाबोंब होती.

तर हा आमचा आठवीचा वर्ग काही दिवसांसाठी दुसऱ्या एका बाकं नसलेल्या खोलीत हलवण्यात आला होता. कोण कुठे बसणार अजून पक्क झालं नव्हतं. बाकं असलेल्या वर्गात जाऊ तेव्हा प्रत्येकाची बसण्याची जागा नक्की होईल, हे सगळ्यांना माहीत होते.

जूनचा साधारण तिसरा आठवडा होता तो. त्यादिवशी माझ्या बाजूला असलेल्या जागेवर ठोंबे येऊन बसला. तसा तो नेहमी मागेच एखादा कोपरा गाठून असायचा पण आज मागच्या जागा भरलेल्या होत्या. मी वर्गावर एकवार नजर फिरवली. खरंच होतं, त्याला बसण्यासाठी दुसरी जागा नव्हती. आम्ही सगळे जमिनीवर बसलो होतो आणि खोली अर्थात वर्ग पूर्णपणे खचाखच भरला होता.

समोर मराठीचे सर शिकवत होते. त्यांच्या डाव्याबाजूलाच दरवाजा होता. म्हणजे शिक्षक समोरूनच येणार, तिथुनच शिकवणार आणि तिथूनच पुन्हा बाहेर जाणार. मागे यायचा प्रश्नच नव्हता. आमच्या पुढे मुलींच्या पाच ओळी, त्यामागे मुलांच्या सहा ओळी, पैकी मी तिसऱ्या ओळीच्या जेमतेम मध्यभागी होतो.

मध्येच सरांनी माझ्या पुढच्या मुलाला काहीतरी विचारलं म्हणून तो उभा राहीला. तेवढ्यात माझ्या मागच्या मुलानं माझ्या मांडीवरून पेन्सिल धरलेला हात पुढे काढला आणि उभा राहीलेला मुलगा ज्या जागेवर बसणार बरोबर तिथेच पेन्सिल उभी धरून ठेवली.

एवढी छोटीशी मस्ती तर प्रत्येक वर्गात चालतेच. मीही मंद हसत ऊत्सुकतेने पुढची मजा घ्यायच्या विचारात होतोच की बाजूला बसलेल्या ठोंबेनं मागच्या मुलाचा हात ओढून मागे घेतला. एव्हाना सरांनी उभा केलेला आमच्या पुढचा मुलगा खाली बसणारच होता की ठोंबेने चपळाईने कंपास बाहेर काढून पेन्सिलच्या जागी धरले. आम्ही काही बोलेपर्यंत घात झालाच.

एकतर बसायला बाकं नव्हती, त्यामुळे खाली जमिनीपर्यंतचं अंतर नेहमीपेक्षा जास्त. मग काय, उभा राहीलेल्या मुलाने बसताना शेवटीशेवटी दिलं अंग झोकून अन् बुड टेकून.

"आयंऽ...आयंऽ...अॉय्ऽ.." तो बिचारा बोंबलत ओरडू लागला.

झालं.. त्यापुढचे सर्व क्षण गोंधळाचे आणि गडबडीचे होते. त्या मुलाचं ओरडणं, बाकीच्यांच हसणं, सरांची धावपळ यात पुढची दहा मिनिटं गेली. दोन दांडगी पोरं आणि शाळेतला शिपाई त्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे गेले. डॉक्टरशिवाय पर्याय नव्हताच..  ढुंगणातून रक्त वाहत होतं. मलमपट्टीसाठी सरांनी शिपायाजवळ काही पैसेही दिले होते, पण त्याचा भुर्दंड आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर पडला होता. हो, सरांनी सगळ्यांना घरून पाच-पाच रूपये आणायला सांगितले होते.

बरं प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही, त्यात अजून भर पडायची बाकी होती. मराठीचे ते सर खरंतर जाम तापट आणि विद्याथ्यांवर दरारा ठेवून असायचे. त्यांच्या तासाला असं काही होणं आणि त्यांनी शिक्षा न करणं, हे शक्यच नव्हतं. कांड कोणी केला होता हे तर आता जगजाहीर झालंच होतं. ठोंबेला पुढे बोलावण्यात आले.

एवढ्या प्रकारानंतरही ठोंबे निर्लज्जासारखं हसत हसत सरांजवळ गेला. तिथं पोहोचण्यासाठी त्याला बरेच कष्ट लागले. म्हणजे एकतर वर्ग अगोदरच खचाखच भरलेला. मग खाली बसलेल्या मुलांना चुकवत चुकवत स्वतःचा तोल सावरत तो जात होता. त्यातही मुलांच्या ओळी पार केल्यावर नेमकं मुली बसलेल्या तिथे त्याचा तोल जास्तच जाऊ लागला. नकळत का जाणूनबुजून काय माहीत, पण एकदा तर तो मुलींच्या अंगावर पडतापडता वाचला. शेवटी एकाबाजूच्या मुलींनी उभं राहून त्याला जागा करून दिली आणि कसाबसा ठोंबे पुढं पोहोचला.

पुढे काय होणार, अख्ख्या वर्गाला माहीत होतं. पण त्याहुनही जास्तीचं विधीलिखाणात लिहीलं होतं. अपेक्षेप्रमाणे सरांनी ठोंबेला वाकवून पाठीत दोन धपाटे घातले. खरंतर एवढ्यावरच सरांनी थांबायला हवं होतं. पण नाही, एकतर त्याने सरांचा दबदबा राहीला नसता आणि दुसरं म्हणजे नियतीची हौस अजून फिटली नव्हती.

त्या दोन धपाट्यांनंतर सरांनी ठोंबेची बकोटी गच्च पकडली आणि इकडून तिकडे हेबळायला लागले. सरांना जोश चढला असावा बहुधा, त्यांनी फळ्याजवळ जाऊन ठोंबेला फळ्यावर ढकलले. एक गोष्ट प्रामाणिकपणे नमुद कराविशी वाटते की सरांनी फारसा जोर लावला नव्हता. पण नव्याने बसवण्यात आलेला तो काचेचा फळा कुचकामी ठरला, तो स्वतः तर फुटलाच पण ठोंबेचं डोकंही त्यानं रक्तबंबाळ केलं.

त्या दिवशी पहील्यांदाच आम्ही घाबरलेले मराठीचे सर पाहीले. 'आपलं आता काही खरं नाही' हे भाव शिक्षकांच्या चेहऱ्यावर पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभले होते. सरांनी तडक ठोंबेला अंगावर उचलून घेतले आणि दरवाज्याकडे धाव घेतली. जाताना आम्हाला 'दुसऱ्या दिवशी पाचऐवजी दहा-दहा रूपये आणा' असे सांगायला ते विसरले नाहीत.

दरवाज्याच्या टोकाला सर पोहोचले असताना ठोंबेने तात्या विंचूसारखे त्यांच्या खांद्यावर टाकलेली मान वर करून वर्गाकडे पाहीले. आश्चर्य म्हणजे रक्ताने लाल झालेल्या त्याच्या चेहऱ्यावर तेव्हाही हास्य होते. ठोंबेचं ते हास्य कोणत्या उद्देशाने केलेलं असावं, मला कल्पना नाही. किंवा त्यात कुठलातरी बावळटपणा असावा, तो तात्या विंचू तर निश्चितच नव्हता.

पण आज ते हास्य आठवलं की मला जाणवतं की माणसाच्या आयुष्यात येणारी दुःख क्षणभंगुर असतात आणि त्या क्षणांतही जो आपलं हास्य विसरत नाही तोच खरा खिलाडी. त्याच्या किंवा माझ्या ध्यानीमनी नसतानाही नकळत त्याच्या वर्तनाने मिळालेली ही शिकवण माझ्या मनावर विलक्षण अशी छाप टाकून आहे.

आठवीनंतर ठोंबे 'ब' वर्गात गेल्याने आमचा फारसा कधी संबंध आला नाही. पंधरा वर्षांपूर्वी माझ्या बाबांनी माझी बालपणीची जागा सोडली, आणि आम्ही उपनगरात राहायला आलो. येताना सर्व सामानसुमान ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते तेव्हा नकळत तिथून जाणाऱ्या ठोंबेशी गाठ पडली. मधली चार-पाच वर्षे गेली होती, आणि आम्ही तरूणाईत पदार्पण केले होते. मी कायमचा तिथून जाणार आहे, हे कळल्यावर तो भावूक झाल्यासारखा वाटला.

खरंतर भावूक होण्यासारखे त्यात काहीच नव्हते, आमची कधी मैत्री अशी झालीच नव्हती. आणि मी तिथून निघताना आमची झालेली भेट हा निव्वळ योगायोग होता. पण तेव्हा मला त्याच्यातल्या संवेदनशील मनाची व्याप्ती कितपत असावी याच अंदाज आला होता. मला थांबायला सांगून तो पळतच त्याच्या घरी गेला. माझं ट्रकमध्ये किडूकमिडूक सामान   भरणं सुरूच होतं.

दहाव्या मिनिटाला ठोंबे पुन्हा हजर झाला. माझ्या हातात त्यानं जबरदस्तीने पेन टेकवला. तो पेन साधासुधा नव्हता, सातवीतल्या खुळखुळ्याचं बक्षिस होता. मी त्याच्याकडे पाहतच राहीलो.

"अ्... तो बक्षिस म्हणून नाही, माझी आठवण म्हणून देतोय.." ठोंबे हळूच पुटपुटला.

मी तो पेन नाकारू शकलो नाही. त्याक्षणी मी निशब्द होतो. नाही, म्हणजे मी पहील्यापासूनच कोणाशी फारसं बोलत नाही. तत्त्वज्ञान वगैरे सांगणेही माझ्या तत्वात बसत नाही. भावना बोलून दाखवता येत नाहीत मला, पण विश्लेषण करून लिहू शकतो. एखाद्यासमोर मनातलं बोलणं म्हणजे मला आक्रस्ताळेपणाचं वाटतं, कुणाला आवडेल कुणाला नाही. पण लिहीणं सोपं असतं. विषय पाहून ज्याला स्वारस्य आहे तो वाचतोच, बाकी कुणाला व्यत्यय होत नाही. मी अश्याप्रकारातला माणूस आहे.

मी त्याच्याशी मैत्री करू शकलो नाही, किंबहुना मी कधी तसा प्रयत्नही केला नव्हता. खरंतर शाळेत कुणीही त्याच्याशी मैत्री केली नव्हती. तसा तो विचित्र किंवा विक्षिप्तही नव्हता, तरीही त्याचा एकही मित्र नव्हता. मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर तो एकटाच असायचा.

ठोंबे माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत असावा, पण मी काहीच बोललो नाही. मी त्याला घट्ट आलिंगन दिले. तेवढ्या त्या कृतीने तो समाधानी झाल्यासारखा वाटला.

ठोंबेमुळे मला माणसाचा आणखी एक प्रकार कळाला. जो आपल्याच विश्वात मग्न असतो. ज्याच्या समजूती आणि आकलन सामान्य नियमांहुन भिन्न असतात. तो वेडा नव्हता किंवा नाही. माझ्या आलिंगन देण्याच्या कृतीमागचे शब्द माझ्या चेहऱ्यावर त्याने तंतोतंत वाचले होते. तो त्या प्रकारातला माणूस होता, ज्यांना मुके शब्द ऐकण्याची कला अवगत असते. तुम्ही त्यांच्याशी काही बोलू नका, त्यांना कृतीतून भावना वाचता येते.

"तुला माझा खुळखुळा खरोखरच आवडलेला का..?" त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आले होते.

"हो खरंच.." मी.

"एकाला तरी आवडला.. म्हणजे माझा खुळखुळा एकदम बेकार नव्हताच तर.. आयला जाम मार खाल्लेला तेव्हा घरी.." ठोंबे आठवून आठवून हसू लागला.

  मलाही तो प्रसंग आठवून हसू आले.

थोड्यावेळात ट्रकमध्ये सामान भरून झाले तसे मला आईवडीलांसोबत निघावं लागलं.  त्याकाळी मोबाईलशी आमची ओळख नव्हती, मग संपर्कात राहीण्याची कसली शक्यता नव्हती. आमची गाडी निघाली तेव्हा मी मागे वळून पाहत होतो. ठोंबे मागून टाटा करत होता. त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्याची खळी मला स्पष्ट दिसत होती.

पण त्याच्या डोळ्यांत पाणीही होते का..? मी नीटसं पाहू शकलो नाही.


समाप्त
आठवणीतला ठोंबे - भाग दोन आठवणीतला ठोंबे - भाग दोन Reviewed by Nilesh Desai on January 16, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.