छेडो ना मेरी जुल्फे


छेडो ना मेरी जुल्फे
छेडो ना मेरी जुल्फे"निलू, आज कसंही करून केस कापायला गेलंच पाहीजे. कसं दिसतंय बघ जरा आरशात रामोश्यासारखं.." मम्मी.

"अगं पण ती केसं हातात तरी येतायत का..?" वैतागलेला मी काहीसा उर्मट आवाजात म्हणालो.

खरंतर एक आठवड्यापासून मम्मी माझ्या केसांच्या हात धुवून मागे लागलेली होती. पण मी काही दाद देत नव्हतो.

अहो, पाचवीत आलोय आता मी.. आता तरी एक इंचाच्या वर केसांना थोडं जाऊ दे की..! काय तो नेहमीचा मिल्ट्रीकट.. परेश रावल दिसतो मी एकदम त्याने.

"कापून ये सांगितले ना तुला त्या झिंज्या एकदाच्या...!" मम्मी ओरडली आणि मी काय ते समजून गेलो. आता पर्याय नव्हता.

पैसे घेऊन मी निघालो, तसे मम्मी साडी व्यवस्थित करून लगबगीने चप्पल घालू लागली..

"तु भाजी आणायला निघाली आहेस का..? मी 'सौम्य' आवाजात प्रश्न केला.

मम्मी सहसा ओरडायची नाही. पण तरीही तिचा आवाज वाढला की नेहमीच माझा उर्मट आवाज आपोआप सौम्य व्हायचा.

"मी पण येते ना तिथे.. आजपर्यंत एकटा गेलायस का कधी, केस कापायला..? मम्मीच्या आवाजातला विस्तव जरी बर्यापैकी शांत झाला होता तरी त्यात अजूनही थोड्याफार ठिणग्या होत्या. आणि त्यांची धग मला अजूनही जाणवत होती.

"मी पाचवीत गेलोय आता..!"  मी मग अजूनच साळसूदपणाचा आव आणत तिला समजावले.

तिने माझ्याकडे पाहीले.

तिच्या चेहर्यावर आपला मुलगा मोठा झाला असल्याचे समाधान मला दिसले. तिने कौतुकाने मला जवळ घेतले. आणि प्रेमाने माझ्या केसांवरून फणी फिरवू लागली.

"मम्मी.., जर आता केस कापायला जायचंच आहे तर ते विंचरून काही फायदा आहे का..?" मी शांतपणे विचारले.

माझ्या चेहर्यावरची तिची प्रेमळ पकड थोडी घट्ट झाली.

"जास्त फिलॉसॉफी झाडू नकोस... जाऊन ये पटकन.."

तिने माझ्या डोक्यावर टपली मारून मला पिटाळले.

मी विषय छेडायला नको हवा होता कारण घरातून बाहेर पडल्यावर मी थोडा लांब जाईपर्यंत मला तिच्या सूचना ऐकायला मिळत होत्या..

"नीट दोन्ही भोवरे बारीक करून ये..."

"कोंबडा ठेऊ नको.."
"बारा रूपयेच दे बाकीचे परत आण..."

या सर्व सुचना मी अक्षरशः वेगात चालतच ऐकल्या. पळण्याची सोय नव्हती जोपर्यंत मम्मी पाहत होती. नाहीतर पुन्हा घरी गेल्यावर चार शब्द ऐकायला मिळाले असते.


**********************************


'जय महाराष्ट्र केशकर्तनालय'

नाव वाचलं आणि घुसलो आतमध्ये...

तसं बाजूलाच 'जय अंबे' नावाचंही सलून होतं.. अन् तेही ओळखीच्या सत्यादादाचं. तो राहायला आमच्याच चाळीत. त्यामुळे घरच्यांशी बोलूनचालून असायचा. पप्पा केस कापून घ्यायला तिथेच जायचे. आणि मलापण आतापर्यंत तिकडूनच जबरदस्ती भादरून आणले होते. पण जय अंबे म्हटले की माझ्या डोळ्यासमोर माता यायची. फलकावर बाजूला अंबा मातेचं चित्र होतं. मला माहीत नाही का, त्यावेळीं असं वाटायचं की तिथे मुलींचे केस कापतात म्हणून ते चित्र असेल.

खरंतर असं काही नव्हतंच कारण आमच्या चाळीतील सगळी पुरूष मंडळी 'जय अंबे' मध्येच जायची. ज्याची जशी आवड पण मला तिकडे जावसं वाटायचं नाही. तेव्हा मी 'जय महाराष्ट्रची' कात्री आजमावायचे ठरवले.
माझा नंबर यायचा होता आणि मी तिथले गिऱ्हाईक कमी व्हायची वाट पाहत होतो. कसं आहे ना, ऐकायला गिऱ्हाईकांपैकी कोणी नसेल तर आपण जास्त चांगल्याप्रकारे हवे तसे सांगून केस कापून घेऊ शकतो. आज पहिल्यांदाच आपल्याला हवा तसा कट मारून घ्यायची संधी आली होती, आणि साहजिकच मी ती सोडणार नव्हतो.

मी याखेपेला नेहमीसारखा मिल्ट्रीकट न मारता छानपैकी तेव्हाचा प्रसिद्ध 'बॉक्स' कट मारून घरी गेलो. एकदा केस कापले की घरी थोडावेळ ओरडा भेटेल आणि पुन्हा सगळं शांत होईल अशी माझी भाबडी अपेक्षा होती. पण मम्मीने मला बघितल्यासरशी जी जळजळीत नजर दिली, ती पाहून मी घाबरलो.

मार पडला नाही पण जवळजवळ अर्धा तास मम्मीचे खडेबोल ऐकले आणि ती जराशी थांबल्यावर सुटकेचा निश्वास टाकावा, तोच समोर मम्मी तयारी करून हजर. मी कान्याडोळ्याने तिच्याकडे पाहतच होतो की,

"कुठे कापलेस केस..? चल आत्ताच्या आत्ता तिकडे.." मम्मीने फर्मान सोडले.

"अगं पण..." मी काकूळतीने बोलण्यासाठी तोंड उघडले पण वाक्य काही पूर्ण झाले नाही.

"शब्द काढू नकोस आता तोंडातून.." मम्मीच्या या शब्दांनी माझ्या शब्दांवर कडी केली आणि मी मुकाट्याने तिच्यासोबत निघालो.

'जय महाराष्ट्र' मध्ये मग जो गोंधळ झाला तो सांगायला नकोच. काही चूक नसताना बिचाऱ्या केस कापणाऱ्याला आयते चार शब्द ऐकावे लागले आणि माझ्या इज्जतीचा अक्षरशः भाजीपाला झाला. मी खाली मान घालून गुपचूप बसून राहीलो. पुन्हा केस कापण्याचे काम सुरू झाले होते. मम्मी बाहेरूनच माझ्यावर पाळत ठेवून होती.

त्या तेवढ्या वेळात माझ्या डोक्यात त्याहून जूने घडून गेलेले किस्से आठवत होते. मी बराच लहान असेल तेव्हा, म्हणजे जेवढे मला आठवत आहे, त्या प्रत्येकवेळी माझे केस कापून आणणं, म्हणजे घरातल्यांसाठी मोठं दिव्य होतं. (मी मोठा झाल्यानंतर मला हे माहीत पडलं.) मी बाकी बाबतीत शहाणा होतो, आज्ञाधारक होतो, अभ्यासात हुशार होतो. पण डोक्यावरचे केस हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे त्या एका विषयासाठी मला वेगवेगळी प्रलोभने दाखवली जायची.

पहील्या प्रसंगात मला जबरदस्तीने मम्मी आणि दादा (मोठा भाऊ) केस कापायला घेऊन जात होते. तेव्हा दादाने मला 'जलाराम' ची चार आण्याची पेप्सी द्यायचे कबूल केले. मी त्या पेप्सीसाठी केसांची आहुती द्यायला काही तयार होत नव्हतो. ते पाहुन एखाद्या फार मोठ्या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेल्या ग्राहकाला जसे आपल्या उत्पादनाचे महत्त्व हुशार सेल्समन पटवून देतो, तसे दादाने त्या चार आण्याच्या पेप्सीची काय थोरवी गायली होती आणि मला कसे जाळ्यात ओढले होते ते अजूनही माझ्या ध्यानात आहे.

त्याही अगोदरचा किस्सा, खरंतर हा किस्सा सर्वात अगोदर घडला असल्याने मी तो आधीच सांगणं भाग होतं. पण आठवणीतल्या आठवणीत दुसऱ्यांदा 'जय महाराष्ट्र' मधल्या खुर्चीवर बसल्यावर तो किस्सा मला सर्वात शेवटी आठवला. शिवाय केसांचं आणि माझं उत्कट नातं मी सुरूवातीलाच सांगणं तितकसं रूचत नव्हतं. परंतु घटना महत्त्वाची अशीच होती.

माझं 'केशप्रेम' किती तीव्रतेचं होतं किंवा मी कितपत 'केशप्रेमी' होतो, त्याची प्रचिती केवळ या प्रसंगातून माझ्या घरातील सर्व माणसे, आसपासच्या दोन वाड्या आणि गावातील बरीचशी मंडळी यांना आली.

निमित्त माझी आजी वारल्याचं होतं. मी अगदीच लहान होतो तेव्हा. आम्ही सगळे गावी गेलो होतो. शास्त्रानुसार केशार्पण करणं आवश्यक होतं. सगळे भाऊबंद तुळतुळीत टक्कल घेऊन तुटक तुटक जागा पकडून विखुरलेले होते. आता माझी बारी आली होती. मला पुसटसं आठवत आहे, असहायतेने मी दाराच्या उंबरठ्यावर भोगणा पसरवून विरोध दर्शवित होतो. मी नाही नाही करत असताना पप्पा, काका जबरीने मला दारासमोर घेऊन आले होते. त्यांचं एकवेळ ठीक होतं, मी समजू शकलो असतो.

पण आमचे केस कापणारा नाभिक मध्येच उठत माझ्यावर दडपशाहीचा प्रयोग करू लागला. तसा तो गावातला प्रतिष्ठीत नाभिक, आमची आख्खी वाडी त्याच्याकडून केस कापून घ्यायची. त्याबदल्यात वर्षाचं जे काही धान्य वगैरे ठरलेलं असायचं, ते घ्यायचा.

"कसा ऐकत न्हाय बघतो मी, हाबकऽक्.. हल्लास्.. तर वस्ताऱ्यानं कापल.." त्यानं अक्षरशः रागाने उचलत मला त्याच्यासमोर बळेच बसवलं आणि केस कापू लागला.

एव्हाना माझं रडणं थांबलं होतं आणि मी फुसफुसायला सुरूवात केली होती. ते फारसं कोणी मनावर घेतलं नाही. मी गप्प झालो, यातच सगळ्यांनी सुस्कारा सोडला.

खरंतर हे सर्व इथेच थांबलं असतं पण तो नाभिक मला पुन्हा डिवचू लागला.

"आवं असली लय शानी मी गप केलीत.. बघा कसं गपगुमानं बसलंय" माझ्या घरातल्यांकडे पाहत तो खुशीत म्हणाला.

बास्स.. ते ऐकून माझं पित्त खवळलं. फक्त वस्तरा लागायची भीती म्हणून मी सर्व सोपस्कार होईपर्यंत संन्याश्यासारखा बसलो होतो. त्याचं मला मध्ये मध्ये चिडवणं चालूच होतं.

शेवटी माझंही डोक तुळतुळीत झाल्यावर त्यानं कापड झटकलं. मी तसाच उठून घराबाहेर पडलो. बाहेर भावकीतली बरीचशी माणसं होती. घरात पुढच्या दाराच्या अंगाला लागूनच घरातली सगळी माणसं जमा होती. अजून पाठमोराच होतो की कानावर शब्द आले,

"हंऽ.. बेट्या.. आता पुढं पण केसं कापायं माझ्याकडं गुमानं येशील बघ.." नाभिक मिश्यांवरून फणी फिरवीत म्हणत होता.

मी मागे वळालो, एकवार सगळीकडे नजर फिरवली. काही घात व्हायची शक्यता असली तर पळण्याची वाट निश्चित केली.

"गोंधळ घातलास तर याद...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मी खोडलं आणि....

"आरंऽ हाड्ऽ तुझ्या **ऽऽ **ऽ*ऽ.." बेंबीच्या देठापासून बोंबललो.

माझ्या मागे दहा-बारा जण तरी लागले असतील पण मी पांदीतल्या वाटेने सुसाट गेलो होतो. शेवटपर्यंत कुणाच्या हाती लागलो नाही. अंधार पडल्यावर घरी गेलो, थोडा मार पडला पण तरीही मी समाधानी होतो.

तो किस्सा माझ्या भावकीत आणि त्याच्याही भावकीत चांगलाच पसरला. मी गावी गेलो की त्या विषयावर एकदातरी चर्चा होतेच. तो नाभिक नेहमी माझ्याकडे मारक्या म्हशीसारखा पहायचा.

आज जवळपास पंचवीस वर्षे झाली त्या घटनेला, पण जेव्हा जेव्हा गावी जायचो तेव्हा समोरासमोर येऊनसुद्धा आम्ही एकमेकांना टाळायचो. तेव्हा त्याच्या डोळ्यांतले निखारे आणि माझं थंड हास्य यांची अप्रत्यक्ष भेट तेवढी व्हायची.

दहा मिनिटांत 'जय महाराष्ट्र' मधल्या नाभिकाने माझा मिल्ट्रीकट करून दिला. मी बाहेर मम्मीकडे पाहीले, तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. तेवढ्या वेळात आठवणींनी माझ्याही चेहऱ्यावर सुखद हास्य आणले होते.

पण तिकडे झालेल्या तथाकथित मानहानीमुळे मी 'जय महाराष्ट्र' मध्ये पुन्हा कधी जाणार नव्हतो.

मी जसाजसा मोठा होत गेलो, माझे केस कुरळे होत गेले. केसांची नीटशी काळजी घ्यायचो. पण कितीही केलं तरी माझे केस नेहमी रूक्ष असायचे. काथ्या बरा, असं मला कधीकधी वाटायचं. केस मोठे करण्याचा प्रश्नच नव्हता, ते नीट विंचरता यायचे नाहीत.

रेशमी लांब रूळलेली किंवा मुलायम मऊशार कापसासारखे केस कोणाला नाही आवडत हो..?

कोणाला हवीयत बोथट, इवलीइवलीशी, मापण्यास हातात पकडायला घ्यावेत तरीही साधं बोटांच्या पकडीतसुद्धा न येणारे केस. पण पर्याय नव्हता, माझे केस लांब वाढवले तर सरळ रेषेत कधीच बसायचे नाहीत उलट समुद्रातल्या लाटांप्रमाणे खालून वर किंवा वरून खाली हेलकावे खाताना दिसायचे.

तरीही तरूणवयात पदार्पण करताना माझे केसांवर प्रेम होतेच, कारण माझ्या पिढीतल्या बहुतांश मित्रांचे छप्परविरहीत डोके दिसत होते. म्हणून कुरळे का होईना मला माझ्या केसांचा अभिमान वाटायचा. फक्त  ते थोडे चापून बसवावे लागत, विस्कटले की खेळ संपला.

त्यामुळेच माझ्या केसांना कुणी हात लावलेला मी खपवून घ्यायचो नाही. मुंबईत ट्रेनमधल्या गर्दीत तर केसांमुळे मी कित्येकदा भांडण केले.

"अरे.. देना है तो बॉडीपे धक्का दे.. बाल खराब मत कर.." माझं ठरलेलं वाक्य असायचं.

अश्या सांगायला गेलं तर केसांच्या खुपश्या आठवणी आहेत. कधीकधी निवांत बसलेलो असताना त्या आठवणी मला माझ्या स्वभावात झालेले बदल दर्शवितात. वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर माणूस कसा असतो, कसा बदलत जातो याचं आकलन मला होत जातं.

माझं सुदैव आहे की अगदी म्हणजे अगदीच लहान असल्यापासूनच्या बऱ्याचश्या गोष्टी मला जश्याच्या तश्या आठवतात. हे त्या आठवणींचं देणं आहे, की मी आजही भूतकाळात पुन्हा भटकंती करून येतो. माझ्यातला जूना मी त्या आठवणीत इतरांसोबत तिथंच असतो आणि त्यांच्यासाठी अदृश्य असलेला आताचा मीही तिथंच शांतपणे त्यांना पाहत असतो. कधी गावी उंबरठ्यावर शुभ्र बंडी घालून तर कधी मुंबईत केशकर्तनालयातल्या खुर्चीवर सफेद चादर गुंडाळून केस कापून घेत असतो.


आठवणीतल्या आठवणी
त्यातही पुन्हा आठवणी,
अवतरल्या माझ्या मनी
आज एकत्र साऱ्याजणी...


 कामामुळे मध्यंतरी दहा वर्षे माझा गावाशी संबंध आला नाही. यावर्षी जाण्याचा योग आला. बाजारतळावर उतरून वाडीकडे जातच होतो की समोरून तो नाभिक येताना दिसला. त्याचं वय आता उतरतीला झुकत चाललं होतं. त्याच्याकडे पाहणारी माझी नजर अजूनही थंड होती. पण इतक्या वर्षांनी त्याला पाहून मनातल्या मनात बरंही वाटलं होतं.

तो जवळ आला. माझ्याशी हसून बोलला. आई-वडिलांची विचारपूस केली. माझ्यासोबत बायको होती, बंडीच्या खिश्यातून शंभराची नोट काढून तिला देऊ केली. तिने माझ्याकडे पाहीले, मी नजरेनेच तिला घ्यायला सांगितले. तिथेच वाटेवर त्याचे आशिर्वाद घेतले. मी माफी मागायच्या प्रयत्नात होतो पण तेवढ्यात तोच माझ्या पत्नीला म्हणाला,

"इतकसं होतं हे बेनं, तवा मला शिवी दिऊन पळालेलं..".

आम्ही तिघे हसू लागलो.

मी माफी मागण्याचा विचार सोडून दिला. तो मला विसरला नव्हता. इतक्या वर्षातही ते भांडण, शिवी, राग यांनी आम्हाला एकमेकांत बांधून ठेवलं. वरवर विश्लेषण करता येत नसलं तरी आमच्यात नातं जुळलं होतं. म्हणूनच त्याचं मूळ नष्ट करून ते पाश तोडणं मला पटत नव्हतं.


बरं लहानपणापासून आणि आजही मला असंच वाटतं की, हिंदी सिनेमातल्या एका गाण्याचे सुरूवातीचे शब्द माझ्यासाठीच लिहीले गेले असावेत,

"छेडो ना मेरी जुल्फें..."

तुम्हाला काय वाटतं..?


समाप्त
छेडो ना मेरी जुल्फे छेडो ना मेरी जुल्फे Reviewed by Nilesh Desai on January 18, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.