काळ रात्र - भाग पाच

marathistory.online
काळ रात्र


काळ रात्रं - भाग चारपासून पुढे


 पर्याय हाच की आता माझ्याकडे करण्यासारखे काही नव्हते. फक्त आता पुढे काय होणार, याचीच वाट पाहायची होती. पण त्या पानावर लिहिलेलं खरे नसेल तर..! नाही.. ते शक्य नाही.. त्या चिथावणीतला शब्द न शब्द खरा होता. त्या दरवाज्याचे वेगाने बंद होणे हा संकेत होता की मी त्या वाड्यात किंबहुना त्या खोलीत एकटा नव्हतो. तिथं खरोखरच अजूनही कुणीतरी अस्तित्वात होतं. माझ्या पळून जाण्याच्या क्रियेला त्याने दार बंद करून प्रतिक्रिया दिली होती. माझ्या निडर व्यक्तिमत्त्वाला बसलेली ती सणसणीत चपराक होती.

 पण इतक्यात हताश होऊन चालणार नव्हतं. हे जे काही भयानक आपल्या पुढ्यात येऊन मांडलेय, ते टाळण्याचा काही ना काही उपाय ही असायलाच हवा. मला शोधावे लागेल.. उपाय शोधलाय पाहिजे.  अजाणतेपणी जी चूक आपल्याकडून झाली आहे, तिला निस्तरायलाच हवे. 

 मी पुन्हा पेटीकडे धाव घेतली आणि त्यात अजून काही आहे का ते शोधू लागलो. एखादा चोरकप्पा किंवा तळाशी कुठे काही खाचा वगैरे आहेत का ते सुद्धा चाचपून पाहिले. दुर्दैवाने पेटीत डायरीशिवाय काहीच नव्हते.  हताश होत मी पेटीवर जोराने मूठ आपटली तसे खोलीतली खसखस जाणवली.  

 कुणीतरी..  कुणीतरी... बारीकसा खसखसून हसण्याचा आवाज करत होते. दिवा विझला असल्याने काहीच दिसण्याची शक्यता नव्हती. खोलीतला कुबट दर्प एकाएकी वाढू लागला होता. मी अंदाज घेऊ इच्छित होतो पण त्या गडद अंधारलेल्या खोलीत मला कश्या कश्याचाही अंदाज लावता येत नव्हता. मधूनच एखादा थंड हवेचा झोत स्पर्श करून जावा किंवा त्या काळोखात भिरभिरत काहीतरी कानामागून निघून जावं. डोळ्यांच्या पापण्या उघड्या ठेवाव्या की नको, तसेही काही दिसत तर नाही..  कसलाही तर्क लावता येत नाही.. काय आहे हे.. कसली छाया.. कोणती आकृती...? माझ्या तेव्हाच्या भेदरलेल्या अवस्थेचे वर्णन मी कोणत्या शब्दांत करू..

  त्या खोलीत मी कसाबसा जीव मुठीत धरून सर्व गोष्टी अनुभवत होतो. या गोष्टी माझ्या कल्पनेत किती सहज आणि सोप्या होत्या. यांचेच तर ज्ञान घेण्याची आसक्ती मी केली होती. आता जर हे प्रत्यक्षात घडत आहे तर मी का घाबरत होतो.. का स्वतःचा मृत्यू समोर दिसत असल्यामुळे माझी ती आंतरिक कामना लोप पावली होती. माझ्या आजोबांच्या पाऊलावर पाऊल ठेवण्याची माझी इच्छा आता पार नाहीशी झाली होती.


  खोलीच्या मध्यभागी मी एकाकी हतबल होऊन वाट पाहत होतो..  कश्याची..  काळाची...?  तो चुकणार नव्हता.  माझ्या आजपासचे बारीक आवाज एव्हाना मोठे होऊ लागले होते.  ती खसखस..  फिदीफिदी हसणे वाढले होते.. मला फसवण्याचा असीमित आनंद त्या अनामिक शक्तीला होतं होता. कुणीतरी माझ्या अवतीभोवती पिंगा घालत असल्याचे मला सारखे जाणवत होते. कानांवर पडणारा तो 'घूं..  घूं...' ध्वनी मला बैचेन करत होता. एकदोनदा मला त्या गोष्टीचा ओझरता स्पर्शही जाणवला... कुणीतरी माझ्या सर्वांगावरून आपल्या जळजळीत नजरेचा कटाक्ष टाकत असल्यासारखे मला भासत होते. ती नजर जिथे जिथे माझ्यावर भिडत होती, शरीराच्या त्या त्या भागावरून गरम चटका बसल्याचा अनुभव मी घेत होतो. त्या तसल्या हरेक प्रकारच्या हरकतीनंतर माझ्या मनाचा तोल आतल्या आत ढासळू लागला होता.  

काळ रात्रं


  मी डायरीतील एक एक वाक्य पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करू लागलो.  आजोबांच्या लिखाणाप्रमाणे त्यांना मिळालेल्या मौखिक ज्ञानाला त्यांनी या डायरीत जपले होते. डायरीच्या शेवटच्या पानांतील मंत्र हा वैयक्तिक कार्यासाठी मदत म्हणून काही अनैसर्गिक पण चांगल्या शक्तींना बोलावण्यासाठी होता. पण त्या डायरीशी कर्मधर्मसंयोगाने एक वाईट शक्ती जोडली गेली असल्याने त्यात धोका निर्माण झाला होता.  आजोबांनां अगदी शेवटच्या क्षणाला या गोष्टीचा साक्षात्कार झाला होता.  ते त्या वाईट शक्तीच्या कचाट्यात सापडले आणि म्हणूनच त्यांनी त्या शक्तीचा पूर्ण प्रभाव स्वतःवर होण्याआधी ती चेतावणी मंत्राच्या अगोदर लिहून ठेवली होती. आजोबा अचानक गायब होण्यामागे हेच कारण असण्याची दाट शक्यता होती.

  पण त्या वाईट शक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी मंत्राच्या शब्दरचनेत बदल केले होते. काही शब्द जाणून डागाळले होते, वाचताना मला ते दिसू शकले नाहीत.  शिवाय काही शब्द नव्याने जोडले होते, ते ही माझ्या ध्यानात आले नाहीत. मी वाचत गेलो आणि त्या रचनेतून साकारलेल्या नव्या मंत्राच्या प्रभावाने या जगात येण्याचे आव्हानच मी नकळतपणे त्या वाईट शक्तीला केले होते. तिच्या वास्तव्यासाठी माझा देह मी देण्याचे कबूल केले होते, अर्थात ते ही मला ज्ञात नसताना. 

  माझे आव्हान स्वीकारत आता त्या अनामिक शक्तीने खोलीत प्रवेश केला होता. मला वाटते पहिल्यापासूनच ती तिथेच असावी, तिच्या इच्छानुसार तिचे अस्तित्व मात्र आता मला जाणवू लागले होते. असो, आता जे होईल त्याला सामोरे जाणे इतकेच माझ्या हातात होते. मी प्रतीक्षा करत होतो, पण तिचा खेळ सुरु होता. माझ्यामागे ड्रम गडगडण्याचा आवाज झाला, मी वळून त्या दिशेला पाहिले. 

 खोलीतल्या गडद अंधारापेक्षाही अधिक काळपट सावली त्या ड्रममधून बाहेर येत असल्यासारखी दिसली. पण मघाशी पाहिले तर ड्रममध्ये फक्त मळकट कपडा होता, हो...  तोच मळकट कपडा मंतरल्याप्रमाणे आपणहून बाहेर आला होता... आणि आता त्याला आकार प्राप्त झाला होता. ती अनामिक शक्ती त्याच कपड्याआड होती, त्यातूनच तिचे निखाऱ्यासारखे लालभडक डोळे माझ्यावर खिळले होते. मला ती नजर दिसत होती.. जाणवत होती.. असह्य होत होती... किती तप्त.. ! किती भेदक.. ! काहीकाळ ती उष्ण नजर अंगावर पडताच मानवाचं शरीर, त्वचा, हाडं वितळवून त्याचं जमिनीवर पसरणाऱ्या द्रव पदार्थात रूपांतर होऊ शकले असते, असे मला वाटते. 

 मानवी मर्यादांनी ग्रासलेले माझे मन त्या नजरेचा, त्या शक्तीचा प्रतिकार करू शकत नव्हते वा माझ्यात ती कुवत नव्हतीच. हे सर्व जर त्या क्षणाला थांबले नसते तर माझ्या मेंदूच्या ठिकऱ्या उडाल्या असत्या. मला त्या विचित्र परिस्थितीतून लौकरात लौकर सुटका हवी होती आणि त्याचा एकच मार्ग होता. मृत्यू मला समोर दिसत होता आणि त्यावेळेस खरेतर तोच मला मित्र भासत होता. हो, मृत्यूच मला या दृष्टचक्रातून सोडवू शकत होता.

  मी सपशेल शरणागती पत्करत डोळे बंद करून त्या शक्तीसमोर मान झुकवून बसलो. पुढच्याच क्षणाला एका विकृत हास्याच्या खिंकाळीने तो वाडा दुमदुमला. खोलीतले वातावरण पूर्णतः काळवटलेले, सडक्या कुजक्या दर्पाने दुर्गंधलेले असे वाटत होते. मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला नाही. नंतरचे काही क्षण कितपत भयावह असतील याची कल्पना मी करू शकत नव्हतो, मला फक्त या मानसिक जाचातून मुक्तता हवी होती. एकएक क्षण आता जड जात होता, त्या अनामिक शक्तीच्या विळख्यातून माझ्या भेदरलेल्या मनाला सुटका हवी होती. 
क्रमशः 
काळ रात्र - भाग पाच काळ रात्र - भाग पाच Reviewed by Nilesh Desai on February 07, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.