काळ रात्र - भाग दोन


  तेव्हाचा तो निर्णय माझाच होता का...! याबाबत मी अजूनही साशंक आहे. कारण मला माझं मन नकारात्मक उत्तरं देत असतानाही मी नकळत हालचाली करू लागलो होतो. वरच्या मजल्यावर गारवा जास्तच जाणवत होता. बाहेरच्या अंधाराने बघताबघता वाड्याचा हर एक कोना आपल्या कवेत घेतला होता. बरे झाले सोबत दिवा आणला होता. सकाळ झाली की पहीलं वीजेचा बंदोबस्त करावा लागणार होता. मी मनातल्या मनात उद्याचा विचार करत होतो. पण त्या क्षणाला पुढे असं काही वाढून ठेवले असावे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. 

  जीना चढून वर गेलो तेच डाव्या बाजूला खुंटीवर अडकवलेल्या चाव्या दिसल्या. अर्थात त्या वरच्या खोल्यांच्या असणार हे सांगायला कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. वरच्या मजल्यावरील पहीली खोली दिव्याच्या प्रकाशात मी अर्ध्या तासात साफ केली. दुसऱ्या खोलीकडे जाताना मला पहील्यांदा काहीतरी जाणवलं. वाड्यातली शांतता, तिथला अंधार, सोबतीला कुणी नसणं हे सर्व मी तिथे आल्यापासून जसं होतं तसंच आताही होतं. पण त्या सर्वांसोबत आता वातावरणात एक हलकासा कुबट दर्प मिसळला होता. त्यातल्या धोक्याची सुचना अंतर्मनाने दिली होती. पण तर्कशुद्ध कारण शोधण्याच्या मानवी संशोधक वृत्तीने त्या सुचनेकडे कानाडोळा केला आणि मी न परवडणारी, न झेपणारी, माझं सर्वस्व हिरावून घेणारी ती चूक करून बसलो.

  मानव स्वत:ला कितीही प्रगत, वैचारिक, ज्ञानी म्हणवून घेत असला तरी या जगातल्या अनामिक शक्तींपुढे त्याचे काहीही चालत नाही. मी मी म्हणणारे भलेभले काळाच्या प्रवाहासोबत बुडत्या काडीप्रमाणे वाहून जातात. मीदेखील त्या वाड्यात जाण्याअगोदर असाच नीडर, कुणाची पर्वा न करणारा, कुणाला खिजगणतीतही न पकडणारा असा होतो. पण आता चित्र बदलले आहे. वाड्यातल्या एका रात्रीच्या वास्तव्याने माझ्या डोळ्यांवरची निर्भिडतेची झापड उडाली आहे. 

  तेव्हा माझ्या अंतर्मनाने दिलेल्या इशाऱ्याकडे मी दूर्लक्ष केले आणि मी त्या दूर्गंधीच्या उत्पत्तीचे कारण शोधू लागलो. कित्येक दिवसांपासून वाडा बंद होता. इथं उंदीर, घुशी किंवा तत्सम प्रजातीचं साम्राज्य असणारच यात शंका नव्हती. किंबहुना या कुबट वासामागे त्यांचाच काहीतरी उपद्व्याप असणार, असं कारण मुळाशी धरून मी एक एक खोली पुढे जात होतो. जसजशी माझी पाऊले पुढे सरसावत होती तसतसा तो दर्प अधिक त्रासदायक ठरू लागला. कसातरी मी नाक दाबून शेवटच्या खोलीच्या दरवाज्यासमोर उभा होतो. काहीतरी सडलेलं, कुजकट असं खोलीत असण्याची दाट शक्यता मला वाटली. 

  'तसं काही असेल तर रात्रभर झोप नीट यायची नाही. अनासाये इथं आलोच आहोत तर सगळं स्वच्छ करून घ्यावं आणि मग निवांत पडावं. आपल्यालाच या वाड्यात कायम राहायचे आहे तर मग आपण वाड्याची स्वच्छता आणि देखभाल यात हयगय करता कामा नये.' माझं विचारचक्र चालूच होतं. 

  मी खिश्यातला रूमाल काढून नाकाला घट्ट बांधला. समोर दरवाज्याला असलेल्या कुलूपाला मी एक एक करून चावी लावून अंदाज घेऊ लागलो. तिसऱ्या प्रयत्नात मी ते जाड भरभक्कम कुलूप उघडले, कडी काढली आणि दरवाजा हलकेच आत लोटण्याचा अपयशी प्रयत्न केला. दरवाजाने चौकटीला घट्ट धरून ठेवल्यासारखे वाटले. पण पुन्हा जरा जोर लावून मी तो दरवाजा ढकलला. मेहनत जास्त लागली पण कसाबसा कर्रऽऽऽरऽऽर्रऽऽकर्रार्रऽऽ आवाज करीत एकदाचा तो दरवाजा उघडला तसा एकाचवेळी दुर्गंधीचा भपकारा आणि गार वाऱ्याची झुळूक माझ्या अंगावर आले. नुसतं शहारून गेलं अंग.. खोट कश्याला बोलायचं? अंग शहारलं होतं माझं पण त्या गारव्यामुळे, त्यात भीतीचा लवलेशही नव्हता. 

  मी हळूहळू आत सरकलो. अंधार बऱ्यापैकी होता पण एव्हाना डोळे काहीप्रमाणात सरावले होते. अरेच्या्..ऽऽ कुलूप उघडताना मी दिवा तिथंच दरवाज्याबाहेर खाली ठेवला होता.  आठवलं तसं एक ढेंग मागे टाकून मी दिवा उचलला आणि खोलीत पाच-सहा पावलं पुढं गेलो. 


काळ रात्र


  अंधार जास्त असला तरी  खोली प्रशस्त वाटत होती. समोरच्या भिंतीला मध्यभागी एक छोटीशी खिडकी होती, पण तिला बाहेरून जाळी बसवलेली होती. बऱ्यापैकी जळमटे आणि धुळ इस्तत: जमा झाली होती. कोपऱ्यात दोन-तीन सामान्य आकाराच्या वस्तू होत्या पण अंधार इतका होता की जवळ जाऊन पाहील्याशिवाय त्यापैकी काहीच स्पष्ट दिसलं नसतं. मी त्यादिशेने कुच केले कारण कुजलेले जे काही होते त्याचा उगम तिकडेच असण्याची मला शंका आली होती.

  अजूनपर्यंत खोलीत माझ्याशिवाय दुसरी कोणतीही हालचाल नव्हती. म्हणजे एखादं मांजर, उंदीर, घुस असं काहीही अजून निदर्शनास आले नव्हते. पण जर एखादा साप तिथे दबा धरून असला तर! मला सावध राहायला हवे होते. खोलीत पडलेला एक काठीचा तुकडा उचलून मी त्या कोपऱ्यात ढोसळू लागलो. 

  छ्याऽ... कुठूनही हुं का चूं झाले नाही. कसलीच हालचाल नाही. एखादं मरून पडलं असलं की कशी हालचाल होणार. ते जे काही असेल तेच मेल्यावर इतक्या दिवसांत पडून पडून सडलं असणार तिथे. मी आता काहीसा निर्ढावलो आणि कोपऱ्यात हात घालून एक एक करून त्या वस्तू खोलीच्या मध्यभागी आणून ठेवल्या. त्यांचे आकार एव्हाना स्पष्ट झाले होते. एक जुनी पुराणी पेटी, एक लहान पत्र्याचा ड्रम आणि दोन कापडी पिशव्या एवढच सामान होतं. 

  कापडी पिशव्यांत जुनी वर्तमानपत्रे, कव्हर वा नाव नसलेली  लहानसहान पुस्तके होती. ड्रम रिकामा होता म्हणजे त्यात एका मळकट कापडाव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं. याचाच अर्थ पेटीतच एखादा उंदीर गुदमरून मेला असावा. पेटीला लहानसा टाळा होता जो तोडण्यासाठी मला फारसे कष्ट पडले नाहीत. एकदोन हिसक्यातच त्याने दम सोडला होता. मी पेटीवरचा दरवाजा उचलताच करर्.. कर्र... आवाज करीत ती जुनी पेटी उघडली. 
काळ रात्र - भाग दोन काळ रात्र - भाग दोन Reviewed by Nilesh Desai on February 04, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.