काळ रात्र - भाग तीन


  सुरूवातीला मी ते बघून बुचकळ्यात पडलो. पेटीत फक्त एक जुन्या वळणाची डायरी होती, आणखी काहीही नव्हते. पण वास तर अजूनही येत होता. शिवाय पेटी उघडल्यापासून त्याची तीव्रता वाढलीच होती. फार कमी वेळातच मला आता त्या उग्र गंधाचीही सवय झाली होती. माझ्याजागी दुसरं कोणी असतं तर ओकाऱ्या काढत मागे सरलं असतं, पण मी धीराचा होतो आणि इतक्या वर्षांत माझं मनही मी कठोर बनवलं होतं. आता कसला शोध घ्यायचा, माझे एक मन विचारत होते. वास इथूनच येत आहे तर काहीनाकाही सापडायलाच हवे, दुसऱ्या मनाने ताबडतोब प्रतिक्रिया दिली.

  मी पेटीत हात घालून ती डायरी उचलण्याचा प्रयत्न केला, आणि वीजेचा झटका बसका तसा माझा हात तत्परतेने मागे आला. हे आता काय झाले...! मला भास झाला का..! का खरंच हाताला झिणझिण्या आल्या..! डायरीच्या बाजूला किंवा पेटीत काही अणूकुचीदार असेल ते टोचले का..? मनातल्या शंका दूर करण्याचा एकच उपाय होता. मी सर्वबाजूंनी डायरीकडे पाहीले आणि अलगद तिची दोन टोके पकडून डायरी हातात घेतली. पेटीत किंवा डायरीवर कुठलीही टोकदार वस्तू नव्हती. मग टोचलं तरी काय..? जाऊ दे...! 

  माझ्या हातात डायरी होती आणि त्यात नेमकं काय आहे याची मला उत्सुकता होती. ज्याअर्थी कुलूप लावलेल्या पेटीत ही डायरी आहे, त्याअर्थी नक्कीच त्यात काहीतरी महत्त्वाचं असण्याची दाट शक्यता होती. कदाचित एखादं रहस्य, वाड्यातल्या गुप्त खोल्यांचा रस्ता किंवा आजोबांनी जमा केलेलं धन. अर्थात आता वारस या नात्याने त्याच्यावर माझाच अधिकार होता म्हणून मी ते पाहण्यात किंवा शोधण्यात काही वावगं नव्हतं. मी कुणी चोर नव्हतो, हा वाडा, ही पेटी, ही डायरी सगळं माझंच होतं आणि त्या डायरीतला मजकूरही माझ्यासाठीच होता. 

  डायरी हातात आल्यानंतरही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले नव्हते. म्हणजे त्या दर्पामागचं कारण अजूनही रहस्यमय पद्धतीने लपले होते. का आता येथे कोडी सोडवायला मी आलो होतो..? कितीतरी वेळापासून मी एकटा एकामागोमाग एक सगळं धुंडाळत बसलो आहे, अजून मला जे हवे ते किंवा ज्याचा शोध मी करत आहे ते का मिळत नसावं बरं..! हा लपंडाव कश्यासाठी..? की एखाद्याला गाफिल करण्यामागची ही गुढ योजना असावी..! मी लहानपणी कुठंतरी वाचलं होतं की रहस्य कधी सहजासहजी बाहेर पडत नाही. त्याची वाट साधीसरळ नसतेच. रहस्य किंवा गुढ जाणून घेण्यासाठी तुम्हांला आडवळणाने जावं लागतं. म्हणजे जे दिसतयं तेच खरं न समजता तुम्हाला कधीकधी वेगळे उपाय करावे लागतात. 

  मला ती वेगळी वाट शोधायची होती. डायरीची अवस्था तितकीशी चांगली नव्हती. मी डायरी उघडून पाहू लागलो. तिची पानं काळानुरूप फिकट पिवळ्या रंगाची झाली असून गळण्याच्या प्रतिक्षेत होती. कुठे कुठे कसलेसे ठिपके असलेल्या डागांची हजेरी होती. मी डायरीवरून एक नजर फिरवली साधारण पन्नासएक पानं भरलेली दिसलेली. डायरीमधलं अक्षर स्वच्छ आणि वळणदार होतं. फक्त काही शब्दांच्या ठिकाणी डाग असल्याने वाचताना थोडीफार गफलत व्हायची शक्यता होती. असो, माझ्याकडे पुरेसा वेळ होता शिवाय माझा वाचनाचा वेग जास्तच असल्याने ती पन्नास पानं वाचायला मला फारफार तर पंधरा-वीस मिनिटं लागली असती. 

 अनासाये इथवर आलोच आहे तर सर्व बाबी जाणून घ्याव्या, असा विचार करून मी तिथंच पेटीशेजारी बुड टेकवून डायरी वाचायला सुरुवात केली. इथं दोन गोष्टी मला नमूद कराव्याश्या वाटतात, एक तर डायरी वाचायला घेतल्याबरोबर त्या डायरीतलं एक पान गळून खाली पडलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्या घाणेरड्या, सडक्या, कुजक्या दर्पाबाबत साफ विसरून गेलो होतो. मी तिथंच होतो, तो गंधही जवळच कुठूनतरी येत होता पण त्यावेळेला आकर्षण आणि उत्सुकतेने माझं चित्त संपूर्णपणे डायरीवर होतं व त्यातलं रहस्य जाणून घेतल्याखेरीज ते ढळणं शक्य नव्हतं.

 डायरीच्या सुरुवातीच्या भागांत माझ्या आजोबांचा परिचय आणि त्यांच्या शोधांबाबत माहिती होती. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी गोळा केलेल्या गूढ गोष्टींचा प्रपंच म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होता. माझ्या आजोबांचे एकएक रहस्यमय शोध वाचून मी थक्क झालो होतो. म्हणजे त्यात सामान्य माणसाच्या आवाक्यातलेच पण भारावून टाकणारे आणि विशेष म्हणजे अंगावर शहारे आणणारे काही प्रसंग होते. त्यावेळेला मला आजोबांचा खरोखर अभिमान वाटत होता. मला मनोमन असे वाटत होते की थोडा का होईना पण मला त्यांचा सहवास लाभायला हवा होता. 

काळ रात्र


 डायरीतल्या प्रत्येक पानावर त्याचा क्रमांक नमूद केला होता. एकंदर आजोबांनी चोख पद्धतीने काळजीपूर्वक त्या डायरीची रचना केल्याचे ध्यानात येत होते. साधारण बेचाळीसाव्या पानाला तो परिचय आणि माहिती पूर्ण झाल्यावर मग सुरु झाले ते आजकालच्या विज्ञानाला फाटा देणारेच होते. ज्याच्यासाठी आजोबांनी आपल्या ऐन तारुण्यातल्या सोनेरी दिवसांचा त्याग केला होता. त्या उरलेल्या पानांमध्ये काही चित्रविचित्र आकृत्या आणि गूढ संकेतांच्या मंत्राच्या उच्चाराचे मजकूर होते. 

 त्या आकृत्यांचे वर्णन करताना माझ्यासारखी कठोर हृदयाची व्यक्तीही गडबडून जाईल. त्यातले कितपत खरं होतं याबाबत मी साशंक होतो. पण मला पुन्हा आठवले की ज्याअर्थी ही डायरी एका बंदिस्त खोलीतल्या बंद पेटीत ठेवली वा लपवली आहे, त्याअर्थी त्यात काही ना काही तरी सत्य अथवा रहस्य दडलेले असणारच. त्याशिवाय कुणी उगाच कशाला ही नसती उठाठेव करेल.

 लहानपणी मी ऐकले होते की माझी आजी जरा लौकरच निर्वतली होती. तिचे मरण नैसर्गिक नव्हते, म्हणजे तिला अपघाती मृत्यू आला होता.  त्याचे दुःख आजोबांना इतके झाले की त्यांचा जीवनातून रसच उडाला होता. मला वाटते असेच कारण असावे की त्यांची ओढ गुढविद्येकडे झाली असावी. प्रिय व्यक्तीचे असे एकाएकी आयुष्यातून निघून जाणे किती वेदनादायक! मग त्यातूनच मन गुंतवण्यासाठी ही वेगळी वाट आजोबांनी अवलंबणे स्वाभाविकच होते. 

  त्यानंतरची पाने मी अक्षरशः अधाश्यासारखी धडाधड वाचून काढली.  


  "निश्यात्तऽ... कलीकर्णायळ्ऽ.. पिच्छवाच्याळ्ऽ.. सम्भद्धीऽ... काळंभूर्गाळ्ऽऽ...!" 


 शेवटचा मजकूर वर दिल्याप्रमाणेच होता. फक्त शेवटचाच काय,  त्या उरलेल्या पानांत फक्त भेसूर चित्रे आणि हाच मजकूर तीनवेळा होता. माझे वाचनकौशल्य उत्तम असे होते. एकही शब्द न गाळता मी ते वाक्य व्यवस्थित उच्चारले होते.काळ रात्र - भाग तीन काळ रात्र - भाग तीन Reviewed by Nilesh Desai on February 05, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.