काळ रात्र - भाग चार

marathistory.online
काळ रात्रकाळ रात्रं - भाग तीनपासून पुढे खरेतर मला त्यातले काहीच समजले नव्हते. पानं पलटवून मी पुन्हा बेचाळीसाव्या पानावर गेलो. अगोदरची बेचाळीस पाने वाचताना मला जितका वेळ लागला होता, त्याच्या दुप्पट वेळ मला उरलेली आठ पानं वाचताना लागला होता जरी त्यात विशेष असे काही नव्हतं...  का..?  काहीतरी चुकत होतं..! की नंतर सगळे मंत्रोउच्चार असल्याने वाचताना जीभ जड झाली होती.. ! नाही...  एक मिनिट...

 माझं लक्ष पानाच्या क्रमांकावर गेलं. मागची काही पाने चाळून मी क्रमवार पाहू लागलो.  "एक्केचाळीस,  बेचाळीस, त्रेचाळ...  अहं...! चव्वेचाळीस...?" मी पुन्हा पडताळून पहिले.  "हो...  चव्वेचाळीस..  मग मधले पानं..? "

 मी खाली पेटीमध्ये पाहिले. मघाशी खाली पडलेले पान आठवले.  कुठूनही हवेचा झोत येण्याची शक्यता नव्हती, तरीसुद्धा डायरीतून गळालेले ते पान हवेवर तरंगत असल्यासारखे वर खाली हेलकावे घेत होते. जणु एखादा जादूगार दुरून कुठूनतरी आपली छडी वरखाली करून त्या पानाला संमोहित करत असल्यासारखं. जरी माझा कल गूढ बाबींकडे जास्त असला तरी डोळे झाकून वैज्ञानिक पडताळणी केल्याशिवाय मी जादूटोण्यावर विश्वास ठेऊ शकलो नसतो. शिवाय प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक आधार असतो असे म्हणणाऱ्याला पटवून देण्यासाठी तरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेणं गरजेचे असते.

 मी धिटाई दाखवत पटकन त्या उडणाऱ्या पानाला पकडले, आणि त्यावरचा मजकूर वाचू लागलो. अक्षर तसेच वळणदार  होते. त्यातला एकएक शब्द मी वाचत गेलो आणि प्रत्येक शब्दाला आवंढा गिळताना माझा कंठमणी आतबाहेर करत होता. आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या अनैसर्गिक भीतीची हलकीशी लहर क्षणाक्षणाला माझ्या अंगाखांद्यावरून खेळत सरळ काळजात उतरत होती. मला त्या खेळाच्या नियमांचे आकलन हे पान वाचताना होत होते,  पण... पण.. त्या खेळातला माझा डाव तर मी त्याअगोदरच खेळून रिकामा झालो होतो.

 त्या पानात लिहिलेल्या चिथावणीचा अर्थ थोडक्यात सांगायचा तर मला सर्व पाने क्रमवार वाचणे आवश्यक होते. मी पुन्हा डायरीतल्या शेवटच्या सहा पानांतील त्या मंत्राचे शब्द बारकाईने पाहिले. जो मंत्रोच्चार मी सहज म्हणून तीनवेळा केला होता, त्याच्या शब्दांच्या रचनेत फेरफार करून मूळ अर्थ सफाईने बदलला होता. त्रेचाळीसाव्या पानावर त्यासंबधीचीच सूचना लिहिली होती. तो मंत्र आणि त्याचा उच्चार... पुढील पानांत त्यात होणारे बदल आणि उच्चारताना घ्यावयाची काळजी.. सर्व काही विश्लेषण करून मार्गदर्शन केले होते, पण मी घाईघाईने वाचण्याच्या प्रयत्नात गाळलेल्या पानाकडे दुर्लक्ष करून खूप मोठी गल्लत केली होती.

काळ रात्रं


 चेतावणीच्या बाबतीत सांगायचं तर सामान्य माणसाकडून ही चूक करून घेण्यास भाग पाडणारी कुठलीतरी अदृश्य शक्ती त्या डायरीच्या आसपास आहे. ती वाट पाहत आहे, मनुष्य देहाची. त्या अनामिक शक्तीला देहाची नितांत आवश्यकता आहे,  कुठल्याश्या घटित अघटित घटनांच्या पुनरावृत्तीसाठी. भूतकाळातील काही दृकश्राव्यनिर्मितीशी छेडछाड करण्यासाठी तिला तसे करणे निकडीचे होऊन बसले आहे.

 कित्येक वर्षे ती वाट पाहत आहे कुणा वर्तमानातल्या जिवंत व्यक्तीची.  काहीतरी अन्यायकारक तिला भोगावे लागले होते म्हणून कदाचित भूतकाळ बदलण्यासाठी, किंवा एखाद्या भोगविलासी अतृप्त आत्म्याला नव्या सुदृढ शरीररुपाने वावरण्यासाठी..! कारणे काहीही असोत, पण याचे परिणाम भयंकर आहेत. तो आत्मा तर पुन्हा जिवंत होईल पण मंत्रोच्चारात चुकलेल्या या माणसाचे मन बंदिस्त होऊन जाईल. त्याच्यात संवेदना असतील पण इंद्रियांचा मालक कुणी औरच असेल. ना हसता येईल, ना रडता येईल, या बंदिस्त मनाला स्वतःहून काही करता येऊ शकणार नाही. त्याचा कर्ताकरवीता जो कोणी असेल तोच त्याच्या उरलेल्या आयुष्यभराचा मालक होईल.

 का हे सर्व खरे आहे..?  प्रत्यक्षात असे काही होणार आहे..! हे मी काय करून बसलो... मला आधीच काहीतरी खूण सापडावयास हवी होती. पहिल्यांदा डायरी उचलताना बसलेला झटका, डायरी उघडल्यावर गळलेले हे पान या खुणाच तर होत्या. पण.. पण.. ही सरळसरळ फसवणूक आहे..

 असणारच.. ती शक्ती सरळसरळ मला वश करू शकली नसती. माझा दांडगा आत्मविश्वास आणि बेडर वृत्तीला अश्याचप्रकारे गाफील ठेऊन चाल करणे तिला सोयीस्कर वाटले असावे. यासर्वांतून असा बोध होतो की ही घातकी खेळी करणारी ती अनैसर्गिक शक्ती वा अतृप्त आत्मा चांगले अर्थातच नव्हते. त्याची विचारसरणी अत्यंत घाणेरड्या प्रकारची असली पाहिजे होती, आणि शक्यता नाकारता येत नाही की मी तिच्या भयानक चक्रव्यूहात अडकलॊ जाणार होतो.

 शक्य तितक्या वेगात मी झटकन उठून दरवाज्याकडे झेप घेतली पण नशिबाने हाय खाल्ली... मी दरवाज्यात पोहोचेपर्येंत अतितीव्र वेगाने ते दार बंद झाले. सापळ्यात सापडलेल्या उंदरासारखी त्यावेळी माझी अवस्था झाली होती. दुसऱ्याक्षणी दिवा विझला..


 खोलीत गडद अंधार पसरला. दार उघडण्याची सुतरामही शक्यता नव्हती तरी मी ते उघडण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला. आता माझ्याकडे पर्याय नव्हता..


ऐका : काळ रात्र - भाग चार | शापित वाड्यातले भयावह रहस्य | भयकथा | मराठी कथा |
काळ रात्र - भाग चार काळ रात्र  - भाग चार Reviewed by Nilesh Desai on February 06, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.