काळ रात्र - भाग सहा

    त्यावेळेस मला जाणवले ते एवढेच की माझ्या सर्वांगाभोवती त्या मळकट कपड्याचे आवरण तयार होत होते. बेलगामपणे ती शक्ती माझ्यावर आरूढ होऊ लागली, जणू मानवी शरीराला कवेत घेण्याची कित्येक वर्षांची अपुरी इच्छा आज पूर्णत्वास जात होती. मी अजिबात विरोध केला नाही. मला मरणाशिवाय दुसऱ्या कशाचीही प्रतीक्षा नव्हती. फक्त ते विनाविलंब आणि कमी त्रासाचे व्हावे इतकीच माझी इच्छा होती.  

 माझ्या डोळ्यांसमोरचा अंधार आता मला घाबरवू शकत नव्हता. मी त्याची फिकीर करणे सोडून दिले होते. ती पाशवी शक्ती माझ्या शरीरात प्रवेश करत असताना झालेल्या वेदना सोसण्यापलिकडच्या होत्या. माझ्या अंगाच्या नसा फुगत चालल्या होत्या. मेंदूवरचं नियंत्रण हरवले होते, आणि तितक्यात..  तितक्यात माझ्या समोर काही देखाव्यांचे दर्शन होऊ लागले. 

  गुरुत्वाकर्षण वा हवेचा दाब नसलेल्या पोकळीतून तरंगत असल्याचा तो आभास होता. एकमेकांपासून अपरिचित असलेल्या दोन व्यक्ती आपापले मेंदू हातात घेऊन एका समांतर रेषेपासून परस्परांच्या भिन्न दिशेने तरंगत वाटचाल करत होते. त्यातला एक आत्मा माझा होता आणि दुसरा..  कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता तो चेहरा.. त्या आत्म्याच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल दया, व्याकुळता होती, माझ्यासाठी आपुलकी, माया होती. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना होती. पण का.. कशाबद्दल...?  

 मला तितकासा वेळ मिळाला नाही, माझा आत्मा त्याच्या नियतीच्या रोखाने जात होता. आत मानसिक पातळीवर असे खेळ सुरु असतानाच बाहेर माझे शरीर आता थकत चालले होते. दर एका क्षणाला त्याच्यावर होणारे आघात आता सहन होत नव्हते. ते शरीरावरचे घाव असह्य होऊ लागले तसे माझा बांध सुटला आणि त्या काळ रात्री वाड्यात माझ्या किंकाळ्या फुटू लागल्या. आतडी पिळवटून मी सर्वशक्तीनिशी ओरडत होतो, आणि माझ्या शरीरात ती काळी शक्ती स्वतःचं अस्तित्व सोडण्यासाठी चेकाळत धुडगूस घालत होती. पार जहरी.. !  क्लेशदायक.. ! शेवट अजून कसा येत नाही..?  

 त्या अंत नसलेल्या अतिश्रमामुळे माझी शुद्ध हरपू लागली होती. बेशुद्ध होता होता मला तो मंत्र पुन्हा आठवला, 


 "निश्यात्तऽ... कलीकर्णायळ्ऽ.. पिच्छवाच्याळ्ऽ.. सम्भद्धीऽ... काळंभूर्गाळ्ऽऽ...!" 


 शुद्धीवर आलो तेव्हा सकाळ झाली होती. खरेतर कालची रात्र किती भयानक आणि मोठी होती हे माझं मलाच माहित नव्हतं. किती काळ मी वाड्यात, त्या भूताळ्या खोलीत होतो. किती काळ ती अनैसर्गिक शक्ती माझ्या शरीराशी खेळत होती, मला काहीच कल्पना नव्हती. मला मृत्यू आला नव्हता पण त्या वाईट शक्तीने माझ्या शरीरात प्रवेश केला होता.  मी जिवंत असून वेड्यांच्या इस्पितळात आहे, हे समजायला मला वेळ लागला नाही. रात्रीच्या नीरव शांततेत वाड्यातून येणाऱ्या माझ्या किंकाळ्या गावात ऐकू गेल्या नसतील तर नवलच. गावातल्याच काही लोकांनी मला इथे आणून सोडले असावे. 

काळ रात्र


 जाग आली तेव्हा इथल्या खाटेवरून बाहेर दरवाज्याकडे पाहत असताना मला तो चेहरा पुन्हा दिसला. तोच चेहरा जो कालच्या देखाव्याच्या धुमश्चक्रीत मी समांतर जाताना पहिला होता. आजही त्या चेहऱ्यावर अपराधीपणाची रेषा मी अनुभवली. दरवाज्यातूनच त्या व्यक्तीने माझ्यावर कटाक्ष टाकला आणि तिथूनच काहीकाळ घुटमळत ती व्यक्ती इस्पितळाच्या बाहेरच्या दिशेने निघून गेली. काल त्यावेळी मी भयावह विचारचक्रात अडकलो असल्याने त्यांना ओळखले नव्हते. तो चेहरा माझ्या आजोबांचा होता... 

 आता काही क्षणांपूर्वीच मी एकएक धागा जोडत घडलेल्या घटनांचे आकलन करून काही निष्कर्ष काढले आहेत. ते असे की, 

  माझ्या आजोबांचे बेपत्ता होणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जो प्रसंग काल रात्री माझ्यासोबत घडला, त्याच चक्रात काही वर्षांपूर्वी माझे आजोबा अडकले होते. त्या अनामिक शक्तीला मानवी देहाची आवश्यकता आहे, कश्यासाठी.. याचे कारण त्या गूढ शक्तीइतकेच अनुत्तरित आहे. कालपर्येंत तिच्या मालकीत माझ्या आजोबांचे शरीर होते, आज माझे आहे. आज तिचा ताबा माझ्या शरीरावर येताच तिने माझ्या आजोबांना तिच्या पाशातून मुक्त केले आहे. 

  आजोबांनी इतकी वर्षे या वेड्यांच्या इस्पितळात कशी काढली असावीत. आज माझ्या येण्याने त्यांची सुटका झाली. कदाचित मलाही असेच इथे राहावे लागेल. किती वर्षे.. याचे उत्तर सध्या माझ्याकडे नाही. पण जर आयुष्यातला ऐन उमेदीतला मोठा भाग असाच सडत वाया गेला तर..?  शिवाय कुणी आलेच नाही तर..? याचे परिणाम भयंकर आहेत, माझे अख्खे आयुष्य बरबाद होईल. मान्य आहे काल रात्री मी मृत्यूला कवटाळायला तयार झालो होतो, पण जर आता मला मरण आले नाही तर जगण्यासाठी मी काही धडपड नाही का करू शकत..?

  जो कुणी तीन वेळा तो मंत्र उच्चारेल, त्याचं शरीर आपलं साधन बनवणाऱ्या त्या अनामिक वाईट शक्तीसाठी हा एक खेळ असावा. पण मला हे जमणार नाही. नाही.. नाही..  मला मानव म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करायलाच हवा... आणि आता त्यासाठी माझी काहीही करण्याची तयारी आहे..  अगदी काहीही.. 

 इस्पितळात आल्यापासून मी प्रत्येकाला ही गोष्ट सांगण्याचा आणि काही उपाय करण्याचा निरर्थक प्रयत्न करून पाहिला. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माझ्या जिव्हेवर ती वाईट शक्ती आरूढ होऊन असल्याने माझ्या उच्चारात वेडेवाकडेपणा येतो. शब्दांची सांगड जाणूनबुजून छेडछाड केल्याप्रमाणे होते, आणि मग मी बोलत असलेले कुणाला काही समजत नाही. शरीरात असलेल्या त्या वाईट शक्तीचा तो प्रभाव आहे. तरीही तिच्यासमोर मानवी बुध्दीतीमत्तेची शक्ती थोडीफार का होईना पण आहेच की. 

  ज्याअर्थी मी माझ्या मनात काल रात्रीचे विचार घोळवू शकतो. त्याचा अर्थ हाच की माझ्या मेंदूवर अजून पूर्णपणे त्या शक्तीचा अंमल नाही.   जसा प्रयत्न माझ्या आजोबांनी करत डायरीतली शेवटची पाने त्याक्षणी लिहून काढली होती, अगदी तसेच हे पत्र लिहून मी इथेच माझ्याजवळ सोडत आहे. कदाचित शेकडो-हजारो लोक वाचतील पण कर्मधर्मसंयोगाने हे पत्र जेव्हा त्या एका व्यक्तीच्या हाती लागेल, तेव्हा माझी प्रतीक्षा संपेल. 

  त्या व्यक्तीची ओळख सध्या इतकीच सांगू शकेन की तो माझ्यासारखाच उत्तम वाचक असेल. या पत्रात दिलेला मंत्र तो न अडखळता अस्खलितपने उच्चारू शकेल.  मंत्र तीनवेळा लिहिण्याचे प्रयोजन मी पत्रात केलेच आहे. त्यामुळे मी आता आतुरतेने फक्त त्या व्यक्तीची वाट पाहत आहे... 

  ज्यादिवशी तो हे पत्र वाचेल त्याच रात्री त्या व्यक्तीला माझ्यासारखे विचित्र अनुभव येतील. कदाचित माझ्याप्रमाणे त्यालाही ती रात्र 'काळ रात्र' वाटेल... 


'काळ रात्र'समाप्त
काळ रात्र - भाग सहा काळ रात्र - भाग सहा Reviewed by Nilesh Desai on February 08, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.