पिसाट वारं - भाग एक

  
पिसाट वारं


  
 


  मे महीन्यातले दिवस होते. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी येऊन आम्हाला तसे वीसेक दिवस होऊन गेले होते. त्याकाळी कधी एकदा सुट्टी लागते आणि आम्ही गावी पळतोय असं नुसतं होऊन जायचं. त्याला कारणच खास असं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे विखुरलेले भावकीतले भाऊबंद एकत्र जमणार आणि धमालमस्ती होणार हे ठरलेले असायचे. मी दहावीची परीक्षा नुकतीच दिली होती. जवळपास एकाच वयाचे सर्वजण असल्याने त्या मस्तीची मजाच काही और होती. 

    आमचे गाव तसे पूर्णपणे एका टोकाला आहे. म्हणजेच त्या भागातले सर्वात शेवटचे असे आमचे गाव. त्यापुढे फक्त डोंगर आणि वाट तुडवील तितका फक्त निसर्गच निसर्ग. बाकी पक्का रस्ता वगैरे काही भानगड नाही. हं.. मुख्य गावापासून आजूबाजूला डोंगरात वसलेल्या काही वाड्या तेवढ्या आहेत. प्रत्येक भावकीप्रमाणे फारफार पूर्वीपासून अस्तित्वात आलेल्या त्या वाड्या. त्यातलीच एक आमची वाडी. मुख्य गावापासून साधारण वीस मिनिटे कच्च्या रस्त्याने डोंगराच्या दिशेने निघालो की आमची वाडी आली. मोजून दहाबारा घरांनी मिळून बनलेली ती वाडी. त्या दहाबारा घरातील सर्व कुटुंबे एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या नात्याने जुळलेली. त्यातील लहान शालेय वयातील तीनचार मुले सोडली तर बाकी आम्ही दहाबाराजण मुंबईचे असे.

    यंदाही आम्ही सर्व टाळकी एकत्र जमून वाडीत धिंगाणा घालत होतो. दिवसभर क्रिकेट, लपाछपी, विटीदांडू, कॅरम खेळायचो आणि संध्याकाळी माझ्या घरी टेपवर मोठ्या आवाजात गाणी लावून नाचायचो. त्यावेळी मोबाईलचे फॅड आले नव्हते म्हणून आमच्या असल्या दिनक्रमात झाडून सगळ्यांची उपस्थिती असायचीच. रात्री जेवण वगैरे उरकून सगळे अंगणातल्या खाटेवर जमा व्हायचे. वर पसरलेल्या अंधाराच्या काळ्या चादरीवर नक्षीदार चांदण्यांची नांदी असायची. ते दृश्य खरोखरच विलोभनीय असे वाटायचे. रात्री आमच्या चर्चासत्रात  दुसर्या दिवसाची प्लॅनिंग व्हायची. 

   त्या रात्री आम्ही सगळेजण निवांत जेवण उरकून खाटेवर बसलो होतो. आमच्या ग्रुपमधल्या मुली सोडल्या तर आम्ही सहाजण म्हणजे मी, महेश, उमेश, आकाश, सुनील, हनुमंत पैकी सुनिल आणि हनुमंत हे गावीच असायचे. तर आमच्या अश्याच उगाचच्या चर्चा सुरू होत्या. अचानक एखादी महत्वाची बाब आठवावी तसं उमेशनं सगळ्यांना थांबवलं.

   "थांबा... थांबा.. एक महत्वाची सुचना." अतिउत्साहानं उमेश म्हणाला.

  "काय रं गड्या.. काय झालंय.?" सुनिलनं संभ्रमानं सगळ्यांकडे पाहत त्याला विचारलं. अर्थातच उमेश सोडून आमच्या सर्वांच्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव त्याला दिसले. 

  आम्हीही कुतुहलानं उमेशकडे पाहत होतो.

  "मित्रांनो उद्याचा आपला प्रोग्रॅम फिक्स झालाय.. मस्तपैकी फिस्टं करायची झक्कास आयडीया फक्त आणि फक्त माझ्या डोक्यात आलीयं..." उमेश अजूनही तितक्याच उत्साहात होता. आणि त्या उल्हासित खुलाश्यानं आम्हालाही पुरेपुर आनंद झाला. 

  आमच्या आनंदी होण्याचे निमित्त खरेच इतके भारी होते की ते शब्दांत वर्णन करणे म्हणजे त्या आनंदाला कित्येक आणि कुठल्याश्या भारीभक्कम शब्दांत एकत्रित बंदीस्त करून मांडावे असे झाले असते. फिस्टं अर्थात पार्टी म्हणजे एक वेगळीच मजा. फिस्ट करण्याचा आमचा अंदाजही निराळाच. जो मेनू ठरवला त्याचे सर्व साहीत्य प्रत्येकाने आपापल्या घरून थोडेथोडे आणावे आणि रात्री दूर शेतात जाऊन तीन दगडांची चूल करून मग छानपैकी तो मेनू तयार करावा. आणि मग तिथेच शेतात गोल करून त्या पदार्थावर तुटून पडायचे असा एकूण आराखडा असायचा. 

  "मग.. कश्याची करायची पार्टी..." मी विचारले.

  "हा यार.. आता जरा काहीतरी वेगळं सुचवा.." महेश.

  "यगळं आता काय.. जी लौकर बनतंय तीच फायनल करू.." हनुमंतनं आपलं म्हणणं मांडलं.

 "ओयं... आता लहान नाही राहीलो आपण.. आतापर्यंत आपण फक्त वेज पार्टी केलीय.. पण यावेळी आपण चिकन आणायचं.." उमेशने स्पष्ट केलं. 

  "कुंबडी...?" हनुमंतने डोळे विस्फारले.

  "एक नंबर आयडीया आहे..." आकाशही खुश झाला.

  "लगा उम्या... कुंबडी बनावायला लय टाईम लागतुय.. त्यात गावात कुंबडीवाला कापायचं दहा रूपयं ज्यादा घेतुय.." सुनिल म्हणाला.

  "सुन्या गप जरा.. हनम्याला मी बघितलंय त्याच्या घरी तोच कापतो कोंबडी.. त्यामुळे आपल्याकडे खाटीक पहील्यापासूनच तयार आहे.." उमेशने सुनिलची शंका खोडून काढली. 

 "निल्या.. म्हश्या.. तुम्ही काय बोलताय...?" हनुमंतने विचारले. 

 "हनम्या... महेश नायतर महेश्या बोल.. म्हश्या काय..?" महेश वैतागला तसा आम्ही सगळे हसायलो लागलो. 

  हनुमंत कोंबडी कापायला तयार झाला. गावठी कोंबडी परवडली नसती म्हणून नुकत्याच गावात मिळणार्या ब्रॉयलर कोंबडीवर शिक्कामोर्तब झाले. मी आणि महेश इतरांहून वर्षभराच्या फरकाने मोठे असल्याने प्लॅनिंगची जबाबदारी आमच्यावर आली. तरीही उमेशची आयडीया असल्यामुळे पुढारीपणाचा मान अर्थातच त्याचा होता. यावेळी जरा घरापासून दुरच्या शेतात जाऊन जेवण शिजवायचं, जेणेकरून झणझणीत खमंग वास सुटल्यावर मोठ्या माणसांपैकी कोणी चव पहायला तेथे येणार नाही. तसे बरेच अनुभव याअगोदर आम्हाला आले होते, म्हणूनच यावेळी खबरदारी म्हणून तसं करणं गरजेचं होतं. नाहीतर चव बघायच्या नादानं अर्ध जेवण तिथंच संपलं असतं.

  दुसर्या दिवशी नदीवरून अंघोळ करून येताना मी आणि महेशने सर्वांना प्रत्येकाची कामं वाटून दिली. संध्याकाळी पाचनंतर महेश आणि हनुमंत गावात कोंबडी आणायला जाणार होते. मी आणि सुनिल डोंगरातून सुकी लाकडे, तुरकाट्या, सुकलेली मोठाली पाने ठरवलेल्या ठिकाणी जमा करणार होतो. आकाश आणि उमेश प्रत्येकाच्या घरात जाऊन तेल, मीठ, चटणी, खोबरेलसून, टोप, पळी इत्यादी साहीत्य जमा करून घेऊन येणार होते.

  
  साधारण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी आणि सुनिलनं जळणासाठी पुरेशी लाकडं गोळा केली होती. आम्ही दोघेही दमल्यामुळे निवांत बसलो होतो. वातावरणातील गारवा वाढण्यास सुरूवात झाली होती. मी आसपासच्या परीसराकडे पाहण्यात गुंग होतो. काही अंतरावर फणसाचे एक जूने झाड आमच्यावर नजर रोखून असल्यासारखे पाहत होते. त्यापुढे जुळ्या भावांप्रमाणे एमकेकांना खेटून असलेली दोन आंब्याची झाडे वाकून आम्हाला न्याहाळत होती. त्याच्यापल्याड काहीश्या ओसाड जमिनीनंतर एक भलेमोठ्या घेराचे वडाचे झाड होते. मी बसलेल्या जागेवरून त्याच्या जुनाटश्या दिसणार्या पारंब्यानी त्याच्या खोडाला झाकल्याचा भास निर्माण होत होता. आसपास अजूनही काही मध्यमबारीक आकाराची झाडे डुलत होती. जेवण बनवण्याची ती जागा उमेशनं निवडली होती. 

   "चल लगा.. हनम्या आला..." सुनिल म्हणाला तसं मी थोडं भानावर आलो. 

  मागे पाहीले, हनुमंत आणि महेश येताना दिसले. आम्ही जवळपास सारख्या आकाराचे तीन मोठाले दगड निवडले, आणि चुल बनवून त्यात एक मोठे लाकूड आणि बारीक काटक्या व्यवस्थित लावल्या. वरून सुकलेली पानांचे आच्छादन त्यावर टाकले. एकंदर आम्ही आमचे तिथपर्यंतचे काम पूर्ण केले होते. महेश आणि हनुमंत जवळ येऊन विसावतील तोपर्यंत दुरून उमेश आणि आकाशदेखिल येत असल्याचे दिसले. 

  हनुमंतने एखाद्या सर्राईत कारागीराप्रमाणे चुलीवर जाळ करून उरलेले सोपस्कार पूर्ण केले. काही वेळातच भांड्यात चिकनचे तुकडे आणि त्याभोवती गप्पा मारत असलेले आम्ही असे चित्र होते. 

   संध्याकाळचे साडेसात वाजले होते, आणि संपूर्ण परीसर गुढ अंधारात झाकोळला गेला होता. गावात अंधार जरा लवकरच होतो. त्यातल्या त्यात आम्ही रानात असल्याकारणाने तिथे त्या अंधाराचा प्रभाव काहीसा जास्तच होता. आम्ही अजून थोडे थांबायचे ठरवले. आठ वाजेपर्यंत रस्सा बनवायला सुरूवात करू असे ठरले. गाणी म्हणत, एकमेकांशी मस्ती करत आम्ही सभोवतालच्या जगाला संपूर्णपणे विसरून गेलो होतो.


  काही वेळातच मला अचानक वातारणात काही बदल जाणवू लागले. गारठा नेहमीपेक्षा काहीसा जास्तच जाणवू लागला. थंड हवेचे झोत वारंवार अंगावर येऊन आपली उपस्थिती दर्शवीत होते. रातकिड्यांची किरकिर आताश्या जरा वाढली होती. अधूनमधून वटवाघूळांचे आवाज त्या रातकिड्यांच्या आवाजाला चिरत असल्याचे भासत होते. झाडांची सळसळ एव्हाना वाढू लागली होती. नेमकी त्या झाडांची सळसळ आहे की कुणीतरी त्या झाडांवरून सळसळत जातंय काही अंदाज बांधता येत नव्हता. मला भास होत होता का..?पिसाट वारं - भाग एक पिसाट वारं - भाग एक Reviewed by Nilesh Desai on February 01, 2020 Rating: 5

2 comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.