पिसाट वारं - भाग तीन

पिसाट वारं


पिसाट वारं - भाग दोनपासून पुढे


    पिसाटलेला वारा आमचा पाठलाग करतच होता. पण यावेळी त्याला दिशा होती. घुं..ऽऽ घुं..ऽऽ.. करणाऱ्या आवाजाची नादशृंखला एका लयीत ऐकू येऊ लागली होती. शिकाऱ्याची सारी शक्ती सावजामागे एककेंद्रीतपणे येत होती. मी हनुमंतपेक्षाही मागे राहीलो होतो आणि ती अदृश्य शक्ती, ते पिसाट वारं.. त्याच्या कचाट्यात मी आता या क्षणाला सापडणार असं सारखं वाटत होतं. याअगोदर असल्या प्रसंगाशी कधी गाठ पडली नव्हती. अनामिक भीतीने मी मनातल्या मनात साफ भेदरलो होतो पण आता त्यावर विचार करण्याची वेळ नव्हती. डोळे बंद करून मी झपाट्याच्या वेगाने धावलो. वाडीजवळच्या अवाढव्य गोडांब्याचे झाड मागे पडले आणि शेवटी माझ्या अंगातले त्राण जाऊ लागले.


 मी एव्हाना खाली कोसळणारच होतो की, वातावरणात पुन्हा बदल जाणवू लागला. यावेळी झालेला हा बदल आल्हाददायक वाटत होता. अचानकपणे आसपासचं वातावरण निवळलं होतं. सभोवतालचे आवाज, वारा सर्वांचा प्रभाव हळूहळू क्षीण होत नाहीसा झाला होता. गारवा नैसर्गिकपणे कमी-अधिक जाणवत होता पण त्याचा स्पर्श आता शरीराला टोचत नव्हता.


 समोर उमेश डोळे टक्क उघडे ठेवून जमिनीवर आडवा पडला होता, हनुमंत त्याच्याजवळच धापा टाकत बसला होता. घरं जवळ येऊ लागली होती तितक्यात समोरून आकाश, महेश, सुनिल येताना दिसले. मी कसाबसा हनुमंतजवळ जाऊन प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. श्वास भरला होता, ओठांतून शब्द फुटण्याची इतक्यात शक्यता नव्हती. "त्याची हद्द संपली..." हनुमंतने गोडांब्याकडे बोट दाखवत माझ्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर दिले. कदाचित ते जे कही होतं त्याच्या कक्षेतून किंवा त्याच्या आवाक्यातील परीघातून आम्ही बाहेर पडलो होतो. नशिब बलवत्तर होतं, म्हणून हातभर अंतरावर आलेलं ते माघारी फिरलं वा तिथंच काहीक्षण घुटमळत राहीलं होतं. देवाचं नाव घेऊन मी जमिनीवर अंग टाकलं आणि श्वासोच्छवासाची गती सुरळीत होण्याची वाट पाहू लागलो.


  'गोडांबा' हे नाव फार पूर्वी त्या आंब्याच्या गोड चवीमुळे मिळाले होते. हनुमंत तिथेच लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याच्याकडे त्या परीसराचा सारा तपशील होता. पण आज जो प्रसंग घडला त्याबद्दल त्यालाही कोडे पडले होते. तसा अनुभव याअगोदर कुणालाही आला नव्हता. कदाचित याअगोदर कुणी रात्रीच्यावेळी इकडे आलं नसावं.


 आम्ही तिघेही तेव्हा शांत होतो. आकाश, महेश, सुनिल ती हकीकत ऐकून सुन्न झाले होते. सकाळी पुन्हा तिथं येऊन शोध घेण्याचा निर्णय आम्ही संगनमताने घेतला. जोपर्यंत इतरांना सांगण्यासारखं कारण नाही सापडत, तोपर्यंत झाल्याप्रकाराची कुठंही वाच्यता न करण्याचं ठरवलं. काहीवेळ तिथे थांबून रात्री उशिराच घराकडे गेलो. भांड्यांबाबत कुणी विचारलं असतं तर टाळणं मुश्किल झालं असतं.


 दुसऱ्या दिवशी सकाळी आठला पुन्हा त्याजागी जमलो. उमेशला ताप भरला असल्याने तो येऊ शकला नाही. चूलीचे दगड, टोप, त्यावरचं झाकण सगळं काही कुठेकुठे पसरले होते. मांसाचा एक तुकडाही शोधून सापडला नाही. त्यासर्वावरून काहीही निष्कर्ष काढता आला नसता.
 "कुत्रं न्हायतर एखादं जनावर वासानं आलं असलं पाहीजे.." सुनिल तर्क लावत म्हणाला.


 "तुम्हाला नक्कीच भास झाला असला पाहिजे.." आकाशने पुष्टी जोडली.


 "मला वाटतयं काल जोराचा वारा सुटला असेल, म्हणून तुम्हाला भीती वाटली असेल.." महेशनेही आपलं मत मांडलं.


 "हो.. काल रात्री जोराचं वारं सुटलं होतं.. घरून भाकरी घेताना वर पत्र्याचा धाडधाड आवाज येत व्हता..."  सुनिलने आठवले तसे सांगितले.


 मी हनुमंतकडे पाहीले, त्याने इशाऱ्यातच मला गप्प राहायला सांगितले.


 "व्हयं लगा्.. असंच कायतरी असंल पण जीवाची भीती वाटली आन् आम्ही पळालो.. पण सुन्या फकस्त जोराचं वारं नव्हतं ते.. पिसाट वारं व्हतं ते.. पिसाट वारं..." हनुमंतने उच्चारलेल्या त्या दोन शब्दांनी अंगावर काटा आला.


 दुपारी उमेश, हनुमंत आणि मी कुणालाही न सांगता माळरानात गेलो. डोक्यातले विचार मागे पडत गेले तसा उमेशचा तापही निवळला होता. प्रत्येक प्रसंग आठवून त्यावर बारकाईने विचार केला. आमच्यापैकी कुणालाही त्या पाहीलेल्या आकृतीचं ठळक असं विश्लेषण करता येत नव्हतं. एक काळी गडद छाया यापलीकडे तिला स्पष्ट असं नाव देता येत नव्हतं. कसे देणार.. मानवी ज्ञानालाही काही मर्यादा असतात. त्या वस्तूची किंवा गोष्टीची स्वतःची अशी काही विशिष्ट घनता किंवा आकार नव्हता. त्यामुळे तिचं आकलन होतच नव्हतं. तो घाणेरडा वास घ्राणेंद्रियांनी कधी अनुभवलाच नव्हता. खरोखरच कोणती अदृश्य, अनामिक, अतिमानवी वा पाशवी शक्ती तिथे होती का..? या प्रश्नाचं उत्तर आता आम्ही तिघेही ठामपणे देऊ शकलो नसतो. शिवाय तो वारा नैसर्गिक होता की अनैसर्गिक त्याचं मोजमाप आणि प्रमाण कुठून माहीत पडणार. त्याचं दिशाहीनपणे एकाजागी खोळंबणं, पाठलाग करणं या बाबीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहील्यास स्वाभाविक ठरू शकतात.


 कोणताही तार्कीक आधार न मिळाल्याने आम्ही तिघांनी त्या आठवणीला विसरण्याचे ठरवले. भास किंवा तत्सम प्रकार अशी समजूत घेऊन त्या प्रकरणाला आम्ही गुंडाळले आणि घराकडे निघालो. त्या प्रसंगाबाबत फारसं कुणाला कळाले नाही. थोडे दिवस सुनिल, महेश, आकाशने मस्करीत तो विषय काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तो विषय कधी वाढवून दिला नाही.


 इतक्या वर्षांत ती कटू आठवण खुपदा डोळ्यांसमोर जशीच्यातशी आली. बाकी सगळे भास असले तरी एक गोष्ट निश्चितपणे जाणवली होती, आम्ही तिघांनीही अनुभवली होती आणि तिला आम्ही स्पष्ट नाव देऊ शकत होतो.


  ते पिसाट वारं होतं... 'पिसाट वारं'

ऐका : पिसाट वारं - भयकथा भाग तीनसमाप्त
पिसाट वारं - भाग तीन पिसाट वारं - भाग तीन Reviewed by Nilesh Desai on February 02, 2020 Rating: 5

2 comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.