पिसाट वारं - भाग दोन

पिसाट वारंपिसाट वारं - भाग एकपासून पुढे


  तसा आमचा गोंधळ बराच होता. पण त्यातल्या त्यात मी इतरही आवाजांचा आढावा घेत होतो. मला जाणवत असलेल्या त्या बदलांची कल्पना इतर कुणाला आलीय की नाही हे जाणण्यासाठी मी आळीपाळीने सर्वांना त्यांच्या नकळत निरखून पाहू लागलो. इतर कुणावर त्या परिस्थितीचा काहीच असर दिसत नव्हता पण हनुमंत मात्र सारखा सावध असल्यासारखा मागे वळून पाहत होता. तो कुणाला काही बोलला नाही पण माझ्या कटाक्षातून त्याची भिरभिरती नजर सुटली नव्हती. याचा अर्थ नक्कीच मला भास होत नव्हता. पण कुणास ठाऊक का, मी तिकडे दुर्लक्ष केले.


   रस्सा बनवायचे काम हनुमंत आणि मी स्विकारले असल्याने आम्ही कामाला लागलो. थोड्याच वेळात हनुमंतने चुलीचा जाळ वाढवला आणि चिकनचा रस्सा शिजायला सुरूवात झाली. आम्ही भाकरी इत्यादी घरून आणायला निघणार होतो. सुरूवातीला ठरल्याप्रमाणे हनुमंत तिथेच थांबून इतर सर्वजण जेवण आणायला घरी जाणार होते. पण मी मुद्दामच हनुमंतसोबत तिथे थांबायचे ठरवले, सोबत उमेशलाही थांबण्यास राजी केले. उगाच एकट्यादूकट्यापेक्षा संगत बरी म्हणून आम्ही तिघेही तिथे थांबलो. आकाश, महेश, सुनिल तिघे आमच्याही घरून आमची भाकरी वगैरे आणणार होते.


   "लगा.. उगाच उम्याला थांबवला...." हनुमंत एकदा माझ्याकडे तर एकदा उमेशकडे पाहत म्हणाला.


  "का रे... तुमच्या दोघांचा काय वेगळा प्लॅन होता का...?" उमेशने गंमतीने विचारले.

  मी हनुमंतच्या प्रत्युत्तराची वाट पाहत होतो. त्याला खरंच तिथं काही वेगळं जाणवलं असावं असं मला वाटत होतं. त्याच्या मनाचा मी आढावा घेऊ शकत नव्हतो, पण तो काय उत्तर देईल याची ऊत्सुकता मला होती.


  "तीन तिघाडा... काम बिगाडा हुईल बघ आता...." हनुमंत भाबड्या स्वरात उद्गारला.   "हात् तुझ्या...." मी भ्रमनिरास झाल्यामुळे वैतागून खाली पडलेला एक बारीकसा खडा त्याला उचलून मारायला गेलो पण...    सर्रर्रस्...र्..र्..सर्....र्...र्... एक काळी आकृती हनुमंतच्या मागे सुमारे पंधरावीस फुटांवरून माझ्या डोळ्यांदेखत एका दिशेहुन दुसर्या दिशेकडे अतिशय वेगाने गेली. माझ्या पापण्यांच्या उघडझाप करण्याच्या वेळापेक्षा त्या आकृतीचा वेग काहीसा जास्तच होता. थबकून माझा हात जागीच थांबला. माझ्या हातातून खडा काही सुटला नाही.


    हनुमंत चुलीच्या उजव्या बाजूला बसला होता. मी डाव्या बाजूला तर उमेश चुलीच्या समोर आमच्या दोघांच्या मध्ये होता. त्या दोघांनीही आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहीले पण तोपर्यंत ती आकृती अंधारात नाहीशी झाली होती.


  "त्.. ते काय होतं...?" उमेशचा स्वर काहीसा घाबरल्यासारखा होता. हनुमंत देखिल गोंधळलेल्या स्थितीत आजूबाजूला पाहत होता. त्यांनी ती आकृती पाहीली होती की नाही, मला माहीत नाही. शिवाय दुसऱ्या क्षणाला मीसुद्धा काय पाहीले, याचं स्पष्ट उत्तर मला कधीच देता येणार नाही. त्या आकृतीचा आकार उभा होता की आडवा..! गोल..! दंडगोल..! आयताकृती..? नाही... दाट अंधारातल्या त्या रात्री, त्या प्रसंगात ती आकृती त्या अंधारापेक्षाही गडद काळी होती, बस्स् इतकेच मी ठोसपणे सांगू शकतो. बाकी आतून मलाही काही त्याचं आकलन होत नव्हतं. पण इतकी समज होती की तो प्रकार धोकादायक होता.


 लहानपणापासून मी गावातल्या बऱ्याचश्या दंतकथा ऐकत आलो आहे. रात्री अंगणात गप्पागोष्टी करताना मोठ्या माणसांनी सांगितललेल्या कित्येकश्या गोष्टी आठवतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावासभोवताली भूतंखेतं असतात, पण ती त्यांच्या नेमलेल्या जागीच रात्री संचार करतात. कारण भुतांच्यासुद्धा ठराविक मर्यादा असतात, म्हणून दिवसाढवळ्या ते कुणालाही काही करत नाहीत. रात्री जर कुणी त्यांच्या कक्षेत गेले मग ते जाणून वा अजाणतेपणी कसेही, तर मात्र त्याला सोडत नाहीत. असे विचार आणि त्यांना पुष्टी देणारे डझनभर किस्से आम्हां मुलांना ठावूक होते, अर्थात मोठ्या माणसांकडून ऐकलेले. बाकी, त्यातलं खरं खोटं आम्हाला माहीत नव्हते वा आमचा कधी तसल्या गोष्टींशी संबंध आला नव्हता.


 वेळ रात्रीची होती. शिवाय आम्ही घरापासून दूर रानात आलो होतो. शक्यता नाकारता येत नाही की आम्ही त्या अंधाऱ्या रात्री कुणा अमानवी शक्तीच्या कक्षेत चुकून प्रवेश केला होता. मानवी मनात एकदा का शंकेची पाल चुकचुकली की त्याच्या विचार करण्याच्या कक्षा रूंदावतात. मग तो सभोवतालच्या घडणाऱ्या बारीकसारीक बाबींचाही कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो. किंबहुना असं म्हणता येईल की, नेहमीच्या सामान्य गोष्टीदेखील एखाद्या गुढार्थाने घडत असल्यासारखे वाटत राहते.


 आमच्यासोबतही तसंच काहीतरी होत होतं. त्या एका प्रसंगामुळे आम्ही तिघेही आता आसपासच्या प्रत्येक हालचालीवर, आवाजावर बारीक नजर ठेवून होतो. उमेशला तितक्यातच कापरं भरलं होतं. त्याला शक्य तितकं गप्प राहण्याचा हनुमंतने इशारा केला. काही घटका गेल्या, पण सर्व काही सामसुम होतं.


 चूलीवर ठेवलेला रस्स्याला एव्हाना उकळी फुटली आणि त्याचा 'कट्..कट्..' आवाज येऊ लागला.  त्याचा वास दरवळू लागला तसे आमचे मन पुन्हा आमच्या पार्टीकडे वळले. मी पळीने रस्स्याचे एकदोन थेंब हातावर घेऊन तिखटमीठ तपासू लागलो. सर्व काही योग्यप्रकारे पार पडले होते. चूलीतला जाळ थोडा कमी केला, आणि आम्ही बाकी तिघे येण्याची वाट पाहू लागलो.


 मघाचे भीतीदायक विचार आता मागे पडलेच होते की,


 "येऽऽ.. निल्या्ऽऽऽ..." उमेशने ती किंकाळी फोडली आणि झटका बसल्यासारखा तो माझ्यामागच्या दिशेने खुणाऊ लागला. हनुमंत उमेशकडे विस्फारलेल्या नजरेने पाहत होता. 


"तिकडं बघू नकोसऽ...!" हनुमंत लगबगीने उठत मोठ्याने ओरडला  आणि मी मागे पाहण्याचे टाळले. हवेतला गारठा पुन्हा वाढला आणि आता त्यासोबत उग्र घाणेरडा दर्पही वातावरणात मिसळला. त्याच क्षणाला थंड गार हवेचा झोत तीव्रतेने माझ्या मागून आला, अंगभर जीवघेणा शहारा आला. पण यापेक्षाही भयानक काहीतरी पुढच्या क्षणाला पाठीवर येऊन थडकेल अशी धावती शंका वा भीती उरात वाटली.


 एकाएकी तिथले वातावरण बदलले होते. मूळची शांत, रम्य असणारी ती जागा आता अमानवी, पाशवी शक्तीने झपाटल्यासारखी वाटू लागली होती. तिथला गारवा नेहमीसारखा नसून तो अनैसर्गिक वाटत होता. तिथल्या वाऱ्याला दिशा नव्हती, तो लगाम सुटलेल्या हट्टी घोड्याप्रमाणे सैरावैरा इकडून तिकडे धावत खिंकाळत होता. सोबत जमिनीवरची धुळ, इस्तत: पसरलेली सुकलेली पाने, काटक्या यांनाही उडवत होता. त्या वाऱ्याचा आवाज, नाद, दिशा कशाकशांतच सुसूत्रता नव्हती. कोणत्याही दिशेने तो पुढे गेला तरी राहुन राहुन पुन्हा आमच्याजवळ येत होता. ते दृश्य, तो अनुभव सारेच अकल्पनीय, अनाकलनीय आणि अवर्णनीय होते.


 सेकंदाच्या दहाव्या भागापेक्षा कमी अवधीत एकामागोमाग एक अशी वातावरणातल्या बदलाची सुरुवात झाली होती, ही लक्षणे ठिक नव्हतीच. हनुमंत, उमेश आणि मी तिघेही थबकून गेलो होतो. जर का लौकरच हातपाय नाही हलवले तर पुढे अजून विचित्र अनुभव घ्यावे लागले असते. मी आणि हनुमंत उठलोच होतो पण उमेश अजून पूर्णपणे तयार नव्हता. वाऱ्याचा एक झोत पुन्हा आमच्या अंगावरून पुढे निघून गेला आणि हीच ती योग्य वेळ असा निर्धार करून आम्ही दोघांनी उमेशला अक्षरशः मागे खेचला. त्या गडबडीत उमेशच्या पायाने चूलीवरचा टोप खाली कलंडला, रस्सा खाली सांडला आणि अगदी त्याचवेळेस आमच्या सभोवतालचं थंड हवेचं आवरण एकाएकी नाहीसं झाल्यासारखा भास झाला.


 आम्ही शक्य तितक्या वेगाने पळायला लागलो. उमेश त्यातूनही मागे वळून वळून पाहत ओरडत होता. त्याच्यामते ती गडद काळी आकृती आम्ही बसलेल्या जागेवर पसरली होती. आम्हाला त्यागोष्टीत काडीचाही रस नव्हता. त्याला ओरडतच हनुमंतने मागे न पाहण्याविषयी सांगितले.  आम्हाला माहीत होते की ती आकृती फारकाळ तिथे थांबणार नाही. एकदा का तिथलं काम संपलं की ती आकृती पुन्हा आमच्या मागे येणार होती. तिच्या वेगापुढं आमचा टिकाव लागणं निव्वळ अशक्य होतं. वाडी थोडी लांबच होती. धापा टाकत आम्ही पायाखाली येईल ते तुडवत धावत होतो. उमेशला पुढे ठेऊन एकाबाजूने हनुमंत आणि दुसऱ्याबाजूने मी त्याला पिटाळत होतो. जरी तिघांच्याही मनात त्या भयानक प्रसंगाने भीतीचा जन्म झाला असला, तरी सर्वात जास्त प्रभाव उमेशवर पडला होता. तो मध्येच भयसाटल्यासारखा मागे मागे वळून पाहायचा, ओरडायचा. त्यामुळेच जरी धोका आम्हालाही होता तरी त्याच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक होते.


  तीनचार बांधाच्या फटी धावत, उड्या मारत आम्ही पार करत जवळपास निम्मे अंतर गाठले होते. आता आमच्या मागूनही खसपटण्याचा, सरपटण्याचा आवाज येऊ लागला होता. ते जे काही होतं ते कदाचित आता आमच्या मागावर होतं. हवेतला गारवा हळूहळू पुन्हा वाढू लागला पण अगोदर जाणवलेला त्यापेक्षा तो कमी होता, याचाच अर्थ ते जे काही होतं ते अजून आमच्याजवळ पोहोचलं नव्हतं. मधुनच वटवाघुळांचे हवेला चिरणारे आवाज येऊ लागले. झाडांची सळसळ त्यात भर घालू लागली. तो गारठा वाढण्याअगोदर आमचे वाडीपर्यंत पोहोचणे निकडीचे होते.


 श्वास भरून यायला लागले होते. उमेश मागे वळणारच होता की, हनुमंत धावत धावतच ओरडला..


"काय झालं तरी थांबायचं नाहीऽ... पळाऽऽ..." त्याच्या आवाजानंच उरलंसुरलं बळ जमा करून आम्ही अजून त्वेषाने पळू लागलो.

ऐका : पिसाट वारं - भयकथा भाग दोन

क्रमश:

पिसाट वारं - भाग तीन
पिसाट वारं - भाग दोन  पिसाट वारं - भाग दोन Reviewed by Nilesh Desai on February 01, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.