काळ रात्र - भाग एक


marathistory.online
  
 
  "निश्यात्तऽ... कलीकर्णायळ्ऽ.. पिच्छवाच्याळ्ऽ.. सम्भद्धीऽ... काळंभूर्गाळ्ऽऽ..." 

  मला खात्री आहे, माझ्या मुखातून जन्म घेतलेल्या या शब्दांना तुम्ही समजू शकत नाहीत वा त्यांना जोडून तयार झालेल्या वाक्याचा अर्थही तुम्हाला कळणार नाही. ते बोलताना माझी जिव्हा अतिशय जड होऊन जाते. माझा स्वत:चा असा ताबा तिच्यावर राहत नाही किंवा माझ्या शरीराचाच एक भाग असूनसुद्धा ती जीवनी (जीभ) इतर कुणाच्या प्रभावाखाली अनैसर्गिक इशाऱ्यावर वळवळत असते. माझ्या मनातून येणारे उच्चार तिच्यामुळेच हुबेहूब बाहेर पडत नाहीत, त्यात कृत्रिमता येते ती त्या इशाऱ्यामुळेच. म्हणूनच मला काय सांगायचे आहे ते तुम्हाला कळणार नाही. अर्थात जोपर्यंत मी त्या शापाची पाठराखण करणाऱ्या त्या शक्तीला फसवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तरी ते शक्य नाही.

 हा शाप कोणता? मी त्याच्या कचाट्यात कसा सापडलो? नकळत की जाणतेपणी? हे सर्व प्रश्र्न आता खुप मागे राहीले आहे. यावेळेपासून सुटकेचे फक्त एखाददोन मार्ग शिल्लक आहेत आणि मला मनुष्यधर्माला जागून शेवटपर्यंत प्रयत्न करणं आवश्यक आहे.

 आज मी इथे या वेड्यांच्या इस्पीतळात येऊन पडलोय याचा अर्थ मी वेडा आहे असा मुळीच होत नाही. कालपर्यंत मी तुमच्यासारखंच मुक्त आयुष्य जगत होतो. गेल्या महिन्यात वारसाहक्काने मिळालेल्या गडगंज संपत्तीला कवटाळत मी शहरातल्या हुजरेगिरीला लाथाडून कालच आमच्या वाड्यात प्रवेश केला होता. 

 पाच दशकांपूर्वी आजोबांनी हा वाडा बांधला होता. माझ्या आजोबांचा स्वभावही कदाचित माझ्यासारखाच एकलकोंडा किंवा माणूसघाणा असावा. त्यांनी वाडा गावापासून काहीसा बाहेरच बांधला होता. आजोबांना गुढ गोष्टींचं मोठ आकर्षण होतं, हेदेखील एक कारण असू शकत. आमच्या स्वभावातला हा पैलूसुद्धा मिळताजुळता होता. 
 मागे आजोबा बेपत्ता झाले तेव्हा वडील एकदा गावी येऊन गेले होते. आजोबांनी वाडा, जमिन इत्यादी अगोदरच वडीलांच्या नावावर करून ठेवले होते. माझ्या वडिलांना आजोबांच्या इस्टेटीत काडीचाही रस  नव्हता. कर्तव्य म्हणून थोडे दिवस गावी राहून त्यांनी आजोबांना शोधण्याचे सर्व प्रयत्न करून पाहीले पण हाती निराशा लागल्यावर ते परतले. पुन्हा कधी ते इकडे आल्याचं मला स्मरत नाही. गेल्या महिन्यात वडील हार्ट अटॅकचं निमित्त होऊन मला सोडून गेले. त्यांच्या पश्चात घराण्यात आता मीच होतो ज्याचा या सर्व इस्टेटीवर अधिकार होता.

 इतकी संपत्ती मिळाल्यानंतर तिचा उपभोग न घेणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच झाला असता.  माझ्या जन्मभराची तरतूद झाली होती. अगोदर सांगितल्याप्रमाणे मी (अतिशय) माणूसघाणा असल्याकारणाने लग्न, संसार वगैरे कल्पनांमध्ये मला अजिबात स्वारस्य नव्हते. म्हणूनच काल दुपारी वाड्यात पोहोचेपर्यंत मी पुढील जिवनाचे आराखडे बांधत होतो. 

 वाडा जुनाट असला तरी अजूनही भक्कम स्थितीत आहे. दगडी बांधकामामुळे त्याला रंगरंगोटी करण्याची मुळीच आवश्यकता नाही. वाड्यात आल्यानंतर मी सर्वप्रथम संपूर्ण वाडा झाडायला घेतला. इतक्या वर्षांत मानवी हालचालींचा संबंध नसलेल्या त्या वाड्यात अनामिक शांततेने आपलं स्वत:चं असं स्थान निर्माण केलं होतं. मुख्य दरवाजापासून आत भलामोठा व्हरांडा होता. त्यापुढं प्रत्येकी उजव्या आणि डाव्या बाजूला समोरासमोर एक अश्या दोन खोल्या होत्या. त्यांना आणि मधल्या दरवाज्याला जोडणाऱ्या आणखी दोन खोल्या समोरच्या अंगाला होत्या. डाव्या बाजूच्या खोलीला लागूनच वर जाणारा जिना होता किंवा आहे. वर जवळपास ढोबळमानाने विचार करता जागेचा पुरेपूर उपयोग करत बांधलेल्या पाच खोल्या. एकंदर वाडा मोठा ऐसपैस होता.

काळ रात्र


 मला खालचा भाग साफ करताकरता संध्याकाळ झाली. दोन-तीन तासांच्या त्या श्रमाने मला थकल्यासारखे झाले होते. चहाची तल्लफही लागली होती. झाले तेवढे पुष्कळ आहे, बाकीचे उद्या पाहू असा विचार करत मी सोबत आणलेले सामान बाहेर काढून स्वयंपाक घर सुसज्ज केले. फक्त एक स्टोव्ह, माचिस, दोन टोप, एक तवा आणि दोन थैल्या किडूकमिडूक इतकेच सामान एकट्या माझ्यासाठी पुरेसं होतं. 

 चहा होईपर्यंत मी खालच्या भागातल्या उजव्या बाजूला असणाऱ्या खोलीतली लाकडी आरामखुर्ची बाहेर व्हरांड्यात आणून ठेवली. चहा पित असताना त्या खुर्चीवर रेलून बसत मी निरीक्षण करू लागलो. मुख्य दरवाज्याला माझी पाठ होती. खुर्ची कर्र्ररररऽ करर्ऽ आवाज करत होती. तसे मी येऊन चार तास झाले होते आणि तेवढ्यात वाड्यातल्या चार खोल्या, स्वयंपाकघर, न्हाणीघर झाडून झालं होतं. खिडक्यांवरची, कुठल्याकुठल्या कोनाड्यातली जळमटं निघाली होती. पण अजूनही तो वाडा आपलं उदासपण, भकासपण राखून होता. खुर्चीचा आवाज आणि माझा अपवाद वगळला तर बाकी कोणताही जिवंतपणा तिथे जाणवत नव्हता. 

 मला गोंधळ, गडबड आवडत नाही. शांत, एकांत जागी राहायला मला खुप आवडते. इथं आल्यापासून मला आजपर्यंत कधी नाही इतकी शांतता लाभली होती. पण का कुणास ठाऊक, वाड्यातली ती शांतता  नैसर्गिक वाटत नाही. त्यात एकप्रकारचा आव आणल्यासारखं वाटत होतं. आजचा पहीलाच दिवस, जागा नवीन आहे म्हणून वाटत असावं कदाचित. मी माझं निरीक्षण सुरू ठेवले.

 चहा संपल्यावर मी रिकामा कप खाली ठेवला आणि पुन्हा नजर वर झाली तसं माझं लक्ष वरच्या मजल्यावर गेले. चहा पिऊन तरतरी तर आलीच होती. म्हटलं काय करावं, घ्यायच्या का वरच्या खोल्यासुद्धा झाडून? हो.. नाही.. करत एकदाचा मी तो निर्णय घेतला आणि झाडू आणि पेटवलेला दिवा घेऊन मी जिन्याकडे मोर्चा वळवला. 

 तेव्हाचा तो निर्णय माझाच होता का...! याबाबत मी अजूनही साशंक आहे. कारण मला माझं मन नकारात्मक उत्तरं देत असतानाही मी नकळत हालचाली करू लागलो होतो. वरच्या मजल्यावर गारवा जास्तच जाणवत होता. बाहेरच्या अंधाराने बघताबघता वाड्याचा हर एक कोना आपल्या कवेत घेतला होता. बरे झाले सोबत दिवा आणला होता. सकाळ झाली की पहीलं वीजेचा बंदोबस्त करावा लागणार होता. मी मनातल्या मनात उद्याचा विचार करत होतो. पण त्या क्षणाला पुढे असं काही वाढून ठेवले असावे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. 


क्रमशः

काळ रात्र - भाग एक काळ रात्र - भाग एक Reviewed by Nilesh Desai on February 03, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.