लग्न

लग्न

  आशा माहेरी लाडात वाढली असली तरी हुशार, कामसू आणि मनमिळावू होती. समोरचा प्रभावित होईल इतका छान स्वभाव होता तिचा. तिला बडबड करायला खूप आवडायचं. म्हणजे विषय कोणताही असो आशा त्यावरचं आपलं मत भरभरून मांडायची. अगदी एखाद्या विषयाची तिला काहीच माहिती नसली तरीही त्या विषयाला अनुसरून दुसरा एखादा नवाच विषय काढायची. सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारी आशा सर्वांना आवडायची. 

अशी ही आशा लग्नापूर्वी नुकतीच उमललेल्या फुलाप्रमाणे नेहमी टवटवीत असायची. 

प्रत्येक मुलीच्या लग्नाबाबतीत वा भावी जोडीदारापासून काही अपेक्षा असतात. आशाही त्याला अपवाद नव्हती. आपलं लग्न थाटामाटात व्हावं, जोडीदार सज्जन आणि भरपूर प्रेम करणारा असावा असं तिला मनापासून वाटायचं. त्यानं येताजाता आपल्यावरचे प्रेम व्यक्त करावे, कधी फिरायला न्यावे, वेळ काढून गप्पा माराव्या, त्याचं बोलणं रोमांचित करणारं असावं, त्याच्या आईवडिलांचं ऐकत असला तरी मलाही समजून घ्यावं. सरळ साध्या अश्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या आकांक्षा होत्या. 

लग्न तिला जसं हवं होतं तसं थाटामाटात झालं. पण बाकी अपेक्षांबाबतीत मात्र तिच्या पदरी निराशा लाभली. सुशिक्षित कुटुंबातले सासूसासऱ्यांनी नव्या बदलांना स्वीकारत मुलगा आणि सून यांच्यासाठी अगोदरच वेगळ्या घराची सोय केली होती. पण तरीही नवरा तिच्याशी काही अंतर ठेवूनच राहायचा. तो शिस्तप्रिय होता, घडयाळाच्या काट्याप्रमाणे त्याचा दिनक्रम ठरलेला असायचा. 

त्याला सकाळी चहा, नाश्ता दिल्यावर आशा तो काहीतरी विषय काढेल या अपेक्षेने त्याच्याकडे पाहत असे. पण त्याचं लक्ष संपूर्णपणे वर्तमानपत्रात असे. 

तिने एकदोनदा स्वतःहून विषय काढण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण तो फारसं काही बोलत नसे. शिवाय त्याला वायफळ गोष्टींवर चर्चा आवडत नसत.  सकाळी कामावर जाणे, संध्याकाळी येणे, जेवणे,  झोपणे या असल्या काटेकोरपणे जगण्याची त्याला जणू सवयच लागली होती. पहिल्या रात्रीच तेवढा तो तिच्या जवळ आला होता, पण कदाचित निसर्गाची गरज म्हणूनच. लग्नाला आता महिना होत आला पण पुन्हा तो तिच्याशी कधी गरजेव्यतिरिक्त काहीच बोलायचा नाही.  

 आशाचा स्वभाव मात्र थोडा बदलू लागला होता. दिवसभर घरात एकटं राहून तिला कंटाळा यायचा. आजूबाजूला राहणारी मंडळी कुणाच्या अध्यात ना मध्यात असायची. म्हणून आशाच्या मूळच्या स्वभावविपरीत वातावरण तिथे निर्माण झाले होते  मधल्या काळात आशा माहेरी जाऊन आली. तिचे सासूसासरेही एकदोनदा घरी येऊन गेले. आशाने कोणाकडेही तक्रार केली नाही पण आतल्याआत तिचे मन तिला खायला उठायचे. वेळ जाता जायचा नाही. 

घरी करण्यासारखी बरीच कामे असूनही ती चटकन संपून जायची पण वेळ मात्र हळूहळू सरकायचा. नवरा रोज सायंकाळी घरी यायचा, पण तो असून नसल्यासारखं करायचा. या सर्वाला आशा आता कंटाळू लागली. लग्नाआधी आयुष्याचा मनमुराद आनंद लुटणारी आशा हल्ली निराशेच्या गर्तेत अडकू लागली. हे योग्य नाही याची तिला जाणीव होती, परंतु एक पत्नी म्हणून नवऱ्याला त्यासंबंधी जाब कसा विचारावा हे तिला कळत नव्हते.

 आपल्याकडच्या संस्कारात हेच तर शिकवले जाते. बऱ्याचदा कुटुंब सुशिक्षित असले आणि सून शिकलेली हवी असली तरी तिच्यात निर्णयक्षमता असणे मान्य नसते. दुय्यम स्थानी असलेल्या पत्नीला घरातील चुकीच्या बाबींवर बोलण्याचा हक्क नसतो. मुलीच्या जातीला पडतं घ्यावेच लागते. अर्थात आता परिस्थिती सुधारत असली तरी अजूनही बऱ्याचदा कुटुंबात हेच घडते, याला कारण लहानपणापासून मुलीच्या मनावर बिंबवण्यात आलेलं बाईपणाचं स्थान. 

मेघाच्या बाबतीत तसंच होत होतं. ती स्वतः कितीही हुशार वा बडबडी असली तरी सासरच्या वातावरणात नवऱ्याजवळ काही बोलण्यास टी कचरत होती. पण तिच्या सहनशक्तीचाही कुठेनाकुठे अंत होता. 

एक दिवस सकाळी नवरा नाश्ता करत असताना त्याचं लक्ष बाजूला ठेवलेल्या पत्रावर गेले. नवऱ्यासाठी नाश्ता देताना आशाने त्याला लिहिलेले पत्र जाणूनबुजून तिथे ठेऊन आत निघून गेली होती. त्याने पत्र खोलून वाचले. 

आशाने लग्नाआधीच्या स्वतःच्या अपेक्षा त्यात लिहिल्या होत्या. तिचा स्वभाव, तिला काय आवडते, तिचे आई वडील, मित्रमैत्रिणी यांविषयी लिहिले होते. शिवाय या घरात आल्यापासून तिच्यासोबत काय होत आहे, हे सुद्धा तिने ठळकपणे मांडले होते. 

त्याने पत्र वाचून पुन्हा घडी करून होते तिथेच ठेवून दिले आणि तो निघून गेला. 

आशा धावत आतून बाहेर आली, तिने पाहिले तर पत्र तिथेच होते. तो सुद्धा निघून गेला होता. त्याच्यावर कसलाच असर पडला नाही या विचाराने आशाच्या डोळ्यांत पाणी आले. हताश होत ति पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली. 

तो दिवस तिला अजूनच त्रासदायक गेला. सकाळचीच घटना सारखी डोळ्यसमोर येत होती. तो इतका निष्ठुर कसा असू शकतो याचेच तिला आश्चर्य वाटत होते. आज तो घरी आला की काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावायचे तिने ठरवले. 

एक टवटवीत फुल आता कोमेजून जाण्याच्या अवस्थेत होते. 

त्या संध्याकाळी तो आला तसे ती त्याच्यासमोर आली. तिच्या मनातले प्रश्न ओठावर येत नव्हते. डोळे बंद करून काही बोलण्याचा प्रयत्न करणार होतीच, पण तोपर्येंत त्याने त्याची बाजू मांडली. 

त्याला मुळात इतक्यात लग्न करायचेच नव्हते. त्याला करियर पाहायचे होते. तरीही घरातल्यांच्या दबावापुढे तो नमला. इथेच सगळं घोळ झाला. 
त्यामुळे प्रयत्न करूनही तो तिच्या फारसा जवळ जाऊ शकला नाही. 

तिला सगळं समजावून त्याने तिची माफी मागितली आणि पुन्हा तसे न करण्याचे वचन दिले. 

लग्न लग्न Reviewed by Nilesh Desai on March 17, 2020 Rating: 5

1 comment:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.