परतफेडपरतफेड   सुमनच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. कधीकधी तर दोन वेळच्या जेवणाचीही पंचाईत व्हायची. वडिलांचा पगार तुटपुंजा होता. आईवर लहानग्या भावाची जबाबदारी होती. तरीही सुमनने खूप शिकावे अशी तिच्या आईची इच्छा होती. 

आईच्या उपदेशांमुळेच का होईना शिकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती लाभलेली सुमन विज्ञानात बारावी पास झाली आणि आईला आनंद झाला. तो क्षण काहीसा खास यासाठी होता कारण आदल्या रात्री घरात सर्वजण उपाशीच झोपले होते. वडिलांची नोकरी गेली होती, आता ते हातावर मिळेल तिथे काम करू लागले होते. 

कित्येक वर्षांत सुमनला नवीन कपडे मिळाले नव्हते. आसपास राहणाऱ्यांपैकी एखाद्या मुलीला कपडे तोकडे होऊ लागले की ते सुमनकडे यायचे. ते वापरून मिळालेले कपडे घालतानाही सुमनच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. दिवाळी, दसरा सण यायचे, निघून जायचे. पण सुमनच्या घरातले वातावरण नेहमीसारखेच असायचे. गोडाधोडाचे जेवण कधी कुठल्या लग्नकार्यात वा मैत्रिणीच्या घरी गेल्यावरच मिळायचे. खुपश्या छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी सुमनच्या वाट्याला कधी फिरकल्याच नाहीत. आयुष्य कटुगोड अनुभवांचे डोस मात्र वेळोवेळी पाजायचे.

बारावीपर्येंत सुमनला शिक्षणाचा फारसा खर्च आला नव्हता. थोडीफार फी एवढी सोय कुठून ना कुठून तरी व्हायचीच. सुमन बारावी पास झाल्यावर आनंदी झालेल्या आईच्या मनात काहीप्रमाणात रुखरुखही होती. आईला माहित होते की पुढच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैश्यांचा बंदोबस्त त्यांच्याकडून होऊ शकत नव्हता. 

सुमनलाही या गोष्टीची जाणीव होती. नातेवाईकांकडून पैसे मागण्याची सोय नव्हती. तरीही जमेल तिथून प्रयत्न करायचेच पण पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचाच असा चंगच सुमनने बांधला. डिग्रीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाची तारीख जवळ आली होती. कॉलेजमध्ये जवळपास सर्व शिक्षकांकडे विचारून झाले होते. ते बिचारे शिक्षक, त्यांनाच दोनदोन महिने पगार नीट भेटत नव्हता. सुमन हताश होत चालली होती, पण तिने जिद्द सोडली नव्हती.

प्रवेशाच्या दोन दिवस आधी एका शिक्षकाच्या सांगण्यानुसार तिने नगरसेवकाचे कार्यालय गाठले. सकाळी दहा वाजता सुमन नगरसेवकाच्या कार्यालयाबाहेर जाऊन उभी राहिली. आतमध्ये अगोदरपासूनच कुणीतरी होते म्हणून तिला बाहेरच थांबवून ठेवले होते. जवळपास तासभर तरी आतमध्ये चर्चा सुरु होत्या. तितक्या वेळात सुमनचं मनातल्या मनातच द्वंद्व सुरु होतं. मनावर खूप दडपण आलं होतं. अश्या ठिकाणी येण्याची तिची पहिलीच वेळ होती. डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या होत्या.

'हे फी ची व्यवस्था करतील का.. काही वेडंवाकडं तर बोलणार नाहीत ना.. त्यांच्याकडे कसे पैसे मागायचे..? आपल्याला काहीच कसं वाटत नाही असं जिकडे तिकडे हात पसरवायला.. ! मीच इतकी लाचार का आहे..? आईला कळले तर काय सांगणार तिला..? इतकी काय गरज आहे शिकण्याची..? बस्स झाले का इथपर्येंतच.. बारावी म्हणजे खूप झाले ना मुलीच्या जातीला...!'

'अगं.. असं हरून चालणार नाही.. तू चोरी करायला आलेली नाहीस इथे.. आणि काही फालतू कारण नाही तुझ्याकडे.. कसली आलीय यात लाज.. कुणाचं वाईट तर नाही करत आहे.. शिकायचं आहे अजून.. मागतेय पैसे.. ! देणं न देणं त्यांचा विचार..'

सुमनच्या डोळ्यांतून अश्रू घरंगळत गालावर पसरू लागले. तितक्यात कुणाच्यातरी हाकेनं ती भानावर आली. आतमधूनच बोलावणे आलेले. आत जायचे की नाही या विवंचनेतच काहीक्षण घुटमळण्यात गेले. शेवटी मनाशी पक्कं करून तिने अश्रू पुसले आणि आत गेली. 

आतल्या साहेबांना आपली आतापर्येंतची गुणपत्रकं इत्यादी कागदपत्रे दाखवली आणि पहिल्या वर्षाच्या प्रवेश फीबद्दल सांगितले. तिला वाटलेले त्यापेक्षा आतले वातावरण अगदीच सहज होते. साहेबांनी कोणतीही अट न घालता स्वखर्चातून तिची प्रवेश फी भरण्याची तयारी दर्शवली. 

इतकेच नाही तर त्यांनी "पुढील दोन वर्षेंही फीची सोय होईल, तू फक्त अभ्यासात लक्ष दे" असेही कौतुकाने सांगितले. 

त्या अनपेक्षित मदतीने सुमनचे मन भरून आले. घरी येऊन तिने आईला सर्वकाही सांगितले. आईनेही मनोमन त्या माणसाला धन्यवाद देत देवाजवळ त्याच्या सुखाची प्रार्थना केली. 

हळूहळू घरातला थोडाथोडा करून भार उचलत पुढच्या तीन वर्षांत सुमनने पदवी शिक्षण पूर्ण केले. वडिलांना चांगले काम मिळाले होते.  लहान भाऊ शाळेत जायचा. आई घरातच काही छोटीमोठी कामे करायला घ्यायची. एकंदरीत घराची गाडीही बऱ्यापैकी रुळावर आलेली होती. 

निकाल हातात आला त्याचदिवशी सुमनने आपल्या मनातली इच्छा आईजवळ व्यक्त केली. ते ऐकून तिची आई अभिमानाने आपल्या मुलीकडे पाहतच राहिली. 

दुसऱ्याच दिवशी सुमन तिच्या घरापासून काही अंतरावर सुरु असलेल्या इमारतींच्या बांधकामाजवळ आली. तिथल्या बायामाणसांशी थोडावेळ चर्चा करून तिने त्यांची चिल्लीपिल्ली एका मोकळ्या जागेत गोळा केली आणि  त्यांना बालभारतीतल्या सोप्या सोप्या कविता शिकवू लागली. 

कॉलेजमध्ये असताना तिने येताजाता बऱ्याचदा अश्या मुलांची धडपड पाहिली होती. ही मुलं उन्हात तापतात, घाणीत पडतात, लागते, खरचटते पण तरीही त्यांच्यावर कसलाच असर होत नाही. का..? कारण ती दुर्लक्षित असतात. अगदी कामाच्या व्यापात त्यांचे आईवडीलही खूपदा त्यांच्याकडे कानाडोळा करतात. सुमनला ते दिसायचे आणि 'शिक्षण म्हणजे काय' हे तरी कमीतकमी त्या मुलांना शिकवावे असे तिला मनात वाटत राहायचे. 

मूलभूत शिक्षणासाठी स्वतःची झालेली फरफट सुमन विसरू शकत नव्हती. जर त्यावेळी तिला मदतीचा हात भेटला नसता तर ती कोलमडली असती. म्हणूनच आपल्याहून दुर्बल घटकांचं सक्षमीकरण करण्यासाठी हातभार लावणं तिला आवश्यक वाटत होतं आणि शिक्षण हाच त्याचा पाया होता. म्हणूनच सुमनने ही निराळी वाट पकडण्याचे ठरवले. भविष्यातल्या संकल्पना खूप होत्या पण सुरुवात इथूनच करायची होती.

इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले तसे सुमनचा निरोप घेऊन तिथली मुलं आईवडिलांसोबत निघून गेलीत. पण जाताना त्यांच्या आईवडिलांच्या नजरेत सुमनला आपुलकी दिसून आली. त्या दिवशी मुलांनीही सुमनला तिने शिकवलेल्या कविता म्हणून दाखवल्या. आपल्या कामाबद्दल सुमनला अभिमान वाटू लागला. पण हे इतक्यातच थांबवायचे नव्हते.

एकदोन दिवसांतच सुमनला जवळच्या महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वीसेक कुटुंबांची वस्ती सापडली. तिथली लहान मुले सिग्नलच्या वेळी रस्त्यावर येऊन भीक मागण्याचा धोका पत्करत होती. त्यांचे आईवडिल कामासाठी आसपासच कुठंकुठं विखुरलेले असत. एका सायंकाळी त्या वस्तीत जाऊन सुमनने सर्व पालकांची समजूत घातली. अर्थात तिच्या प्रस्तावाला सुरुवातीला थोडाफार विरोध झाला. पण स्वतः शिकलेल्या सुमनकडे त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे होती.

पुन्हा एकदा सुमनची शिकवणी सुरु झाली. यावेळी बावीस मुले तिच्याकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवीत होती. सुरुवातीला सुमनकडून अक्षरओळख, कविता, बोधपर गोष्टी शिकल्यावर त्या लहान मुलांमध्येही शिकण्याची आवड निर्माण होऊ लागलेली. पुढचं शिक्षण नीट व्हावं यासाठी सुमन मुलांच्या आईवडिलांचं मन वळवायची. तिचं म्हणणं त्या अडाणी आईवडिलांना पटायचं. मुलांना सरकारी शाळेत दाखल करण्यासाठी ते विनातक्रार तयार होत असत. 

 हळूहळू सुमनची स्वतःची अशी ओळख निर्माण होऊ लागली. तिच्या कामाचं कौतुक होऊ लागलं होतं. सुमनच्या कामात कोणताही स्वार्थ नव्हता. पैसेही काहीच भेटत नव्हते. पण तिला मिळणारा आनंद लाखमोलाचा होता. एखादी गोष्ट निस्वार्थीपणे करत गेले की त्यात यश भेटतेच. त्या यशाला, आनंदाला पैश्यात कधीही मोजता यायचं नाही.

वर्षभरानंतर सुमनसाठी चांगलं स्थळ सांगून आलं. सुमनला नुकतेच विसावे वर्ष लागले असले तरी नकार देण्यासारखं काहीच कारण आईवडिलांना दिसत नव्हतं. शिवाय स्थळ जवळचेच असल्याने ना आईवडिलांना सुमनची काळजी लागली असती ना सुमनला आईवडिलांची चिंता वाटत राहिली असती. भेटीगाठी झाल्या, सासरचे सुशिक्षित आणि समंजस होतं. सुमनला याहून चांगलं स्थळ भेटलं नसतं. 

होकार कळवताना सुमनने आपल्या कामाची कल्पना सासरकडच्या माणसांना दिली होती. तिला वाटले की सासरची माणसे हरकत घेतील पण तसे काहीच झाले नाही.

"अगं.. तुझ्या त्या कामामुळेच तर तू आम्हाला भावलीस.." होणाऱ्या सासूने कौतुक केले.

सासर श्रीमंत होतं. घरात सगळेच सुशिक्षित असल्याने तिच्या शब्दाला मान होता. माहेरचेही दिवस पालटले होते. आता लग्नानंतरही सुमन त्याच उड्डाणपुलाखाली आपली छोटीशी शाळा चालवायची. तिला कधीही कसलाही संकोच वाटला नव्हता. एव्हाना आसपासच्या इतरही वस्त्यांमधून बरीच मुले तिच्याकडे येऊन बसत. सुमन सर्वांना आपलेसे करून घेत असे.

एक दिवस दुपारी अशीच एक मोठी गाडी सिग्नलला येऊन थांबली. गाडीत मागे बसलेल्या व्यक्तीची नजर मुलांना गोष्ट सांगत असलेल्या सुमनकडे गेली. चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगून ती व्यक्ती लगबगीने खाली उतरत सुमनकडे गेली. सुमनचेही लक्ष तिकडे गेले.
दोघांनी एकमेकांना ओळखले.

"तुमचे फी चे पैसे परत करण्याचा विचार होता मनात, पण ते कर्ज तसेच डोक्यावर राहावं असं मनापासून वाटते." सुमन त्यांच्याकडे पाहत म्हणाली.

"अगं.. काहीही बोलू नकोस.. त्या पैश्यांचा असा सदुपयोग माझ्याकडून होऊच शकला नसता.. इतकी मोठी परतफेड जी समाजाला तू देऊ केलीस यातच त्या पैश्यांचे सार्थक झाले. 'मुलगी शिकली प्रगती झाली' असे का म्हणतात हे आज तुला पाहताना मला कळत आहे. तुझ्याजागी एखादा मुलगा असता तर शिकून कुठेतरी नोकरीला लागला असता. निःस्वार्थ सेवाभाव एका स्त्री मध्ये जन्मजात असतो आणि आज तुझ्यारूपाने या तुमच्यातल्या या गुणांची प्रचिती मला झाली. मी लौकरच एका जागेची आणि इतर गोष्टींची व्यवस्था करतो, जेणेकरून तुझ्या शाळेत अजून मुले येतील" साहेब भावुक होत म्हणाले.

सुमनने स्मित करत हात जोडले.


समाप्त

परतफेड परतफेड Reviewed by Nilesh Desai on March 14, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.