रॉकेटसिंग सेल्समन ऑफ दी इयर समीक्षा

रॉकेटसिंग सेल्समन ऑफ दी इयर समीक्षाचित्रपट समीक्षा - 'रॉकेटसिंग: सेल्समन ऑफ दी इयर'

निर्माता: आदित्य चोप्रा
दिग्दर्शक: शिमित अमीन
कलाकार: रणबीर कपूर, शाजहान पद्मसी, गौहर खान, शेरोन प्रभाकर, प्रेम चोप्रा,  मनीष चौधरी, नवीन कौशिक 
कथा: जयदीप साहनी


 यशराज बॅनरच्या खाली आलेला 'रॉकेटसिंग: सेल्समन ऑफ दी इयर' बॉलीवूडच्या आशयप्रधान चित्रपटांमध्ये गणला जातो. कथेला प्राधान्य देणारे म्हणजेच ज्यांना मसाला लावलेले चित्रपट आवडत नाहीत अश्या दर्शकांसाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणीच आहे. 

मुळात या चित्रपटाच्या पोस्टरवरून असे वाटते की हा कॉमेडी चित्रपट असावा. पण या चित्रपटाचा दर्जा त्याहून खूप मोठा आहे. आजच्या जमान्यातील एक नवीकोरी कथा दर्शकांना आपलेसे करते. दिग्दर्शक शिमित अमीन यांचा हा तिसरा चित्रपट. याअगोदरचे त्यांचे 'अब तक छप्पन' आणि 'चक दे इंडिया' हे चित्रपटही यशस्वी झाले होते. त्यातून दिग्दर्शकाचे कौशल्य दिसून येते.

'रॉकेटसिंग: सेल्समन ऑफ दी इयर' या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात एकही गाणं नाही, मारामारी नाही, उगाचच ओढून ताणून आणलेले प्रसंग नाहीत वा विषय भरकटवणारी दृश्ये नाहीत. फक्त एक कथा आहे जी नायकाभोवती फिरत राहते आणि याचमुळे हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्येंत प्रेक्षकांना बांधून ठेवतो.


बदलत्या काळात जगाची गरज बनलेला मार्केटिंग हा कथेचा विषय आहे. एक शीख तरुण म्हणून रणबीर कपूर नवीन अवतारात पाहायला मिळतो. करियरसाठी नायक जेव्हा मार्केटिंग निवडतो तेव्हाच कथेत काहीतरी वेगळे पाहायला मिळणार याचे वेध लागतात. मार्केटिंगच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या यात पाहायला मिळतात. चढाओढीच्या दुनियेत एकमेकांचे पाय कसे खेचले जातात, मानवी मुखवट्यामागे लपलेले कोल्हे कसे असतात, हे पाहणे मनोरंजक ठरते. बरेचसे प्रसंग खूप काही शिकवून जातात. माणसांचे खरेखोटे स्वभाव, चपखल वृत्ती यांचे विलक्षण दर्शन या चित्रपटात होते.

 मार्केटिंगविषयी जितके ज्ञान घेता येईल तितके कमीच आहे. नायकाला असेच फुकटचे सल्ले देणारी, त्याच्यावर दबाव टाकणारी माणसे वेळोवेळी भेटत राहतात. पण मुळात कोणत्याही कामासाठी आवश्यक असलेले प्रामाणिकपणा, दृढ निश्चय, आत्मविश्वास असे गुण नायकाकडे असल्याने सुरुवातीला धडपडलेला नायक पुढे एका मोठ्या कंपनीशी दोन हात करून विजयी होतो. 

चित्रपटात एकदोन प्रसंगात गाणे बसू शकले असते, अशी वातावरणनिर्मिती झाली आहे. मनीष चौधरी सारखा खडूस साहेब थोडा लौकर पाघळला नसता तर नायकाचा संघर्ष काहीसा अजून उठावदार होऊ शकला असता. 

चित्रपटाचा आशय पूर्णतः नायकासंबंधित असल्याने नायिकेला फारसे स्थान नाही. मार्केटिंग हा एकच धागा पकडून चित्रपट जरी पुढे सरकत जातो. अभिनयाच्या बाबतीत रणबीर कपूर सरस आहे. रणबीर कपूरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने शीख सेल्समन छानपैकी रंगविला आहे. प्रेम चोप्रांना एका वेगळ्याच रूपात पाहताना आनंद होतो. प्रेम चोप्रा आणि रणबीर कपूर या दोघांतील नातेसंबंध हृदयस्पर्शी वाटतात. त्यांच्यावर चित्रित झालेली काही दृश्ये नात्यांतील सहजता दर्शवतात.


चित्रपटातील गौहर खानचा वावर लाजवाब आहे. मनीष चौधरी यांनी कंपनीचा मालक आणि नायकाचा साहेब अतिशय जबरदस्त उभा केला आहे. शाजहान पद्मसी, शेरोन प्रभाकर, नवीन कौशिक या सर्वांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

 चित्रपट हा संदेशही देऊन जातो की जगात आजकाल भ्रष्टाचार, छळ, कपट, चढाओढ यांनी आपले हातपाय कितीही पसरवले असले तरीही माणसाचा चांगुलपणा या सर्वांना पुरून उरतो. प्रत्येकाने पाहावा असा हा प्रेरणादायी चित्रपट आहे. 


निलेश देसाई

रॉकेटसिंग सेल्समन ऑफ दी इयर समीक्षा रॉकेटसिंग सेल्समन ऑफ दी इयर समीक्षा Reviewed by Nilesh Desai on March 09, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.