विक्टर द्रागुन्स्की यांस पत्र

देनिसच्या गोष्टी गुगलवरुन साभार


माननीय विक्टर द्रागुन्स्की यांस, 

सप्रेम नमस्कार, 


आपल्या लेखणीतून छोट्या देनिसला जन्म देऊन आपण लाखो बालकांच्या मनातल्या गोष्टी बाहेर आणल्या. माझ्या बालपणातली काही वर्षें निखळ आनंदात गेली त्यामागचे एक कारण म्हणजे आपले 'देनिसच्या गोष्टी' हे पुस्तक.

माझा दादा नेहमी नवनवीन पुस्तके शोधण्याच्या मोहीमेवर असायचा. त्यात एक दिवशी त्याने आणलेले एक पुस्तक केवळ मुखपृष्ठाच्या आकर्षणाने मी पाहिलं, आणि मग शंभर वेळा तरी ते पुस्तक वाचले. त्या मुखपृष्ठाला पाहताना जणू पहिल्या नजरेतलं प्रेमच जडले गेले. पुस्तक होतं 'देनिसच्या गोष्टी’. मूळ रशियन भाषेतले हे पुस्तक मराठीत श्रीयुत अनिल हवालदार सरांनी अनुवादित केले.

मला आवडलेले हे पहिले पुस्तक. अतिशय साध्या सोप्या प्रसंगातून खुलत गेलेले देनीसचे भावविश्व वाचताना नेहमी मन सुखावून जायचे.  त्यातली पहिली गोष्ट होती ‘मला काय आवडतं’. मला बाकी कुणाचे माहित नाही पण त्यातल्या खुपश्या आवडीनिवडी तंतोतंत माझ्याशी जुळत होत्या. देनीसला ठोकठोक करायला आवडते, मोsठ्या आवाजात ओरडायला, गायला आवडतं. पेट्रोलचा वास मलाही खूप आवडतो.

"वास्याचे बाबा आहेत गणितात हुशार, 
शिकतात वास्यासाठी वर्षभर..

कुठं असं दिसलयं, कुठं असं ऐकलंय, 
गणितं सोडवायची बाबांनी, भाव खायचा वास्यानं.."

हा कविता सादरीकरणाचा देनीस आणि मिष्काचा प्रयत्न तर तेव्हा मला पोट धरून हसवायचा. ही कविता बऱ्याचदा शाळेत मी गुणगुणायचो तेव्हा वर्गमित्र मी दुसऱ्या ग्रहावरून आलोय अश्या आविर्भावात माझ्याकडे पाहायचे. त्याकाळी हे पुस्तक माझ्या वर्गमित्रांकडे असण्याची शक्यता नव्हती. या कवितेतला संदेश ही छान असाच होता.

. ‘जेव्हा मी लहान होतो’,  'आणि आम्हीसुद्धा', 'रहस्याला वाचा फुटते',  ‘नजर ठेवणारी दुर्बीण’, 'छू मंतर', ‘दीडशहाणा प्रोफेसर’ वाचताना फार फार मज्जा आली. प्रत्येक गोष्टींत मी स्वतःला देनिसच्या जागेवर ठेऊन कल्पना करत असे. या सगळ्याच गोष्टी खूप आवडल्या.

देनिसच्या निरागसतेची जाणीव ‘निळ्या आकाशात लाल फुगा’, ‘तो जिवंत आहे आणि चमकतोय’ यां गोष्टींमधून झाली. एका संध्याकाळी आईची वाट बघत घराबाहेर बसलेला असताना आपलं आवडतं खेळणं एका जिवंत काजव्याच्या बदल्यात मित्राला सहज देऊन टाकतो. आणि जरा वेळाने जेव्हा आई येते तेव्हा मात्र एकाचवेळी देनिसच्या डोळ्यात आलेले पाणी आणि आनंद अनुभवताना मीदेखील भावुक व्हायचो.
  
'बरोब्बर पंचवीस किलो', 'हेराचा मृत्यू', 'जुना खलाशी', 'निळी कट्यार', 'सादोवाया रस्त्यावरील मोठी वाहतूक' अशी कितीतरी नावं आजही मनात घर करून आहेत.

अर्थात या साऱ्या आठवणी केवळ आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अनुभवायला मिळाल्या. आपल्या त्या एकाच पुस्तकाने मी लहानपणीच आपला चाहता झालो. जेवताना, नाश्ता करताना, झोपायच्या अगोदर देनिसच्या गोष्टी वाचल्याशिवाय चैन पडायचे नाही. साधारण चार पाच वर्षें सतत मी 'देनिसच्या गोष्टी' वाचले. त्यावेळेचे गोष्टी वाचतानाचे अनुभव आणि त्यातून मिळत गेलेला आनंद अजूनही लाखमोलाचा वाटतो. आपल्या मूळ कथेच्या कल्पनेबद्दल आणि अनिल सरांनी केलेल्या तितक्याच सुरेख अनुवादासाठी आपल्या दोघांचे मनापासून खूप खूप आभार. 

 शेवटी मला खात्री आहे आपण ज्या जगात असाल तिथपर्येंत माझ्या भावना या पत्राद्वारे आपल्यापर्येंत नक्की पोहोचतील. या आभारपत्रातल्या मराठी वाचकाचे शब्द भावरूपाने रशियन लेखकाला कळतील अशी भाबडी अपेक्षा ठेऊन पत्राची सांगता करतो.

आपला चाहता, 

निलेश देसाई

विक्टर द्रागुन्स्की यांस पत्र विक्टर द्रागुन्स्की यांस पत्र Reviewed by Nilesh Desai on March 04, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.