दसविदानिया - चित्रपट समीक्षा

दसविदानिया - चित्रपट समीक्षानिर्माता : विनय पाठक, आज़म खान 
दिग्दर्शक : शशांत शाह 
संगीत : कैलाश खेर, परेश, नरेश 
कलाकार : विनय पाठक, नेहा धूपिया, रणवीर शौरी, रजत कपूर, सौरभ शुक्ला, सरिता जोशी, गौरव गेरा 

 रोजच्या नोकरी, घर, कुटुंब यातल्या चक्रव्यूहात अडकलेल्या आणि आलेला दिवस ढकलायचा म्हणून जगत आलेल्या आपल्यापैकी कोणाला जर एखाद्या दिवशी कळले की आपलं आयुष्य लौकरच संपणार आहे तर.. 

 काय कराल तुम्ही..?  

कल्पनाही करवत नाही ना.. ! 

डॉक्टरने एखाद्या दिवशी सांगितले की, 

"बाबा आता तू फक्त काही दिवसांचा सोबती आहेस..." 

उरलेले दिवस मोजत या भयानक वास्तवाच्या ओझ्याखाली अजूनच दबायचे की राहिलेले आयुष्य भरभरून जगायचे. बरं ही बाब इतकी गंभीर आहे की चेहऱ्यावर हास्य ठेऊन बाकी दिवस आनंदात घालवणे, हे देखील सहसा कोणाला शक्य होणार नाही. मुळात आपले आयुष्य हे इतके बेभरवशाचे आहे की आपल्याला पुढे काय होईल हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. तरीही आपल्यापैकी बहुतेक जण उद्याच्या आशेवर आजचा दिवस नाही त्या गोष्टींत वाया घालवतात. 

अकस्मात जीवनाची गणितं चुकलेल्या एका सामान्य माणसाची ही कथा आणि क्षणभंगुर आयुष्यात आपल्या आवडीचे रंग भरण्याचा संदेश देणारा चित्रपट म्हणजे 'दसविदानिया'.  

'दसविदानिया' या मूळ रशियन शब्दाचा शब्दशः अर्थ 'पुढील भेटीपर्येंत निरोप' असा होतो. किंवा इंग्रजीमध्ये आपण गुडबाय म्हणू शकतो.

मी विनय पाठक यांचा चाहता असल्याने त्यांचे जवळपास सारे चित्रपट पाहिलेत. त्यातलाच हा 'दसविदानिया' जेव्हा पाहिला तेव्हा सामान्य माणूस, त्याच्या भावभावना यांचे सूक्ष्म दर्शन, त्याची सर्वसाधारण स्वप्ने आणि ती वेळेत पूर्ण करण्यासाठीची धडपड मनाला विलक्षण समाधान देऊन गेली.

खूप वर्षांआधी आलेला हृषीकेश मुखर्जींचा 'आनंद' त्याकाळी तुफान चालला होता. तसेच काहीसं कथानक 'दसविदानिया' या चित्रपटाचे आहे. चित्रपटाच्या नायकाला कळते की आता त्याच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही आणि मरण्याअगोदर तो आपल्या दहा इच्छांना पूर्ण करण्याचा निर्णय घेतो.

रोज सकाळी उठून आपल्या दिवसभरातल्या कामांची यादी बनवणे आणि दिवसभर त्या यादीतील कामे पूर्ण करून पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी तयार होणे, अश्या साधारण चारचौघांसारख्या वृत्तीचा नायक आपल्यातलाच एक वाटतो. तो अविवाहित, शांत, लाजाळू, मितभाषी आणि काहीसा घाबरटसुद्धा आहे. हा चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा यासाठी आहे कारण चित्रपटात मध्यमवर्गीय सामान्य माणूस आणि त्याचं दुःख उत्तमप्रकारे व्यक्त झाले आहे.

एक दिवस नायकाला माहिती पडते की त्याला कॅन्सर आहे आणि त्याच्याकडे फारफार तर तीन महिनेच उरले आहेत. त्या धक्क्यातून सावरण्याच्या प्रयत्नात नायक पुन्हा एक यादी बनवतो ज्यात त्याच्या 10 इच्छा तो लिहून काढतो. त्या इच्छा कोणत्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी नायक काय काय करतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे.


निर्देशक शशांत शाह यांनी साधारण ‍कथेला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समोर आणले आहे. चित्रपटातील काही दृश्ये अप्रतिम आहेत. जेव्हा नायक धाडस करून आपल्या खादाड साहेबाशी बोलतो तेव्हा नोकरीं करणारे कित्येक चेहरे सुखावले असतील. 

एका प्रसंगात नायक त्याच्या लग्न झालेल्या नायिकेला त्याचं तिच्यावर प्रेम आहे असे इशाऱ्यात सांगतो. हे दृश्य पाहताना माझ्या हृदयात एकाचवेळी आनंद आणि दुःख यांचा सुरेख मिलाप मी अनुभवला. ज्याची कोणाची ती कल्पना असेल, त्याला खरेच सलाम. एक अवाक्षरही या दृश्यात नाही, तरी त्याची परिणामकता अधिक उठावदार आहे. 'दसविदानिया' चित्रपटातील हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.

 रशियन तरुणीसोबतचे प्रसंग थोडेसे अविश्वसनीय असले तरी अगदीच रटाळ नाहीत. गिटार टीचर सोबतचे क्षणही कथेची बाजू काहीशी उचलून धरतात. जुन्या मित्राची भेट आपल्या मित्रांची आठवण देऊन जाते.

हा संपूर्ण चित्रपट नायकाभोवतीच असल्याने नायक तितकाच ताकदीचा असणे अत्यावश्यक होते. विनय पाठक यांनी ती जबाबदारी लीलया पेलली आहे. त्यांचा साधाभोळा अंदाज आणि अभिनय लाजवाब आहेत. नायिकेला चित्रपटात स्थान नसल्याने नेहा धुपियाच्या वाट्याला फार काही आलेले नाही. रजत कपूर, सौरभ शुक्ला, रणवीर शौरी, सरिता जोशी या सर्वांनी छान अभिनय केला आहे.

चित्रपटाचा वेग काहीसा मंद असला तरी प्रत्येक प्रसंग कथेला न्याय देतो.  यातले संवाद कथेप्रमाणेच अप्रतिम लिहिले आहेत. चित्रपटातील 'मम्मा' हे गाणं डोळ्यांतून पाणी काढते.

 आपल्याकडे गाजावाजा न करता आलेले चित्रपट फारसे यशस्वी होत नाहीत. मला वाटत नाही फारसा हा चित्रपट कुणी पाहिला असावा, पण प्रत्येकाने एकदातरी हा चित्रपट पाहावाच इतका सुरेख आहे.

 'दसविदानिया' हा चित्रपट माझ्या मोजक्याच आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.


निलेश देसाई
दसविदानिया - चित्रपट समीक्षा दसविदानिया - चित्रपट समीक्षा Reviewed by Nilesh Desai on March 09, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.