कणा - आवडती कविता

कणा - आवडती कविता"ओळखलंत का सर मला?” पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी......’


‘क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :

गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली’


‘कारभारणीला घेउन संगे, सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे’


‘खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेऊन, फक्त लढ म्हणा!

फक्त लढ म्हणा!’

कवी : कुसुमाग्रज


  नववीत असताना कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता पहिल्यांदा अभ्यासात वाचली आणि त्याच संपूर्ण दिवसभरात कमीतकमी पंधरावेळा घोकून पाठ केली. काय जादू होती त्यातील शब्दांत..? हे त्या काळी सांगता आले नसते. पण माझ्याबाबतीत सांगायचं तर कविता वाचताना अंगात नुसता जोश संचारायचा. 'फक्त लढ म्हणा' उच्चारताना स्फूर्ती यायची. 

जसजसा मोठा होत गेलो, तसतसे कवितेतले शब्द आणि त्यांचे अर्थ यांचे आकलन अधिक खोल पातळीवर होत गेले. 'कणा' खरेतर प्रत्येक मराठी माणसाच्या जवळची असावी असे मला वाटते. किती साधी सोपी शब्दांची रचना..! त्यांचा आशय..! स्वाभिमान काय असतो हे दाखवून देणारी ही कविता कोणाला आवडल्याशिवाय राहणार नाही. या कवितेने कित्येक आयुष्यांना प्रेरणा दिली असावी. कित्येक जीवांना कठिण परिस्थितीत जगण्यासाठी बळ दिलं असावं.


     कवितेचा आशय पाहावा तर नायकाने नव्याने संसार ठरलेला असतो.  एकदा जेव्हा घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि त्याचा संसार उध्वस्त होतो.. काही क्षणांत नायकाच्या डोळ्यांसमोर तो संसार विस्कटून जातो आणि शेवटी त्याच्या डोळ्यांतही आसवांचा पूर ओसंडून वाहू लागतो. त्या पुरात नायक आणि त्याची पत्नी तेवढे वाचतात. बाकी झालेले नुकसान पाहून हतबल झालेल्या नायकाला त्या वेळी धीर देणारे, आत्मविश्वास वाढवणारे आणि कठीण प्रसंगी मायेने हात फिरवणारे शिक्षक आठवतात.

    नायक पावसाळी रात्रीच भिजलेल्या अवस्थेत सरांच्या घरी जाऊन त्यांना भेटतो आणि सारी कहाणी सांगतो. ती करुणकहाणी ऐकून सरांचा हात आपसूक पैशांची मदत करण्यासाठी  खिशाकडे जातो. ते ध्यानात येताच नायक सरांना अडवतो आणि म्हणतो, "मी तुमच्याकडे फक्त एकटेपणा जाणवत होता म्हणून धीराचे दोन शब्द ऐकायला आलोय. आर्थिक मदतीची मला आवश्यकता नसून आपण मानसिक आधार द्यावा एवढीच अपेक्षा घेऊन आलो आहे. संसार जरी मोडला  असला तरी माझा पाठीचा कणा अजूनही ताठ आहे. माझा स्वाभिमान अजून जिवंत आहे. फक्त तुमचा आशीर्वाद मिळाला की पुढची लढाई मी लढण्यास सज्ज होईन." 


आयुष्यात खूपदा असे प्रसंग आले की जेव्हा कोलमडून पडावे अशी तीव्र  इच्छा मनात आली, पण लहानपणी मनावर कोरली गेलेली ही कविता नेहमी संकटांना आडवी गेली. आजही कवितेतला शब्द न शब्द तोंडपाठ आहे, कारण ही फक्त कविता नसून जीवन जगण्याचा मंत्र आहे.

मला वाटते, पूर येणे हे एक उदाहरण पकडले तर असे कित्येक निरनिराळे धक्के सामान्य माणूस रोज खात असतो. कितीतरी उध्वस्त करणारे प्रसंग आयुष्यात येतात. कित्येकदा अश्या घटना घडतात की जेव्हा वाटावे, आता सारे संपले... ज्यांना तसे वाटते त्या सर्वांसाठी ही कविता प्रेरणादायी आहे. माणसांचे अनुभव निरनिराळे असले तरी कवितेचा मूळ आशय तोच ठेऊन ही कविता प्रत्येकाला जगण्याचं बळ देते. पहाडाएवढी संकटं आली तरी न डगमगता पुढे जात राहण्याचे धैर्य देते. म्हणून ही कविता आपलीशी वाटते.


समाप्त 

कणा - आवडती कविता कणा - आवडती कविता Reviewed by Nilesh Desai on March 05, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.