मसान - चित्रपट समीक्षा

मसान - चित्रपट समीक्षादिग्दर्शक : नीरज घेवन
कलाकारः रिचा चड्ढा, विकी कौशल, संजय मिश्रा, श्वेता त्रिपाठी,  विनीत कुमार


मानवाचे अंतिम संस्कार ज्या जागी होतात ते मसान म्हणजे स्मशान घाट.  छोट्या शहरातील माणसांचे जीवन आणि त्यातील करूण कहाणीची वास्तविकता या चित्रपटामध्ये हुबेहूब रेखाटली आहे. जखडवून ठेवलेल्या रूढीपरंपराना फाट्यावर मारणारी नवी पिढी, स्वतंत्र आणि मोकळे आयुष्य जगण्याची ईर्ष्या, सामाजिक विकृत चालीरीती आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली पोलिसयंत्रणा, जातीवादाचा अडकलेलं प्रेमाचं सुंदर नातं या सर्व विषयांची गुंफण 'मसान' या चित्रपटात केलेली आहे.

दिग्दर्शक नीरज घेवन यांनी चित्रपट उत्कृष्टरित्या हाताळला आहे. एखादी कथा वाचत असल्यासारखा चित्रपट पुढे सरकत जातो. या  चित्रपटात सुरुवातीला दोन वेगवेगळ्या असलेल्या कथा शेवटी सोबत एकत्र आल्याचे दाखवले आहे.

चित्रपटात फारशी पात्रे नाहीत. ठराविक पात्रांभोवतीच दोन्ही कथा घुटमळत राहतात. बनारस शहर आणि आसपासच्या भागांत दोन्ही कथा घडत असल्याचे दाखवले आहे.

 पहिल्या कथेत एक तरुणी मुक्त जीवन जगण्याची आशा बाळगून असते. यौवनाच्या त्या खास क्षणांना सत्यात उतरवण्याच्या प्रयत्नात असे काही घडते की परिस्थिती पूर्णपणे तिच्याविरोधात जाते. कालांतराने त्या एका प्रसंगामुळे नामुष्की ओढवलेल्या त्या नायिका आणि तिच्या वडिलांना खूप गोष्टी सोसाव्या लागतात. पैशाचेही नुकसान होते. तरीही नायिकेला त्या गोष्टीचा पश्चाताप नसतो, तिच्यामते जे काही घडून गेले त्यात तिचा काहीच दोष नसतो. खरेतर चित्रपटातून हेच सांगायचे आहे की मुक्त आयुष्य जगण्याचा अधिकार सर्वांना आहे, नायिकाही त्याला अपवाद नाही.

दुसऱ्या कथेत एक सुशिक्षित तरुण आपल्या मागासलेल्या जातीची ओळख पुसून यशस्वी आयुष्य जगण्याच्या प्रयत्नात आहे. शिक्षण पूर्ण करूनही या तरुणाला जातीप्रमाणे गरजेनुसार पूर्वापार चालत आलेले काम करावे लागते. त्यातच त्याचं मन एका उच्च जातीच्या मुलीवर जाऊन बसते. लहान शहरांतल्या मानसिकतेतून उफाळलेलं प्रेम आणि मग त्यातून घडणारा संघर्ष आणि आकस्मिक मिळणारे दुःख यांचा सुरेख मिलाफ या कथेत दाखवण्यात आला आहे. 

चित्रपटातलं दुःख मनावर खूप जोराचा आघात करतं. त्यात दाखवण्यात आलेली प्रेमकथा स्वतःच्या प्रेमकथेची आठवण देऊन जाते. सामान्य मानवाच्या साध्या भावनांची चित्रफीत म्हणजे 'मसान'.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे कथेतील सारी पात्रे दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहेत. त्यांच्या स्वतःच्या अश्या ठराविक समस्या आहेत. चित्रपट अश्या सामान्य माणसांच्या जगण्यावर प्रश्न करत राहतो आणि दर्शकांना विचार करायला भाग पाडतो. अतिशय सर्वसामान्य पद्धतीने चित्रपटाची कथा पुढे सरकत राहते. या चित्रपटात कुठेही अतिशोयुक्ती नाही, सर्व प्रसंग सहजतेने घडत असल्यासारखे वाटतात.

संजय मिश्रा यांचा अभिनय नेहमीप्रमाणे निशब्द करणारा आहे. रिचा चड्डाने अतिशय चपखलपणे आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. विकी कौशल एक उत्तम अभिनेता म्हणून समोर येत आहेत. शिवाय श्वेता त्रिपाठीची उपस्थिती चित्रपटात ठळकपणे जाणवते. 

 गाणी, संवाद, दृश्ये या साऱ्याबाबतीत हा चित्रपट आपली छाप सोडतो.  मसान चित्रपट त्या बॉलीवूडच्या सरस कथांपैकी एक आहे, ज्याचा स्तर खूप वरचा आहे. 


निलेश देसाई
मसान - चित्रपट समीक्षा मसान - चित्रपट समीक्षा Reviewed by Nilesh Desai on March 09, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.