पप्पू कान्ट डान्स साला - चित्रपट समीक्षा


पप्पू कान्ट डान्स साला - चित्रपट समीक्षा


निर्माता : रविन्द्र सिंग, समीर नायर 
दिग्दर्शक : सौरभ शुक्ला 
संगीत : मल्हार पाटेकर 
कलाकार : विनय पाठक, नेहा धूपिया, रजत कपूर 


  सौरभ शुक्ला यांचा हा चित्रपट म्हणजे एक आगळीवेगळी कलाकृती म्हणता येईल. 'पप्पू कान्ट डान्स साला' हे नाव थोडे विचित्र जरूर वाटते. शिवाय या नावावरून आपल्या मनात वेगळेच काहीतरी चित्र निर्माण होऊ शकते, पण तसे अजिबात नाही. दोन परस्परविरोधी टोकाच्या,  दोन भिन्न विचारवृत्तीच्या माणसांना एकत्र गुंफुनारा हा चित्रपट खूपच छान जमला आहे.

विनय पाठक यांचा तोच साधासरळ स्वभाव रसिकांच्या मनातली आवर्तनं हुबेहूब समोर आणतो. जसजसे चित्रपट पुढे सरकत जातो तेव्हा  नायिकाप्रधान कथानक उलगडत जाते. नेहा धुपियाचा निराळाच अंदाज पाहायला मिळतो. हा चित्रपट नेहा धुपियाच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी एक आहे.
नायिकाप्रधान असल्याने संपूर्ण चित्रपट नायिकेच्या अवतीभवती फिरत राहतो. नायिका आईवडिलांच्या इच्छेविरुध्द कोल्हापूरहून आलेली चित्रपटात नटांच्या आसपास नाचणारी एक तरुणी आहे. ती बिनधास्त, फटकळ आहे, शहरातील वातावरणाशी ती एकरूप झालेली आहे. पण तरीही तिच्या मनात घरातून पळून आल्याबद्दल खंत आहे. ती भावुक आहे, तिच्यात आपलेपणा आहे, छोट्या छोट्या गोष्टींत सुख शोधण्याचे कसब तिच्याकडे आहे. एखाद्या पात्रातील निरनिराळ्या छटा नेहा धुपियाने अतिशय सहजतेने साकारल्या आहेत.

चित्रपट संथ असला तरी दोन व्यक्तींमधील नातेसंबंध हळूहळू कसे बदलत जातात यावर प्रकाश टाकणारा आहे. दोन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येताना त्यांच्यातील दरी कशी कमी होत जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरते. 

मुंबईतील पी एन टी कॉलनी जिथे फक्त केंद्र सरकारची नोकरी करणारेच राहू शकतात. परंतु मूळ मालक बऱ्याचदा आपला फ्लॅट कमी किमतीत भाड्याने देऊन दुसरीकडे राहावयास जात असतात. स्वस्तात भेटत असल्याने मुंबईत नव्याने आलेली, नोकरीधंद्याच्या शोधातली माणसे अश्या फ्लॅटमध्ये कमी भाडे देऊन राहतात. हा गैरप्रकार रोखण्यासाठी अश्या ठिकाणी नेहमी छापे पडत असतात आणि ज्या फ्लॅटमध्ये असे कोणी भाडेकरू आढळून येतील असे फ्लॅट जप्त करून बंद केले जातात.

एक दिवस नायिका राहत असलेल्या फ्लॅटवर छापा पडतो आणि तिला राहण्यासाठी दुसरी सोय उरत नाही. हे सर्व नायकामुळे झाले असे समजून नायिका जबरदस्ती नायक राहत असलेल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये घुसते आणि तिथून पुढे चित्रपटातील रंगत आणखी वाढत जाते. सुरुवातीला एकमेकांचे वैरी असलेले ते दोन जीव एकाच फ्लॅटमध्ये  राहू लागतात. 

हळूहळू त्या दोघांना एक दुसऱ्याचा स्वभाव उलगडत जातो. एकमेकांचे मन जपण्याचे, काळजी घेण्याचे प्रकार नकळत घडू लागतात. त्यातून प्रेमाची कळी फुलायला सुरुवात होते. तरीही मूळच्या भिन्न स्वभाव आणि संस्कृतीमुळे दोघांचे आचरण अवघडलेल्या मनस्थितीत असल्याप्रमाणे होत राहते. 

चित्रपटातील काही दृश्ये अप्रतिम आहेत. मासिक पाळीच्या त्रासाने चिडचिड करणाऱ्या नायिकेसाठी नायक सॅनिटरी नॅपकिन विकत घेऊन येतो आणि ते पाहून नायिका सुखावते, हे दृश्य खूप काही शिकवून जाते. 

रजत कपूर आपल्या कामात उत्तमच आहे. त्याचा चित्रपटातील वावर तितकाच सहज आहे. चित्रपटातील नृत्यदिग्दर्शकाची जबाबदारी त्यांनी योग्यप्रकारे पार पडली आहे.

चित्रपटाला साजेसं असं संगीत मनात साठून राहतं. 'अभिमानी मन' यां गाण्याची शब्दरचना, चाल आणि कैलास खेर यांचा आवाज अफलातून आहे.

 काही अनावश्यक प्रसंग टाळून कथेत नायक आणि नायिका यांचे प्रेम आणखी उठावदार दाखवता आले असते. शिवाय त्या दोघांना एकमेकांवरील प्रेमाचे आकलन होण्याआधी त्यांच्यात नजरेचा खेळ दाखवणेही चालून गेले असते.

असे असले तरीही एकदा आवर्जून पाहण्यासारखा असा हा चित्रपट आहे.

चित्रपट मुंबई, सातारा आणि बनारसमध्ये चित्रित करण्यात आला आहे. त्यातली काही दृश्ये मन मोहून टाकणारी आहेत. एकूण आशय, संवाद, अभिनय, संगीत यां सर्वच पातळ्यांवर चित्रपट अतिशय छान जमला आहे. 


निलेश देसाई 

पप्पू कान्ट डान्स साला - चित्रपट समीक्षा पप्पू कान्ट डान्स साला - चित्रपट समीक्षा Reviewed by Nilesh Desai on March 09, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.