मला भावलेले पसायदान

मला भावलेले पसायदानआता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।

जे खळांची व्यंकटी सांडो ।तया  सत्कर्मी रती वाढो । 
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।

दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो । 
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।

वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । 
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।

चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । 
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन । 
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें । 
दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।

तेथ म्हणे श्रीविश्र्वेश्वरावो । हा होईल दानपसावो । 
येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

संत ज्ञानेश्वर


आमच्या शाळेच्या प्रार्थनेत पसायदानाचा समावेश असल्याने ते अभ्यासक्रमात येण्याअगोदरच तोंडपाठ होते. रोज बोलल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ आणि पसायदानाचा आशय मला हळूहळू उलगडत गेला. त्या वयात हरिपाठ सप्ताह, भजनाचे कार्यक्रम अश्या सांस्कृतिक उपक्रमांत मी आवर्जून जात असे. त्यातूनच पसायदानातील गोडवा आणि ज्ञानेश्वरांची विश्वकल्याणासाठीची मागणी यांनी मन भारावून गेले.

 संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या शेवटी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे मागणे मागितले. हे मागणे म्हणजेच पसायदान होय.


 संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती ईश्वरचरणी अर्पण करून त्याचे  फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरुपी दान मागितले. ईश्वर "विश्वात्मक" आहे. पसायदानात ज्ञानेश्वर ईश्वराकडे मागतात कि जे कुणी दुष्ट, वाईट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा जाऊन त्यांनी योग्य मार्गाला लागावे तसेच सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांचे आपापसात मैत्रीपूर्ण बंध निर्माण व्हावेत.  


भरकटलेल्या दुष्ट माणसांच्या जीवनातला अंधार दूर होऊन संपूर्ण विश्वात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय व्हावा. तसेच सर्व प्राणिजमात ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो. त्यांच्या सर्व चांगल्या इच्छाआकांक्षा पूर्ण होवोत. संतांच्या वर्णनात ज्ञानेश्वर म्हणतात की ते संत म्हणजे कल्पतरुंची चालतीफीरती उद्याने आहेत. ही संतमंडळी चैतन्याचे वातावरण निर्माण करणारी रत्न असून त्यांचे बोल अमृताप्रमाणे आहेत. हे संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत, उष्मा नसलेले सुर्य आहेत आणि ते सर्व सज्जन माणसांचे मित्र आहेत . 

या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन ईश्वराची सेवा करत राहावी. सर्वांनी ज्ञानेश्वरीतील तत्वे पाळत सर्व दुष्ट प्रवृतींना नाहीसे करून सुखी व्हावे. असे प्रेमळ आणि समाजातल्या सर्व घटकांसाठी मागितलेले मागणे विश्वेश्वर मान्य करतात आणि ज्ञानेश्वर आनंदी होतात.

शालेय वयापासून मनात ठसलेली ही प्रार्थना म्हणजे जीवन कसे जगावे याचा अर्थ सांगणारी आहे, असे मला वाटते. आपले मागणे नेहमी दुसऱ्याकरिता असावे. त्यात कुठेही स्वार्थ येता कामा नये. दुष्ट लोकांतील फक्त दुष्ट स्वभावाचा द्वेष करून तो नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करावे. दुष्टांना चांगुलपणाची वाट दाखवावी. कल्पतरू वृक्ष ज्याप्रमाणे भरभरून देतो तसेच संताचेही आहे. त्यांचा आदर करावा. संतांनी लोकांना आयुष्यात आवश्यक असणारी मुल्ये, आचार-विचार, बंधुभाव यांचे उपदेश करावेत. अभंग, ओवी यांतून लोकांना उच्च कोटीचे संस्कार द्यावेत. सर्व प्राणीमात्रांनी एकत्र आनंदी राहावे. त्यातूनच मग सर्व प्राणिजात सुखी होईल. विश्वाचे कल्याण होईल.

अश्या आशयाचे मागणे जे जगाचा उद्धार करण्यास उपयोगी ठरेल, किती सहज सोप्या शब्दांत ज्ञानेश्वरांनी मागितले आहे. यातील सुंदर रचनेमुळे पसायदान मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्याचे कार्य अविरत केले आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सावतामाळी अश्या कित्येक संतांचा समावेश आहे. या संतांच्या कार्यामुळेच जीवनाचे अनमोल सार आपल्या मातीत रुजले. सध्या प्रगतीच्या नावाखाली आपण संतांची वचने विसरत चाललो आहोत. ज्ञानाचा हा बहुमोल ठेवा प्रत्येकाने आठवून त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे, तेव्हाच हे जग सुंदर होण्यास मदत होईल.


समाप्त


मला भावलेले पसायदान मला भावलेले पसायदान Reviewed by Nilesh Desai on March 07, 2020 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.